आजपासून भारताच्या जी-20 अध्यक्षपदाची कारकीर्द सुरू | पुढारी

आजपासून भारताच्या जी-20 अध्यक्षपदाची कारकीर्द सुरू

आज आपल्यासमोर सर्वात मोठी आव्हाने आहेत. हवामान बदल, दहशतवाद आणि महामारी या आव्हानांचा सामना एकमेकांशी भांडून नाही, तर एकत्रित काम करूनच करणे शक्य होणार आहे. जी-20 समूहाच्या या आधीच्या 17 अध्यक्ष देशांनीअतिशय लक्षणीय परिणाम दिले आहेत. जगात स्थूल-आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कररचनेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी, देशांवर असलेले कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी केलेले काम हे या संघटनेच्या अनेक महत्त्वाच्या कामांपैकी महत्त्वाचे आहे. या सगळ्या उपलब्धींचा आपल्याला लाभ होणार आहेच. त्यांच्या आधारावरच आपल्याला भविष्याची उभारणी करायची आहे. मात्र, जेव्हा भारत आज एक महत्त्वाची जबाबदारी घेणार आहे, त्यावेळी मी माझ्या मनाला विचारतो- आज जी-20 जिथे आहे, त्याच्या पलीकडे जाऊ शकेल का? मानसिकतेत एक मूलभूत परिवर्तन करण्यासाठी आपण उत्प्रेरक ठरू शकू का, ते परिवर्तन म्हणजे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा विचार करणे. मला असा विश्वास वाटतो की, आपण हे करू शकतो.

आपली मानसिकता आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बनत असते. आपल्या आजवरच्या संपूर्ण इतिहासात, मानवतेकडे दुर्लक्षच केले गेले. आपण, आपल्या मर्यादित संसाधनांसाठी भांडलो. कारण, इतरांना ती न मिळू देण्यात, ती नाकारण्यावर आपले अस्तित्व अवलंबून होते.
आपल्या कल्पना, आदर्श आणि ओळख यांमधील संघर्ष आणि स्पर्धा ही एक पद्धत बनून गेली आहे. दुर्दैवाने आजही आपण त्याच जुन्या शून्य बेरजेच्या मानसिकतेत अडकलो आहोत. आपण पाहतो की, आजही अनेक देश, प्रदेश किंवा संसाधनांसाठी लढाया करतात. आपण पाहतो की, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचा वापर एखाद्या शस्त्रासारखा केला जातो. आपण हे बघतो, जेव्हा कोट्यवधी लोकांना धोका असूनही लसींचा साठा केला जातो. कदाचित काही लोक असाही युक्तिवाद करतील की, संघर्ष आणि लोभ, या मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत; पण मी याच्याशी असहमत आहे. जर मानव सुरुवातीपासून स्वार्थी प्रवृत्तीचा असेल तर मग एकत्व या मूलभूत तत्त्वाचा उपदेश करणार्‍या ज्या अनेक आध्यात्मिक परंपरांनी आपला चिरस्थायी ठसा समाजावर उमटवला आहे, त्यांचा अर्थ काय समजायचा, हे कोणी स्पष्ट करेल का? अशीच एक परंपरा, जी भारतात लोकप्रिय आहे. त्यात सर्व सजीव प्राणिमात्र आणि एवढेच नाही, तर अगदी निर्जीव गोष्टीसुद्धा पंचमहाभूतात सामावलेल्या आहेत, असा विचार मांडला आहे.

ती पंचमहाभूते म्हणजे पाच तत्त्वे आहेत- पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश. या सर्व घटकांमधील सौहार्द, एकत्व हेच आपल्यात आहे, आपल्यामध्ये आहे आणि ते आपल्या भौतिक, सामाजिक तसेच पर्यावरणीय कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे. भारताचे जी-20 चे अध्यक्षपद हीच सार्वत्रिक एकत्वाची भावना अधिक दृढ करण्यासाठी काम करेल. आमची अशी संकल्पना आहे की, आज आपल्याकडे जगभरातील सर्व लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील एवढे उत्पादन करण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध आहेत. आज आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची गरज नाही. आपले युग हे युद्धाचे युग ठरण्याची गरज नाही. किंबहुना ते युद्धाचे युग नकोच ! सुदैवाने, आजचे तंत्रज्ञान आपल्या मानवतेसमोरील व्यापक समस्यांचा सामना करण्यासाठीची साधने उपलब्ध करून देत आहे. आज आपण ज्या विशाल आभासी जगात राहतो आहोत, त्यातून आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापकतेचेच दर्शन घडते आहे. जागतिक लोकसंख्येच्या सहाव्या भागाइतकी लोकसंख्या जिथे वसली आहे आणि भाषा, धर्म, चालीरिती आणि धारणा यामध्ये कमालीची विविधता आहे, असा भारत म्हणजे एका प्रकारे संपूर्ण जगाची एक लहानशी प्रतिकृतीच आहे.

सामूहिक निर्णय प्रक्रियेची सर्वात प्राचीन परंपरा असलेल्या भारताचे लोकशाहीचा पाया घालण्यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. लोकशाहीची जननी म्हणून भारतामध्ये कोण्या एका व्यक्तीच्या हुकूमाने नव्हे तर लाखो लोकांच्या मुक्त आवाजाच्या मिश्रणातून निर्माण होणार्‍या सुसंवादाच्या एका सुरामधून राष्ट्रीय सहमती निर्माण होते. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्या नागरिक-केंद्री शासनाच्या मॉडेलमध्ये सर्वाधिक उपेक्षित लोकांची काळजी घेतली जाते, तर दुसरीकडे अतिशय प्रतिभासंपन्न युवा वर्गाच्या सर्जनशील गुणवत्तेची जोपासना केली जाते. आम्ही राष्ट्रीय विकासाला शासनव्यवस्थेतील वरून खालपर्यंत असलेल्या उतरंडीमधील एक प्रक्रिया न बनवता नागरिक केंद्रित लोकचळवळ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर पूर्णपणे खुली, समावेशक आणि परस्परांमध्ये प्रक्रिया करता येण्याजोग्या डिजिटल सार्वजनिक सामग्रीची निर्मिती करण्यासाठी केला आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा, आर्थिक समावेशन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स अशा विविध क्षेत्रांत क्रांतिकारक प्रगती झाली आहे. या सर्व कारणांमुळे जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी भारताच्या अनुभवांमधून संभाव्य तोडगे मिळू शकतात. आमच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आम्ही भारताचे अनुभव, अध्ययन आणि मॉडेल्स सादर करणार आहोत; जी इतरांसाठी, विशेषतः विकसनशील देशांसाठी संभाव्य मार्गदर्शक फलक म्हणून उपयुक्त ठरू शकतील. आमचे प्राधान्य आमच्या एका कुटुंबात (वन फॅमिली) सुसंवाद निर्माण करून आणि आमच्या एक भविष्यात (वन फ्युचर) आशा निर्माण करून एक वसुंधरा उत्तम करण्याला आहे.

मानवी कुटुंबात सुसंवाद निर्माण करण्यासाठी आम्ही अन्न, खते आणि वैद्यकीय उत्पादने यांचा जागतिक पुरवठा राजकारणरहित राहील हे सुनिश्चित करणार आहोत; जेणेकरून भू-राजकीय तणावांमुळे मानवी संकटांची निर्मिती होणार नाही. स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच, ज्यांना गरज आहे त्यांना नेहमीच प्राधान्य देण्याची आमची भूमिका असेल. भावी पिढ्यांमध्ये आशा निर्माण करण्यासाठी आम्ही महाविनाशकारी शस्त्रांमुळे निर्माण झालेले धोके कमी करण्याविषयी आणि जागतिक सुरक्षेत वाढ करण्याविषयी सर्वाधिक शक्तिशाली देशांदरम्यान प्रामाणिक संवाद होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत. भारताचा जी-20 जाहीरनामा समावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती आधारित आणि निर्णायक असेल. चला, आपण सर्व भारताचा जी-20 अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा परिस्थिती सुधारणारा, सुसंवाद निर्माण करणारा आणि आशा निर्माण करणारा बनवण्यासाठी एकत्र येऊया. मानवकेंद्रित जागतिकीकरणाच्या एका नव्या आदर्शाला आकार देण्यासाठी एकत्र काम करूया.

Back to top button