ऐतिहासिक अवकाशभरारी | पुढारी

ऐतिहासिक अवकाशभरारी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ओशनसॅट-03 सह नऊ नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून अवकाशात ऐतिहासिक भरारी घेतली आहे. इस्रोेची ही मोहीम म्हणजे आपल्या वैज्ञानिकांनी साकारलेल्या एका दीर्घकालीन मोहिमांपैकी एक आहे. या वर्षातील इस्रोची ही पाचवी आणि शेवटची मोहीम होती, ती यशस्वीपणे पार पडल्यामुळे भारताच्या अवकाश मोहिमेमध्ये त्यामुळे मानाचा तुरा खोवला गेला आहे. अर्थात, इस्रोने यापूर्वी अशा प्रकारच्या किंवा याहून मोठ्या अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या असल्याने या मोहिमेचे एखाद्याला फारसे कौतुक वाटणारही नाही; परंतु विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील छोट्यातले छोटे पुढे पडलेले पाऊल भविष्यातील मोठ्या उड्डाणाची पायाभरणी असू शकते. पाऊल छोटे असो किंवा मोठे, त्यामागे असंख्य शास्त्रज्ञांचे अनेक महिन्यांचे कष्ट आणि समर्पण असते.

ओशनसॅट-3 सह नऊ नॅनो उपग्रहांचे प्रक्षेपण ही ऐतिहासिक कामगिरी ठरते त्याची कारणेही अनेक आहेत. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून 1,117 किलो वजनाच्या ओशनसॅट-03 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहासह नऊ उपग्रहांचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केल्यानंतर ते निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या माध्यमातून पृथ्वी निरीक्षण उपग्रहासह नऊ अन्य उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये सोडण्यात आले.

पीएसएलव्ही-सी 54 या प्रक्षेपकाने या मोहिमेचे शिवधनुष्य पेलले. पीएसएलव्ही या प्रक्षेपकाचे हे 56 वे उड्डाण होते. उड्डाणानंतर सतरा मिनिटांनी ओशनसॅट हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि अन्य उपग्रह त्या त्या कक्षांमध्ये सोडण्यात आले. यासाठी प्रक्षेपकाने 742 किलोमीटरची उंची गाठली होती. ही संपूर्ण मोहीम दोन तासांच्या अवधीत पार पडली. इस्रोने भूतानसाठी तयार केलेला नॅनो सॅटेलाईट-2 (आयएनएस-2 बी) हा उपग्रह 7 अवकाशात सोडण्यात आला. यासोबत नॅनोएमएक्स आणि एपीआरएस- डीजीपीटर हे दोन पेलोडही होते. प्रक्षेपकातील अन्य पेलोडमध्ये बंगळूर येथील स्पेस स्टार्टअप पिक्सेलच्या आनंद या उपग्रहाचा समावेश होता. ध—ुव स्पेस या स्टार्टअपचे थायबोल्ट हे (दोन उपग्रह) तसेच अ‍ॅस्ट्रोकास्ट हा टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.

आठवडाभराच्या कालावधीत इस्रोने केलेली ही दुसरी महत्त्वाची कामगिरी असल्यामुळे त्यादृष्टीनेही ही विशेष महत्त्वाची आहे. अलीकडेच 18 नोव्हेंबरला इस्रोने देशातील पहिले खासगी रॉकेट विक्रम-एसचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. विक्रम-एस हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस नावाच्या खासगी अंतराळ कंपनीने तयार केले आहे. खासगी कंपन्यांचे रॉकेट अवकाशात पाठवणार्‍या देशांच्या यादीत त्यामुळे भारताचे नाव समाविष्ट झाले आहे. कोणत्याही देशाची प्रगती केवळ संबंधित देशाच्या आर्थिक स्थितीवरून मोजली जात नाही. आर्थिक स्थिती महत्त्वाची असली तरीसुद्धा इतरही महत्त्वाची परिमाणे असतात आणि वैज्ञानिक प्रगती हे त्यातील महत्त्वाचे परिमाण आहे. 1969 मध्ये स्थापन झालेल्या इस्रोने विविध प्रकारचे कृत्रिम उपग्रह आणि त्याअनुषंगाने प्रणाली विकसित केल्या.

1975 मध्ये आर्यभट्ट या कृत्रिम उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून अवकाश कार्यक्रमात पदार्पण केले, तिथंपासून सुरू झालेला प्रवास ओशनसॅटपर्यंत दिमाखात सुरू आहे. काही मोहिमांमध्ये अपेक्षित यश मिळत नाही, किंवा त्या अपयशी ठरतात; परंतु प्रत्येक अपयशी मोहिमेतही भविष्यातील मोठ्या भरारीची बीजे असतात आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांनी ते वेळोवेळी सिद्ध करून दाखविले आहे. इस्रोने आर्यभट्ट उपग्रहानंतर इन्सॅट जीसॅट, आयआरएस अशा संदेशवहन व हवामान अभ्यास तसेच पृथ्वी निरीक्षण करणार्‍या बहुउद्देशीय उपग्रहांच्या मालिका यशस्वी केल्या आहेत. सागरी निरीक्षण वातावरण अभ्यास, आपत्ती निवारण, खगोलीय संशोधन, तंत्रज्ञान विकास, वैश्विक स्थाननिश्चिती आदी क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरतील अशा उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. चंद्र आणि मंगळाकडे अवकाशयान पाठविणार्‍या इस्रोने विद्यार्थ्यांनाही उपग्रहनिर्मितीची संधी देऊन नव्या पिढीला या क्षेत्राकडे आकर्षित केले आहे.

आकाशवाणी, दूरचित्रवाणी, दूरध्वनी, इंटरनेट, संरक्षण या उपयोजनांसाठी संदेशवहनाचे कार्य करण्यासाठी इन्सॅट आणि जीसॅट मालिकेतील अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इस्रोने प्रक्षेपित केलेल्या आझादी सॅट नावाच्या सॅटेलाईटमुळे (कृत्रिम उपग्रह) अवकाशक्षेत्रात भारताचे एक नवे पाऊल पडले होते. एसएसएलव्ही डी वन रॉकेटने पृथ्वी पर्यवेक्षण उपग्रह ईओएस-02 आणि आझादी सॅट नामक आणखी एक लघु उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला होता. सॅटेलाईट अवकाशात प्रक्षेपित झाला तरी ही मोहीम यशस्वी होऊ शकली नव्हती. आझादी सॅट हा केवळ सॅटेलाईट नव्हता, तर ते साडेसातशे मुलींच्या भावनांचे प्रतिबिंब होते. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील सरकारी शाळांमधील मुलींना या प्रकल्पाशी जोडून घेण्यात आले होते.

मुलींमध्ये विज्ञानविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. या साडेसातशे मुलींमध्ये विज्ञानविषयक जागृती निर्माण करणे एवढाच मोहिमेचा मर्यादित उद्देश नव्हता, तर लाखो मुला-मुलींपर्यंत विज्ञान पोहोचविण्यासाठीचा हा एक प्रयोग होता. भारत आता अंतराळाशी संबंधित वस्तू आणि तंत्रज्ञानातील व्यापारी व्यवहारांना नियंत्रित करणार्‍या आंतरराष्ट्रीय समझोत्याचा घटक आहे. भारतासाठी बाह्य अवकाश यापुढे विकास आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा यांविषयीच्या संकुचित कल्पनांमधून बाहेर पडून व्यावसायिक आणि अर्थव्यवस्था-विकासाच्या शक्यतांकडे झेपावते आहे. जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत सध्याचा भारताचा वाटा जेमतेम दोन टक्के आहे. येत्या काही वर्षांत तो आठ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ही निश्चितच उमेद वाढविणारी घटना आहे.

Back to top button