लवंगी मिरची : तयारी! | पुढारी

लवंगी मिरची : तयारी!

काय हो आबुराव, कुठे निघालात? तेही असं कपड्यांचं गाठोडं की काय ते हातात घेऊन?
जुने कपडे आहेत, अनाथाश्रमात देण्यास निघालोय.
अहो, जेमतेम पाचसहा वेळा घातलेले कपडेही रद्द करतात ना अलीकडे.
जुने कपडे आहेत म्हणता? दोन-चार मस्त टरकलेले, विटके, फाटके वगैरे शर्ट आहेत का त्यात?
कपडे पार फाटेपर्यंत घालतोय कोण? पण मला सांगा, जुने झिजके कपडे तुम्हाला तरी कशाला हवेत?
मला नाही, आमच्या जावयांना हवेत वाटतं.
अरेरे, एवढी हालाखी आली का त्यांची?
नाय हो, नगरपालिकेला उभं राहणार म्हणताहेत.
बाबो, निवडणुकीच्या खर्चाने पिचून निघणार, म्हणून आतापासूनच लक्तरांची सवय करायला निघाले की काय ते? भारी दिसताहेत तुमचे जावई.
मग? जावई कोणाचे आहेत? एरवी कपडे, घड्याळं, पेन, बुटं याबद्दल फार चोखंदळ आहेत बरं ते.
नेहमी कडकमध्ये असतात; पण आता उभे राहिले, निवडून आले की, मग सारखे लोकांच्या डोळ्यासमोर राहाणार. तेव्हा म्हणताहेत, उगाच कडक कपडे जनतेच्या डोळ्यावर यायला नकोत.
लोक त्यांचं काम बघतील का कपडे बघतील?
कपडे! उगाच काहीतरी सांगताय तुम्ही.
उगाच काय? पुरावा आहे आपल्याकडे. कोणी नेत्याने दहा लाखांचा सूट घातला, कोणी पन्नास हजारांचा टी-शर्ट घातला, यावर चर्चा होते का आपल्यात?
ते सोडा हो. माध्यमांना नाही दुसरा उद्योग.
नुसती माध्यमंच नाहीत, रस्त्यारस्त्यावर तशी उंची कपड्यांमधली पोस्टर्स लागतात ह्या लोकांची. त्याने निदान टीका करण्यात, खिल्ली उडवण्यात तरी भारत जोडला जातो तेवढ्यापुरता.
शक्य आहे. नेत्यांची बदनामी होते खरी त्यातून. लोकही बहाद्दर आपले! नेत्यांच्या कामांबद्दल बोलायचं सोडून फक्त पेहरावांबद्दल बोलतात.
कामाबद्दल बोलण्याजोगं आढळत नसेल लोकांना.
तसाही, एकूण व्यवस्थेत फार वेगळं, ठळक काम करायला कितीसा वाव मिळतो हो? जो तो आपापली टर्म सुखरूप पार पडावी इतकाच धडपडणार. म्हणून जावई म्हणत असतील तसं. शिवाय आपल्या नावाचे फलक, पाट्या वगैरेही करून ठेवणारेत म्हणे.
ते आणि कशापायी?
ते जिथे बसतील तिथे मागे न विसरता नावाचा फलक लावणारेत म्हणे. तो सोबत घेऊनच फिरणार!
तो आणि कशाला?
अहो, उगाच भलत्याच वजनदार नावाच्या पाटीसमोर बसल्याचं पाप नको यायला डोक्यावर. लगेच तू काय सोताला सभापती समजतोस का? मुख्यमंत्री समजतो का? वगैरे विचारत सुटतात ना लोक.
व्वा! खूपच विचार केलाय तुमच्या जावयांनी. आता निवडून आल्यावर नगरपालिकेची कोणकोणती कामं अर्जंटमध्ये व्हायला पाहिजेत याचा अंदाजही घेतलाच असेल ना?
कामांचं काय नाही हो एवढं. झाली तर झाली, नायतर राहिली. त्यांचा आवाका समजेपर्यंत टर्म संपायला येते कोणाकोणाची. यापुढे निवडणुकीला उभं राहायची तयारी, म्हणजे हे असंच करावं लागणार. पेहराव सलामत तो निवडणुका पचास. काय समजलेत?

– झटका

संबंधित बातम्या
Back to top button