अभियंता दिन ‍विशेष : स्मरण विश्वेश्वरय्यांच्या कार्याचे

अभियंता दिन ‍विशेष : स्मरण विश्वेश्वरय्यांच्या कार्याचे
Published on
Updated on

सर्वात जुनी आणि प्रभावी ज्ञानशाखा म्हणून नागरी अभियांत्रिकीला ओळखले जाते. या क्षेत्रात भारताचे दमदार पाऊल कुणी टाकले असेल, तर ते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी. आज त्यांचा जन्मदिन. हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी देशात अभियांत्रिकीचा पाया घातला, असे म्हणता येईल. 15 सप्टेंबर 1860 रोजी कर्नाटकातील सध्याच्या चिकबल्लूर जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी या गावात त्यांचा जन्म झाला. मद्रास विद्यापीठाची कला शाखेची पदवी घेतल्यानंतर पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी पदविका परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे अनुभवाच्या कक्षा रुंदावत जाऊन त्यांनी अभियंता हा बहुमान संपादित केला. बीईपेक्षा अधिक उच्च दर्जाचे तंत्रकौशल्य संपादन केले. तत्कालीन मुंबई सरकारने त्यांना कुशल अभियंता म्हणून सेवेत निमंत्रित केले.

शालेय जीवनापासून ते अभियांत्रिकी शिक्षणापर्यंत हुशार, चतूर आणि चाणाक्ष विद्यार्थी म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला. सर्वात जुनी आणि प्रभावी ज्ञानशाखा म्हणून नागरी अभियांत्रिकीला ओळखले जाते. या क्षेत्रात भारताचे दमदार पाऊल कुणी टाकले असेल, तर ते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी. पाचवा जॉर्ज यांच्या काळात त्यांना 'सर' या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप त्यांनी अनेक शहरांवर, धरणांवर, प्रकल्पांवर ठेवली आहे. अभियंत्याने कसे असावे, कसे वागावे? आपल्या तांत्रिक ज्ञानाचा देशासाठी आणि समाजासाठी कसा वापर करावा, याबाबतीत त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि मूल्ये इतकी प्रभावशाली आहेत की, आजच्या काळात कोणत्याही अभियंत्याने त्याआधारे वाटचाल केल्यास त्याचे जीवन संपूर्णपणे उजळून जाऊ शकते. आज जल नियोजन, महापुराचे नियोजन आणि महानगरांची रचना याबाबतीतील अनेक कूट प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूरच्या चौथ्या वडियार घराण्यात 1912-1916 या काळात दिवाण म्हणून काम पाहिले. या कालखंडात त्यांनी कृष्णराज सागर हा त्या काळातील आशियातील सर्वात मोठा धरण प्रकल्प बांधला.

मुंबई, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अनेक धरणांची उभारणी केली. पुण्याजवळच्या खडकवासला जलाशयाच्या निर्मितीचे योगदानही विश्वेश्वरय्या यांच्याकडेच जाते. वयाच्या 90 व्या वर्षी बिहारमध्ये गंगा नदीच्या काठी मोठा पूल उभारण्याची योजना तयार केली. आजही हा पूल भक्कमपणे उभा आहे. धरणांचे दरवाजे उघडण्याची पद्धत भारतात प्रथमतः विश्वेश्वरय्या यांनीच तयार केली. धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा संचय कमी करण्याबाबतचे त्यांनी बांधलेले आराखडे हे खरोखरच अद्भूत आणि आश्चर्यकारक होते. कर्नाटकातील म्हैसूर प्रदेशाचे ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिकीकरण करण्याचे श्रेय विश्वेश्वरय्या यांच्याकडे जाते. त्यांनी अमेरिका, चीन, रशिया, कॅनडा, जपान या देशांना भेटी देऊन नवभारताचा एक प्रतिभाशाली तंत्रज्ञ अभियंता म्हणून जागतिक पातळीवर छाप टाकली होती. अभियंता किंवा तंत्रज्ञ हा शब्द या 'इंजिनिअम' या लॅटीन शब्दापासून बनला आहे.

याचा अर्थ वस्तूला किंवा सेवेला अंतर्गत गुणवत्ता प्राप्त करून देणारा तंत्रज्ञ असा होतो. आपण निर्माण केलेल्या वस्तू किंवा सेवा या सकल मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत. त्यात थोडी जरी चूक झाली तर भावी पिढीचे नुकसान होऊ शकते याची सदैव जाणीव अभियंत्याकडे असली पाहिजे. अशी सामाजिक जबाबदारीची भावना विश्वेश्वरैया यांनी ठेवली होती. तंत्रज्ञांनी श्रेष्ठ गुणवत्ता जोपासावी आणि सामाजिक बांधिलकीही जपावी असा त्यांचा आग्रह होता. समाजातील दुःखी, कष्टी लोकांना ईश्वरी सेवा देणे हे तंत्रज्ञाचे काम आहे, हे विश्वेश्वरय्या यांचे सूत्र होते. वर्तमान काळातील प्रत्येक अभियंत्याने समाजाची आणि देशाची सेवा करण्यासाठी अव्वल दर्जाची श्रेष्ठ गुणवत्ता जोपासणे आणि आपले तंत्रज्ञान देशाच्या चरणी समर्पित करणे हेच त्यांचे खर्‍या अर्थाने स्मरण ठरेल.

– सुनील चोरे,
मनुष्यबळ विकास क्षेत्राचे अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news