ममता बॅनर्जी यांचा सूर का बदलला? | पुढारी

ममता बॅनर्जी यांचा सूर का बदलला?

ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते अडचणीत आले आहेत. अशावेळी तृणमूलच्या सर्वेसर्वा म्हणून ममता बॅनर्जी या सरकारवर टीका करतील अशी अपेक्षा होती; पण केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात नसून भाजप नेत्यांचा एक गट स्वार्थासाठी ही खेळी खेळत आहे. सीबीआय कारवाईला गृह मंत्रालय जबाबदार असते, असे मत ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत मांडलेे आहे. हे वक्तव्य सर्वांना बुचकळ्यात टाकणारे आहे.

राजकारणात कधी काय होईल, हे सांगणे कठीण आहे. शत्रू असणारे कधी मित्र होतील आणि मित्र असणारे कधी शत्रू होतील, याचा थांगपत्ता लागत नाही. अशा प्रकारची प्रचिती देणार्‍या घटना राजकीय वर्तुळात घडताना दिसून येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये असेच काहीसे पाहावयास मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांची मोट बांधणार्‍या आणि दिवस-रात्र केंद्र सरकारला दूषणे देणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सूर अचानक बदलल्याने स्वपक्षातील नेते गोंधळून गेले आहेत. सध्या बंगालमध्ये भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि तस्करीच्या विरोधात सीबीआय आणि ईडीकडून जोरदार कारवाया होत असल्याने तृणमूल काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. पक्षाचे अनेक नेते, खासदार, आमदार एवढेच नव्हे तर मंत्रीदेखील गोत्यात आले आहेत. तृणमूल काँग्रेसची प्रतिमा डागाळत असताना ममता बॅनर्जी यांनी अचानक यू-टर्न घेत या कारवाईला नरेंद्र मोदी जबाबदार नसल्याचे स्पष्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत पंतप्रधान मोदी यांचा हात नसल्याचे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्यांच्या मते, भाजप नेत्यांचा एक गट स्वार्थ साधण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. सीबीआय आपल्या कारवाईला ‘पीएमओ’ला नाही, तर गृह मंत्रालयाला जबाबदार असते. या वक्तव्याने ममतांचे बदललेले सूर लक्षात येतात. अर्थात, 2014 पासून मोदी सरकारला धारेवर धरणार्‍या ममता बॅनर्जी याच्या वक्तव्याने एक गोेष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे मोदी यांना ‘क्लीन चिट’ देत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरले आहे.

ममता बॅनर्जी यांचा मोदी यांच्याबाबत सूर अचानक का बदलला, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय डावपेचात बदल करून मोदी यांच्यावर थेट टीका करण्याऐवजी अन्य नेत्यांवर टीकास्त्र सोडण्याचे धोरण अवलंबिले का किंवा यामागे आणखी काही कारण आहे का? खरोखरच त्या पंतप्रधानांबाबत मवाळ झाल्या आहेत का? याचे उत्तर ‘होय’ असेल तर, असे काय घडले की, ममता यांच्यात नाट्यमयरीत्या बदल झाला अन् मोदी त्यांना चांगले वाटू लागले. विधानसभेत भूमिका मांडल्यानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष वेगवेगळी मतं मांडत आहेत. बंगालमधील भ्रष्टाचार, गैरव्यवहार प्रकरणात तृणमूलचे नेते, मंत्री अणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी ही मंडळी अडकली असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी ममता बॅनर्जी तडजोड करत आहेत, असे काही जण म्हणत आहेत.
19 सप्टेंबर रोजी बंगाल विधासनभेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात एक प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाच्या बाजूने 189, तर विरोधात 69 मते पडली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी 27 मिनिटे भाषण केले. त्यांच्या भाषणाने सर्व जण गोंधळून गेले. ममता बॅनर्जी यांचा प्रश्न होता की, केंद्रीय तपास यंत्रणांनी अशा पद्धतीने काम करायला हवे का? मला वाटत नाही की, यामागे पंतप्रधान असतील; परंतु भाजपचे काही नेते असू शकतात आणि ते सीबीआय व ईडीचा दुरुपयोग करत आहेत. ममता यांच्या भाषणाने सभागृहाला आश्चर्याचा धक्का बसला.

कारण विधानसभेत बोलण्याअगोदर ममता बॅनर्जी यांनी मोदी हे सीबीआय व ईडीच्या माध्यमातून विरोधकांविरुद्ध कारवाई करत असल्याचा आरोप केला होता. सभागृहात त्या म्हणाल्या की, हा प्रस्ताव कोणावर टीका करण्यासाठी आणलेला नाही. कारवाईत पक्षपातीपणा नको, तटस्थपणा हवा. ममता म्हणाल्या की, सीबीआय वाईट आहे, असे मी म्हणत नाही. या ठिकाणी बीएसएफ, सीआयएसएफ, एसएसबी, आयबी, रॉ आणि अनेक संस्थादेखील आहेत; परंतु आपण कोणा एकाची बाजू घेण्याऐवजी तटस्थ राहावे, अशी अपेक्षा आहे. या भाषणावरून आणखी एक अर्थ काढला जात आहे की, मोदींवर थेट टीका केल्याने जनतेची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा पक्षातील अन्य नेत्यांवर टीका करणे सोयीचे ठरेल आणि हे ममता बॅनर्जींना कळून चुकले आहे का?

शिक्षक भरती गैरव्यवहारापासून कोळसा तस्करीसह अनेक प्रकरणांत ईडीने बंगालमध्ये 21 ठिकाणी छापेमारी केली आहे. गेल्या काही महिन्यांत ईडी आणि सीबीआयने 100 पेक्षा अधिक प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत. शारदा चिटफंड, रोझव्हॅली चिटफंड गैरव्यवहार, नारदा स्टिंग ऑपरेशन, कोळसा तस्करी, निवडणुकीनंतरचा हिंसाचार, स्कूल सेवा आयोग भरती, शिक्षक पात्रता परीक्षा आदींच्या माध्यमातून केलेला गैरव्यवहार, बीरभूम येथील बोगटूई हत्याकांड आणि हासखाली शोषण आणि हत्याकांडाचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. त्याचबरोबर बोगटूई, हासखालीच्या घटना वगळता ईडीकडून सर्व प्रकरणांचा तपास केला जात आहे.

एवढेच नाही तर बिहारपासून दिल्ली, महाराष्ट्र, झारखंडसह अनेक राज्यांत सीबीआय आणि ईडीच्या कारवायांवरून विरोधी पक्ष नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ममता बॅनर्जींकडून ‘क्लीन चिट’ देणे ही गोष्ट काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या पचनी पडताना दिसून येत नाही. काँग्रेसने मात्र थेट आरोप करत ममता बॅनर्जी सेटिंग करत असल्याचे म्हटले आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते, बंगाल सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्याला केंद्राकडून आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे थेट संघर्ष टाळण्याचा प्रयत्न असू शकतो. एवढेच नाही तर ममता बॅनजीर्र् यांनी या महिन्याच्या प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुकदेखील केले होते.

– सरोजिनी घोष

Back to top button