‘गजोधर भैया’ची एक्झिट | पुढारी

‘गजोधर भैया’ची एक्झिट

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आणि 42 दिवसांपासून सुरू असलेली त्यांची मृत्यूशी झुंज संपली. रसिक प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाच्या माध्यमातून मनमुराद हसवणारा हा कलाकार होता. महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभियनापासून प्रेरणा घेत मुंबईत आलेले राजू श्रीवास्तव हे सुरुवातीच्या काळात एका स्टेज शोसाठी केवळ 50 रुपये घेत. कालातंराने हीच रक्कम लाखांवर पोहोचली. त्यांचे हावभाव, विनोद आणि गजोधर प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहतील.

राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव ऊर्फ गजोधर भैया असे होते. ते मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचे. शाळेतील आपल्या शिक्षकांची नक्कल करून ते मित्रांचे मनोरंजन करायचे. काही शिक्षक राजूला रागवायचे, तर काहीजण प्रोत्साहन द्यायचे. एका शिक्षकाने त्यांना कॉमेडीत करिअर करण्याचा सल्ला दिला. यादरम्यान राजू यांनी स्थानिक क्रिकेट सामन्यात कॉमेंट्रीही केली. लहानपणापासूनच ते कॉमेडियन होऊ इच्छित होते; परंतु त्यामागची प्रेरणा होते अमिताभ बच्चन. ते 1982 साली मुंबईत आले. तेथे राहण्यासाठी घर नव्हते आणि खाण्यासाठी पैसा. घरातून येणारे पैसे कमी पडू लागले तेव्हा ते ऑटोरिक्षाचालक बनले. राजू आपल्या प्रवाशांनादेखील हसवत असत. त्यांना मुंबईत चार ते पाच वर्षे संघर्ष करावा लागला.

लेखन आणि स्टँडअप कॉमेडी करताना ते यशस्वीपणे ‘लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमापर्यंत पोहोचले आणि याच कार्यक्रमातून त्यांना जगभरात ओळख मिळाली. 1990 च्या दशकात राजू श्रीवास्तव यांंचा स्टँडअप कॉमेडीला बहर आला. कॉमेडी शो, लाफ्टर चॅलेंजसारख्या माध्यमातून त्यांना लोकप्रियता मिळाली. गजोधर भैयाच्या सादरीकरणासाठी त्यांचे कौतुक झाले. या काळापासून त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. ‘लाफ्टर शो’च्या तिसर्‍या पर्वात सहभाग घेण्यापूर्वी ते लोकप्रिय टीव्ही शो ‘देख भाई देख’, ‘टी टाइम मनोरंजन’ आणि ‘शक्तिमान’मध्येही चमकले.

2005 च्या लाफ्टर चॅलेंजनंतर त्यांनी बिग बॉस, कॉमेडी सर्कस, लाफ इंडिया लाफ, नच बलिए, द कपिल शो यांसह अनेक टीव्ही शो केले. राजू श्रीवास्तव यांनी लहान भूमिका साकारल्या असल्या तरी त्या संस्मरणीय ठरल्या. त्यांची ‘बॉम्बे टू गोवा’ (नवा) चित्रपटातील अँथोनी गोन्साल्वेसची भूमिका गाजली. त्यांचा हसरा चेहरा आणि भोळेपणा भारतीय प्रेक्षकांनाच नाही, तर जगभरातील चाहत्यांना भावला. मध्यंतरीच्या काळात त्यांनी दहशतवाद आणि दाऊद इब्राहिमची खिल्ली उडवली तेव्हा पाकिस्तानातील चाहते नाराज झाले. त्यांना 2010 मध्ये पाकिस्तानातून धमक्या आल्या. त्यामुळे त्यांनी त्यापासून दूर राहणे पसंत केले. राजकीय टीका-टिपणी टाळण्याबरोबरच देशहिताला बाधा येणार नाही, धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी राजू श्रीवास्तव यांनी घेतली.

भारतीय प्रेक्षकांबरोबरच जगाला मनमुरादपणे हसवणार्‍या राजू श्रीवास्तव यांची दहा वर्षांत तिसर्‍यांदा अँजिओप्लास्टी झाली. पहिली अँजिओप्लास्टी दहा वर्षांपूर्वी मुंबईच्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आणि सात वर्षापूर्वी मुंबईच्याच लीलावती रुग्णालयात केली. 10 ऑगस्ट 2022 रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टरांनी तिसर्‍यांदा अँजिओप्लास्टी केली. राजू श्रीवास्तव दिल्लीत गृहमंत्री अमित शहा अणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या भेटीची वेळ ठरलेली होती. ते हॉटेलमध्ये थांबले. खोलीत काही वेळ थांबल्यानंतर ते व्यायाम करण्यासाठी जीममध्ये गेले. तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याच दिवशी सायंकाळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली; परंतु राजू यांचा मेंदू प्रतिसाद देत नव्हता. पल्सदेखील 60 ते 65 च्या आसपास राहात होते. दिल्लीत उपचार सुरू असताना 13 ऑगस्ट रोजी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी राजू यांना एक ऑडिओ संदेश पाठविला. त्यात अमिताभ बच्चन म्हणतात की, ‘राजू ऊठ, खूप झाले आता. खूप काम करायचे आहे. आता ऊठ. आम्हाला सर्वांना हसायला शिकवलेस…’ पण राजू यांची हास्यजत्रा आता कधीच भरणार नाही. यूट्यूबवर राजू यांचे कॉमेडी शो पाहावयास मिळतील; परंतु प्रत्यक्षात या कॉमेडीस्टारचे दर्शन घडणार नाही.

– सोनम परब

Back to top button