लवंगी मिरची : प्लास्टिक रुपया म्हणजे काय हो भाऊसाहेब..?

लवंगी मिरची : प्लास्टिक रुपया म्हणजे काय हो भाऊसाहेब..?
Published on
Updated on

अहो फळवाल्या मावशीबाई, पन्नास रुपयांची सफरचंद द्या बरं जरा. पन्नासची नोट आहे का भाऊसाहेब तुमच्यापाशी? ती नसली तर निदान शंभरची तरी? नोटा कशाला हव्यात? जीपेने तेवढे रुपये देऊ की आपण. तसं आपल्याकडे क्रेडिट कार्डपण आहे म्हणा. पण अशी वरच्यावर देवघेव केली की उगाच सुट्टे, बंदे, ह्यांचे काही वांधेच नकोत यायला. अहो दादा, ते तसलं काही आपण आपल्याकडे ठेवत नसतो बरंका!

तसलं काही ? अहो मावशीबाई, आजकाल बहुतेक दुकानदारांकडे, ठेलेवाल्यांकडे पेटीएमची, जीपेची सोय असते की.
आसल. माझ्याकडे नाही. मी काही मोठ्ठा व्यापार करणारी नाहीये, मी आपली छोट्या जीवाची बाई.

ह्यात मोठं, छोटं काही नसतं बरं का मावशीबाई, अहो, आता दहा रुपयांचा कटिंग चहा पण जीपेतून घेता येतो. खिशात पैसे नसले तर!
राहू द्या हो. तुमच्याकडे आता दमडा नाहीच का? खरे रुपये नाही म्हणता? आन् खरेदीला निघता ?
काय चेष्टा करता का गरिबाची?

चेष्टा का म्हणता? अहो, तुम्हाला पैसेे मिळाल्याशी कारण ना? जसे खिशातले प्रत्यक्ष रुपये तसे खात्यातले हे प्लास्टिकचे रुपये समजा की!
बाबो! आता पैसापण प्लास्टिकचा करायला निघालात? वर म्हणता, सेमच आहेत ना दोन्ही? मग मला आपले खिशातले रुपयेच द्या राव. नसत्या झंझटमध्ये अडकवू नका.

मावशीबाई, प्लास्टिकचे रुपये हे काही झंझट किंवा संकट नाहीये. उलट तुमची बरीचशी सोय आहे त्यात. जरा हाताला सवय करून घ्या, म्हणजे काही अवघड वाटणार नाही त्याचं.
नको बाबा. आधीच दातावर मारायला पैसा नाही, त्यात हे खर्‍या-खोट्या रुपयाचं लचांड कुठे गळ्यात घेऊ?
त्याचे फायदे एकदा समजले की, असं उलटं म्हणणार नाही तुम्ही. आता बघा, रोख पैसे जपावे लागतात. खिसा-पाकिटात सांभाळावे लागतात.

काही विचारू नका. आमच्यासारख्यांचे पैसे तर गहाळ होतात, चोरीला जातात, कोणीकोणी खोट्या नोटा हातात कोंबून पसार होतात ते वेगळेच!
म्हणजे रोख पैसा आला की तो सांभाळणं, जपणं, आलंच. बरोबर?

नाही तर ऊठसूटबँकेत जावा, पैसे भरा, काढा, हा व्याप होतो.
आपल्या प्लास्टिकच्या रुपयाला चोरीचं भय नाही. जवळपास बँक आहे की नाही?, असली तरी ती सुरू आहे की नाही? तिच्या कामाच्या वेळा काय? असला कीस पाडायला नकोच मुळी! एकाच्या खात्यातून दुसर्‍याच्या खात्यात अलगदपणे जाऊन पडतील पैसे!

आम्हाला कुठला पैसा कधी अलगद मिळायला बसलाय? आमची सगळी जिंदगानी ढोर मेहनतीतच जायची करता करता. त्यातही फाटक्या नोटा देणारे, न चालणारी नाणी हातात कोंबणारे लबाड लोक भेटणार ते वेगळेच.
बघा. नगद पैसा मोजून केलेल्या व्यवहारात किती गफलती होताहेत ते तुम्हीच सांगताय. तरी सगळं रोखीचं हवं म्हणून आग्रहही करताय.
त्याचा भरवसा वेगळा पडतो ना साहेब?

त्याच्यापेक्षा खूप जास्त भरवसा देणार्‍या पद्धती येताहेत आता. कागदी नोटा छापायचा खर्च पडतो सरकारला. हाताळून, चुरगळून, भिजून वगैरे त्या खराबही होतात. त्यापेक्षा हे नवे व्यवहार अंगी मुरवा मावशीबाई. सगळी लांडीलबाडी, दगाफटका संपेल, हातोहात कामं होतील.
बघते साहेब कसं जमतं ते! आम्ही अडाणी माणसं, रोजच्या धकाधकीनेच हैराण असतो. त्यात नवी तंत्रं नको वाटतात.

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news