डॉ. कोत्तापल्ले : परिवर्तनवादी लेखक

डॉ. कोत्तापल्ले : परिवर्तनवादी लेखक
Published on
Updated on

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि लेखक, समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाने एक परिवर्तनवादी विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेल्या डॉ. कोत्तापल्ले यांनी समाजातील आर्थिक दुर्बल, सामाजिक अन्यायाला बळी पडलेल्या पददलितांच्या व्यथा-वेदना मांडून वस्तुस्थिती मांडली. भवितव्याच्या आकलनाचा वेध घेण्याचे सामर्थ्य
त्यांच्या साहित्यात होते.

मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाने एक परिवर्तनवादी साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे. चिपळूण येथे 2013 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांच्या लेखनाचा परीघ आणि अवकाश हे व्यापक आहे. सुरुवातीच्या काळात ते भावकविता लिहित असत. 1970 च्या काळात दिलीप चित्रे यांच्यासारखे इतर काही प्रतिष्ठित कवी, लेखक आपल्या लेखनाने सामाजिक बांधीलकीचे विषय मांडत असत.

त्या काळात 'मौज'सारख्या नियतकालिकाच्या कवी-लेखकांचा एक काळ होता. डॉ. कोत्तापल्ले हे त्याच पठडीतील लेखन करत असत. त्याच पद्धतीची भावकविता त्यांनी सुरुवातीच्या काळात लिहिण्याचा प्रयत्न केला. अर्थात, त्यावेळी ते विद्यार्थीदशेत होते. त्यांच्या काव्य आणि लेखनावरही मार्क्सवादाचा प्रभाव असल्याचे जाणवते. ते विद्यार्थीदशेत असताना त्यांचे लेखन मार्क्सवादाच्या चौकटीत बांधलेले होते; पण हे करताना त्यांनी आपल्या लेखनात मार्क्सवादाचे जसेच्या तसे अनुकरण कधीच केले नाही. जे पददलित आहेत म्हणजे जे आर्थिक दुर्बल घटक आहेत किंवा अन्य सामाजिक अन्यायांचा सामना करत आहेत त्यांच्या वेदना मांडणे हे त्यांच्या लेखनाचे विशेष होते. मोठ्या कादंबरी लेखनाकडे ते फारसे वळले नाहीत; पण त्यांच्या दीर्घकथा, लघु कादंबर्‍या इत्यादी लेखन कादंबरीच्या कक्षेत येणारे होते. डॉ. कोत्तापल्ले यांच्या लेखनाची प्रवृत्ती म्हणजे त्यांनी लेखनातून समाजातील एका घटकावर होणारे अत्याचार, त्यांचे जगण्याचे हक्क, त्यांच्या व्यथा-वेदना इत्यादी गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचे लेखन करून त्यांनी आपली सामाजिक बांधीलकी अधिक प्रमाणात मानली. त्यां चे लेखन केवळ पुस्तकी नव्हते. त्यांनी डाव्या विचारसरणीची मुळे आपल्या लेखनातून मांडून ती रुजवण्याचा प्रयत्न केला.

डाव्या विचारसरणीविषयी लिहिताना डॉ. कोत्तापल्लेंनी त्या लेखनाला स्वत:च्या वैयक्तिक अनुभवांचीही जोड दिली; पण त्यांचे लेखन आत्मकथनपर नाही. तो त्यांचा कधी उद्देशही नव्हता. व्यक्तिगत आयुष्यातही त्यांनी अनेक सुख-दु:खे भोगली होती आणि समाजातील इतर घटकांचीही अनुभवली होती. त्या अनुभवांची जोड त्यांच्या लेखनाला मिळालेली दिसते. त्यांचे मूळ घराणे तेलगू होते; पण बालपणापासूनच मराठवाड्यात राहिले असल्याने त्यांना तेलगू भाषा येत नव्हती. त्यांचे वडील मात्र अनेक वर्षे तेलंगणा भागात राहिले असल्याने तेलगू भाषा त्यांना येत असे. डॉ. कोत्तापल्ले यांना येथे वावरताना एक प्रकारचे साहित्यिक, सांस्कृतिक उपरेपण सोसावे लागले; पण त्यांच्या मनात मात्र हे उपरेपण नव्हते, हे त्यांच्या नेणिवेत दिसून येई. ही नेणिवता त्यांच्या लेखनातून प्रत्यक्षपणे प्रकट होते. समाजातील विविध घटकांच्या व्यथा ही त्यांच्या लेखनाची आस्था होती. त्यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण भागातील पददलितांबरोबरच छोट्या शहरातील वर्गाच्या व्यथाही केंद्रीत केल्या.

डॉ. कोत्तापल्ले हे फक्त बोलके नव्हते; तर कृती करुन आपल्या कामाचे प्रतिबिंब निर्माण करणारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काम करत असताना विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून त्यांनी मोठे काम केले. मराठवाडा विद्यापीठाच्या मालकीच्या जमिनीवर त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनेे शेती फुलवली. त्यातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवले. राजधानी, कवीचे डोळे, सावित्रीचा निर्णय, कवीची गोष्ट यांसारख्या संवेदनशील कथांमधून, गांधारीचे डोळे यांसारख्या कादंबरीतून त्यांची संवेदनक्षमता समोर येते. 'मूडस' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यातील आशयाची शिस्तबद्ध मांंडणी लक्षात घेऊन या काव्यसंग्रहाला शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुस्तकातील त्यांची कविता अल्पाक्षरी होती; पण अस्फूट निश्चित नव्हती.

त्यातील नितळ आणि सुबोध भाषा समकालीन जीवनाची सामग्री समर्थपणे पेलणारी आहे. एका विशिष्ट वाचकवर्गालाच कळू शकेल, त्याच्या कक्षा रुंदावतील अशा प्रकारचे लेखन न करता सर्वसामान्य वाचकवर्गाच्या पचनी पडेल, अशा प्रकारची भाषा त्यांनी आपल्या साहित्यातून वापरली. भवितव्याच्या आकलनाचा वेध घेण्याचे सामर्थ्य डॉ. कोत्तापल्ले यांच्या साहित्यात होते. परिवर्तनवादाचा विस्तार त्यांच्या कथा-कांदंबर्‍यातून पुढे आला. आपल्या लेखनातून त्यांनी समाजातील विषमतेवर बोट ठेवले.

– प्रा. डॉ. सुधीर रसाळ, साहित्यिक आणि समीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news