गुजरातची निवडणूक

गुजरातची निवडणूक

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी आज होणारे मतदान केवळ गुजरातच नव्हे, तर देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभेच्या 182 जागांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 89 जागा या टप्प्यात असल्यामुळे हा टप्पा निर्णायक ठरणार आहे. कोणत्याही राज्यातील विधानसभा निवडणूक उत्कंठावर्धक आणि प्रमुख पक्षांसाठी प्रतिष्ठेची असली तरी, गुजरातच्या निवडणुकीला थोडे अधिक महत्त्व असतेच. त्याची अनेक कारणे असली तरी त्यापैकी एक म्हणजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य आहे. वर्षांनुवर्षे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होत असलेल्या या राज्यात यंदा प्रथमच तिरंगी लढती होत आहेत. आम आदमी पक्षाने गुजरातच्या भूमीत गेल्या काही महिन्यांपासून चांगली मशागत केल्यामुळे निवडणुकीत चांगले पीक येईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.

मात्र, आतापर्यंतचा प्रचार, एकूण वातावरण पाहता पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे भाजपचे पारडे जड असल्याचेच दिसून येते. आपले दोन नेते देशाचे नेतृत्व करताहेत, अशावेळी स्वतःच्या राज्यातून त्यांना ताकद देण्याची भूमिका गुजरातची जनता घेत असून, त्याचाच फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरात काँग्रेस कमकुवत होत असताना आणि काँग्रेसच्या ताब्यातील एकेक राज्य निघून जात असताना आम आदमी पक्षाने पंजाबची सत्ता मिळवली. त्याचवळी 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशात लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले आणि त्यानुसार मोर्चेबांधणी सुरू केली. एकीकडे काँग्रेसच्या गोटात प्रचाराच्या पातळीवर सामसूम असताना आम आदमी पक्षाने मात्र दोन्ही राज्यांमध्ये, त्यातही विशेषतः गुजरातमध्ये वातावरण ढवळून काढले. भाजपसमोर आपणच उभे असल्याचे चित्र निर्माण करण्यात केजरीवाल यशस्वी झाले. याचदरम्यान दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचे छापे आणि त्यांच्या चौकशीमुळे तापलेल्या वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाने केला.

भाजपला 'आप'ची भीती वाटत असल्यामुळेच या कारवाया करण्यात येत असल्याचा प्रचार करून 'आप'ने वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केल्यामुळे त्यांनी हिमाचल प्रदेशातील निवडणुकीकडे ढुंकूनही पाहिले नाही. गुजरातमध्ये मोजक्या सभा घेऊन आपली फक्त उपस्थिती दर्शवली. त्याचा काँग्रेसला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. कारण, एकीकडे मोदी-शहा यांनी वातावरण ढवळून काढले असताना आणि दुसरीकडे केजरीवाल यांनी त्यांच्याशी थेट संघर्ष उभा केला असताना काँग्रेस चित्रातच दिसत नव्हती. अखेरच्या टप्प्यात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रचार केला; परंतु त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा भाजपलाच फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुजरात विधानसभेच्या 2002 पासूनच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या जागा सातत्याने कमी होत आल्या आहेत. 2002 मध्ये 127, 2007 मध्ये 117, 2012 मध्ये 115 आणि 2017 मध्ये 99 अशी जागांची घसरण असली तरी सत्ता राखण्यात मात्र भाजपने यश मिळवले आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये तर भाजपच्या विरोधात वारे होते; परंतु तरीही अखेरच्या दिवसांत भाजपने वातावरण फिरवले. पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा आणि शहा यांचे सूक्ष्म पातळीवरील नियोजन यामुळे हे घडू शकले होते. पाटीदार आंदोलनाचा भाजपला फटका बसला होता आणि हार्दिक पटेलने काँग्रेसला जवळ केले होते. अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी हे आणखी दोन तरुण नेते आक्रमकपणे भाजपविरोधात लढत होते. राहुल गांधी यांना हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या तिघा तरुणांची साथ मिळाली होती. त्यातच नोटाबंदी आणि जीएसटीमुळे गुजरातचा व्यापारीवर्ग भाजपच्या विरोधात गेला होता.

सामाजिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर असंतोष असल्यामुळे लढत अटीतटीची बनली होती, तरीही अखेरीस भाजपनेच बाजी मारली होती. तुलनेने यंदा भाजपसाठी वातावरण अधिक पोषक मानले जाते. आम आदमी पक्षामुळे भाजपच्या शहरी भागातील मतांवर काहीसा परिणाम होणार असला तरी त्याचा अंतिम निकालावर किती परिणाम होईल, हे पाहावे लागणार आहे. भाजपसाठी एकच गोष्ट धोक्याची आहे ती म्हणजे, आम आदमी पक्ष काँग्रेसचे नुकसान करेल असे वातावरण असताना प्रत्यक्षात तो शहरी भागात परिणामकारक ठरत असल्यामुळे भाजपलाही त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे; परंतु या विभागणीचा फायदा घेण्याएवढी काँग्रेस सक्षम नसल्यामुळे भाजपसाठी चिंता करण्याचे कारण नाही. गेल्यावेळी भाजपपुढे आव्हान उभे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ज्या राहुल गांधी यांनी 'विकास वेडा झाला' अशी टॅगलाईन घेऊन निवडणुकीच्या मैदानात हवा तापवली होती, ते राहुल गांधीही प्रचाराच्या मैदानात नाहीत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे गुजरातची जबाबदारी असताना तेच सचिन पायलट यांना लक्ष्य करून काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत. काँग्रेससाठी अशा अनेक नुकसानकारक गोष्टी असताना पक्षाचे अध्यक्ष खर्गे यांनी अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे त्याचाही फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. गुजरातच्या अस्मितेचा मुद्दा त्यामुळे ऐरणीवर आणण्यात आला आहे. काँग्रेस प्रचारात दिसत नसली तरी गुजरातच्या ग्रामीण भागातील काँग्रेसचा प्रभाव कमी करण्यात भाजपला आजवर यश आलेले नाही. अशा परिस्थितीत पहिल्यांदाच होणार्‍या तिरंगी लढतीमुळे गुजरातचे गणित कसे बदलणार, याची उत्कंठा आहे. भाजपने सत्तेपर्यंत जाण्यात यश मिळवले तरी आम आदमी पक्षाच्या कामगिरीकडेही देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news