

आपले आरोग्य उत्तम आहे. कुठलाही त्रास नाही. हे आपण बर्याचदा शारीरिक अवस्थेवरून सांगतो; पण जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या व्याख्येत शारीरिक आरोग्यासह मानसिक आणि सामाजिक आरोग्याचासुद्धा समावेश केला आहे. एखाद्या व्यक्तीला एकंदरीत स्वस्थ वाटणे, भावना सुखकारक असणे, नकारात्मक भावनांचा अतिरेक नसणे, जीवनातील उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करणे तसेच उद्दिष्ट सफल झाले नाही तरीही वाईट वाटून न घेता संतुलित जीवन जगणे, अशी दीर्घकालीन मानसिक अवस्था म्हणजे मानसिक स्वास्थ्य असे म्हणता येईल.
1992 मध्ये सर्वप्रथम जागतिक मानसिक आरोग्य दिनाची सुरुवात झाली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेंटल हेल्थ या संघटनेने अधिकृतपणे 10 ऑक्टोबर हा दिवस 'मेंटल हेल्थ डे' म्हणून ठरवला. 1994 पासून या दिवसाची एक विशिष्ट थीम ठरवण्यात आली. दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स ठेवून त्यांना अनुसरून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. 'मेंटल हेल्थ डे'पूर्वी 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत 'मेंटल हेल्थ अवेअरनेस वीक' साजरा केला जातो. या कालावधीमध्ये मानसिक आरोग्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यात येते. 2022 साठी 'मेक मेंटल हेल्थ अँड वेल बीईंग फॉर ऑल अ ग्लोबल प्रॉयोरिटी' अशी थीम ठरवली आहे. कोरोनानंतर लोकांच्या मानसिक आरोग्यात अनेक चढउतार झालेले पाहायला मिळत आहेत.
जगभरात मानसिक समस्यांमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. युवा वर्गामध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त लोक नैराश्याचा सामना करत आहेत. जागतिक लोकसंख्येच्या 4 टक्के लोक जनरल अॅँझायटी डिसॉर्डरग्रस्त आहेत. यात महिलांचे प्रमाण 62 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जगात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. भारतात तर दरवर्षी आत्महत्यांच्या घटनांमध्ये दोन टक्क्यांनी वाढ होत आहे. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक झालेल्या या वातावरणात तज्ज्ञांचीसुद्धा कमतरता जाणवत आहे. मानसिक समस्याग्रस्त व्यक्तींचा फुगलेला आकडा आणि त्या तुलनेत या क्षेत्रातल्या सेवा देणारे तज्ज्ञ यांच्या आकडेवारीत तफावत जाणवते. मानसिक आजार वेगवेगळ्या प्रकारचे असतात चिंताग्रस्तता, फोबिया किंवा भयगंड, ऑबसेसिव्ह कम्पल्सिव्ह डीसॉर्डर अथवा नादीष्टपणा, बॉडी डीसफॉर्मिक डीसॉर्डर, ताणतणाव असे सर्वसाधारणपणे आजार असतात. लहान मुलांमध्ये हायपर अॅॅक्टिव्ह चाईल्ड, वेगवेगळ्या प्रकारच्या लर्निंग डिसॅबिलिटीज, अस्पर्जर सिंड्रोम, परव्हेजीव्ह डेव्हलपमेंट डीसॉर्डर, रेट सिंड्रोम, चाईल्डहुड डिसईंटीग्रेटिव्ह डीसॉर्डर असे काही विकार आढळतात. त्यांना एकत्रितपणे ऑटिझम स्पेक्ट्रम असे म्हणतात, तर वृद्धांमध्ये वयाच्या साठीनंतर डिमेन्शिया अल्झायमर अशा प्रकारचे आजार आढळतात.
तसेच निद्रानाश, अतिकाळजी, वेगवेगळ्या प्रकारचे फोबियाज, चिंताग्रस्तता यांचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आढळते. याशिवाय प्रसूतीनंतर होणार्या हार्मोन्सच्या बदलांमुळे अनेकदा स्त्रियांना नैराश्याला समोरे जावे लागते. या सर्व प्रकारच्या मानसिक आजारांसाठी उपचार आणि समुपदेशन आवश्यक असते. कारण, हे आजार व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावर मोठा परिणाम करत असतात. दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टी करण्यावर मानसिक आजारांमुळे मर्यादा येतात. व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनावरसुद्धा मानसिक आजार परिणाम करत असतात. रुग्णाच्या विचित्र वागणुकीमुळे कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण होतात. कुटुंबाला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. व्यक्तीच्या काम करण्यावर मर्यादा येतात, व्यावसायिकदृष्ट्या व्यक्तीचे नुकसान होते. त्यातून आर्थिक प्रश्न निर्माण होतात. त्याचबरोबर मानसिक समस्या असतील तर शिक्षण घेताना अडचणी निर्माण होतात, तर काही वेळेला शैक्षणिक यशाच्या दबावामुळे मुलांमध्ये ताणतणाव निर्माण होतात आणि हे ताणतणाव पुढे डिप्रेशन, चिंताग्रस्तता, फोबिया यांसारख्या मानसिक आजारांचे रूप घेऊ शकतात.
मानसिक आजार व्यक्तीच्या सामाजिक जीवनावरसुद्धा परिणाम करतात. रुग्णाचे वर्तन समाजमान्य नसल्याने ते इतरांना खटकते, तर काही वेळेला समाजविघातक कृत्य घडण्याचीसुद्धा शक्यता असते. अशाप्रकारे मानसिक समस्या व्यक्तीचं जीवन सर्व बाजूंनी व्यापून घेतात. त्यामुळे या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्वरित मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. स्किझोफेनिया, मेनिया या प्रकारच्या सायकोटिक डीसॉर्डर्समध्ये व्यक्तीला स्वतःच्या आजारपणाची जाणीवच नसते. अशावेळी कुटुंबाने त्यांना मनोविकारतज्ज्ञांकडे घेऊन जाणे गरजेचे असते. सतत नकारात्मक विचार, झोप न लागणे, जेवण कमी किंवा अति होणे, तेच तेच विचार पुन्हा पुन्हा येणे, आत्महत्येचे विचार ही नैराश्याची लक्षणे आहेत. अशा प्रकारची लक्षणे साधारणपणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आपल्याला जाणवत असतील तर ही धोक्याची घंटा आहे, असे समजून त्वरित समुपदेशक आणि मनोविकारतज्ज्ञाकडे जाणे गरजेचे आहे.
मानसिक समस्याग्रस्त व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपणही आता बदलायला हवा. याही व्यक्ती नॉर्मल जीवन जगू शकतात; पण आपण त्यांना तसे जगू द्यायला हवे. अनेक सेलिब्रिटी आता आपण सामोरे गेलेल्या मानसिक समस्यांविषयी खुलेपणाने बोलत आहेत, ही एक आशादायक बाब आहे.