प्रासंगिक : ई-कचर्‍याचे वाढते संकट | पुढारी

प्रासंगिक : ई-कचर्‍याचे वाढते संकट

– जयदीप नार्वेकर 

ई-कचर्‍याचे वाढते संकट : इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्यापासून मुक्‍तता मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे एक उदाहरण आपल्याला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळाले. विजेत्या खेळाडूंना दिलेली पदके कचर्‍यात जमा झालेल्या मोबाईल (स्मार्ट फोन) आणि लॅपटॉप यातील सोने, चांदी आणि ब्राँझपासून सुमारे पाच हजार पदके बनवली होती. जपानमध्ये 2017 मध्ये सुरू केलेल्या टोकियो मेडल प्रोजेक्टमध्ये जपानमधील 90 टक्के शहरांमधील 80 टन वजनाचे जुने स्मार्ट फोन आणि लॅपटॉप गोळा केले होते. रिसायकलिंगमधून 32 किलो सोने, सुमारे 330 किलो चांदी आणि सुमारे 2 हजार 250 किलो तांबे बाजूला काढले आणि त्यापासून ही पदके तयार केली.

ई-कचर्‍याचे वाढते संकट :

ऑलिम्पिकमध्ये होत असलेल्या अशा प्रयत्नामधून जगाला असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे की, जर इलेक्ट्रॉनिक कचर्‍यापासून मुक्‍तता मिळविण्यासाठी गंभीर प्रयत्न सुरू केले गेले नाहीत, तर संपूर्ण प्राणिजगतासाठी तो एक गंभीर धोका ठरेल. हा धोका किती गंभीर असेल, याचे तपशील हादरवून टाकणारे आहेत. एका अभ्यासाच्या निष्कर्षातून असे सांगण्यात आले आहे की, 2019 मध्ये जागतिक स्तरावर विक्रमी प्रमाणात म्हणजे 5 कोटी 36 लाख टन ई-कचरा तयार झाला. क्‍विन मेरी-2 एवढा आकार असलेल्या साडेतीनशे क्रूझ जहाजांच्या वजनाइतका हा कचरा आहे. या कचर्‍याचे दरडोई प्रमाण काढायचे झाल्यास प्रतिव्यक्‍ती सुमारे साडेसात किलो ई-कचरा तयार झाला.

संबंधित बातम्या

जगभरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मागणीसह ई-कचर्‍याच्या प्रमाणातही वाढच होत चालली आहे. जगातील स्मार्ट फोनची संख्या जगाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. आठ वर्षांपूर्वी 2013 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन (आयटीईआर) या संस्थेकडून ‘मॅनेजमेंट अँड हँडलिंग ऑफ ई-वेस्ट’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांनी एक अंदाज वर्तविताना असे सांगितले होते की, भारतात दरवर्षी सुमारे आठ लाख टन ई-कचरा तयार होत आहे. हा कचरा निर्माण करण्यात देशातील 65 शहरांचा मोठा वाटा आहे; मात्र सर्वाधिक ई-कचरा मुंबईत निर्माण होत आहे.

अशा प्रकारच्या ई-कचर्‍यापासून मानवाला आणि पर्यावरणाला निर्माण होणारा धोका, हा प्रमुख मुद्दा आहे. एका स्मार्ट फोनच्या बॅटरीमुळे तब्बल सहा लाख लिटर पाणी दूषित होते. याखेरीज एका पर्सनल कॉम्प्युटरमध्ये 3.8 पौंड शिसे आणि फॉस्फरस, कॅडमियम आणि पार्‍यासारखे घातक घटक असतात. कॉम्प्युटरच्या स्क्रीनमधील कॅथोड रे पिक्चर ट्यूबमधून मोठ्या प्रमाणात शिसे वातावरणात सोडले जाते. कचर्‍यात जाणार्‍या या वस्तू अंतिमतः मानव आणि अन्य प्राणिमात्रांना कर्करोगासारख्या भयावह आजारांची देणगी देतात.

परदेशांमधून ई-कचरा मागवून त्यातून उपयुक्‍त घटक बाजूला करण्याचा व्यवसाय देशातील अनेक भागांमध्ये चालला आहे. जुने लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल फोन, बॅटर्‍या, कंडेन्सर, सीडी आणि फॅक्स मशीन रसायनांमध्ये बुडवून त्यातून थोड्या-फार प्रमाणात सोने, चांदी, प्लॅटिनम आदी धातू काढण्याचे हे प्रयत्न आपल्याकडील पाणी आणि जमिनी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित करीत आहेत. हे प्रयत्न अप्रत्यक्षरीत्या जीवघेणेही ठरू शकतात. आपल्या देशात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊ द्यायचे नाही, याबाबत विकसित देशांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. इलेक्ट्रॉनिक कचर्‍याबाबत या देशांमध्ये ठोस धोरणे अवलंबिली जात आहेत. परंतु, भारतासारख्या देशांमधील मुख्य समस्या अशी की, ना जनतेत याविषयी पुरेशी जागरुकता आहे, ना सरकारला याची चिंता आहे. पर्यावरण आणि आरोग्याचाही बळी घेणार्‍या इलेक्ट्रॉनिक कचर्‍याकडे जर आपण आज गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येऊ घातलेल्या संकटांपासून मुक्‍ती मिळविणे सोपे नसेल.

Back to top button