पाकिस्तान का ‘बुडतोय?’

पाकिस्तान का ‘बुडतोय?’

पाकिस्तानात पुरात 1000 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले तर दहा लाख घरे उद्ध्वस्त झाली. तीस लाख लोक बेघर झाले. संपूर्ण जगातून मदतीसाठी पाकिस्तान याचना करत आहे. संयुक्‍त राष्ट्रांनीही मदतीचे आवाहन केले आहे. भारतातही अनेक ठिकाणी पुराचे थैमान सुरू आहे. या पुरामागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि या निमित्ताने भारत-पाक संबंधांत काही फरक पडणार आहे का?
पाकिस्तानात यावर्षीचा पूर म्हणजे महाप्रलय म्हणावा इतका भयंकर आहे. या पुरात मोठमोठ्या इमारती वाहून गेल्या, शहरे बुडाली आणि लाखो लोक बेघर झाले. संयुक्‍त राष्ट्रांनी या पुराचे वर्णन पाऊस 'स्टेरॉईडस्'वर असल्यासारखे वाटते आहे, असे केले आहे. हवामान बदल हे या पुराचे मुख्य कारण सांगितले जात आहे. देशाच्या उत्तरेकडील हिमनद्या वितळत असल्यामुळे पुराने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे.

या पुरात आतापर्यंत एक हजारहून लोक मरण पावले. तर पाकिस्तानचा एक तृतीयांश भूभाग पाण्याखाली गेला. दहा लाख घरे नष्ट झाली किंवा त्यांची पडझड झाली. संयुक्‍त राष्ट्रांनी सोळा कोटी डॉलरची तातडीची मदत पाकिस्तानला पाठवली, पण पुरामुळे उद्ध्वस्त झालेली गावे, शहरे पुन्हा उभी करण्यासाठी 10 अब्ज डॉलरपेक्षाही अधिक खर्च येईल, असा अंदाज संयुक्‍त राष्ट्रांनीच व्यक्‍त केला आहे. पाकिस्तान हवालदिल झाला आहे. संकटनिवारणाचे आणि मदतीचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्तेही पुराची भीषणता पाहून हबकले आहेत. हा त्या देशाच्या इतिहासातील सर्वात भयंकर पूर असल्याचे मत हवामानतज्ज्ज्ञही व्यक्‍त करत आहेत. पाकिस्तानात गेले आठ आठवडे सतत पाऊस पडत आहे आणि त्याचाच परिणाम या पुरात झाला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून नेहमीपेक्षा नऊ पटीने जास्त पाऊस पडत आहे. तर संपूर्ण पाकिस्तान हे प्रमाण पाचपटीने जास्त आहे. केवळ पाकिस्तानातच नाही तर संपूर्ण जगातच पावसाने थैमान घातले आहे. जगात अगदी अमेरिकेपासून अनेक देशांत प्रचंड पूर आले. तर, चीनसारखे देश दुष्काळाचा सामना करत आहेत.

हवामान बदलाचा परिणाम

शास्त्रज्ञ जागतिक तापमान वाढण्याचा कितपत परिणाम पाऊस पडण्यावर होतो हे निश्‍चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी पाकिस्तानात 2010 मध्ये मोठा पूर आला होता. यावेळी त्याहीपेक्षा परिस्थिती गंभीर आहे. 2010 मध्ये आलेल्या पुरामागे जागतिक तापमान वाढ हे प्रमुख कारण होते. त्यावेळी आर्क्टिक्ट म्हणजे उत्तर ध—ुवावर तापमान वाढले होते आणि जगातील समुद्रांमध्ये बाष्पीभवन जास्त प्रमाणात झाले होते, असे एका संशोधनात स्पष्ट झाले होते. त्यावेळी जेट स्ट्रीम म्हणजे पृथ्वीभोवती फिरणारे उच्च स्तरीय वारे, यावर वाढत्या तापमानाचा परिणाम झाला आहे आणि हे वारे जास्त प्रमाणात वाहत राहिल्याने 2010 मध्ये पाकिस्तानात अधिक प्रमाणात पाऊस झाला तर रशियात त्या वर्षी उष्णतेची तीव्र लाट आली.

2021 मध्ये झालेल्या संशोधनानुसार जागतिक तापमान वाढीमुळे भारतीय उपखंडातील मान्सून अधिक तीव— आणि लहरी झाला. जागतिक तापमानात 1 सेल्सियसने वाढ झाली तर पाऊस 5 टक्के अधिक पडतो. 2010 नंतर पाकिस्तानात नियमितपणे पूर येत आहे. आता आलेला हा पूरही त्या नियमिततेचाच एक भाग आहे. दरवर्षी पावसाचा अतिरेक पाकिस्तानच्या पाचवीलाच पूजला आहे. या वर्षीचा पूर 2010 पेक्षाही भयंकर आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे उंचावरून उताराकडे खूप वेगाने पाणी येते आणि त्या पाण्यात गावेच्या गावेही वाहून जातात. अशा वेळी आधी सावधगिरीचा इशारा देऊनही काही उपयोग नसतो. पुरामुळे होणारे सर्वाधिक नुकसान या अशा उंचावरून उताराकडे वेगाने वाहत येणार्‍या पाण्यामुळे होते.

प्रचंड वृक्षतोडीमुळे पाणी जमिनीत मुरत नाही. पाकिस्तानी पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काबूल नदीवरील धरणे नष्ट केली, हेही या पुराचे एक कारण आहे. खरे पाहता पाकिस्तानला कायमच हवामानाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. हवामान तज्ज्ञ स्कॉट डंकन यांच्या मते पॅसिफिक महासागरातील वार्‍यामधील चढ-उताराचा परिणाम पाकिस्तानात पूरसमस्या निर्माण होण्यात झाली आहे. जागतिक हवामान धोका जास्त प्रमाणात असलेल्या देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक आठवा लागतो. यावर्षी मार्च ते मे या कालावधीत पाकिस्तानात उष्णतेची लाट आली होती आणि त्यापाठोपाठ पावसाचा हा धुमाकूळ. याचा या देशातील लोकांवर आणि आर्थिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. अर्थात, पाकिस्तानात आलेला पूर आणि भारतातही विविध ठिकाणी आलेले पूर यात बरेच साधर्म्य आहेत. जागतिक तापमानवाढीचे परिणाम भारतापलीकडेही आता दिसू लागले आहेत. प्रत्येक हंगाम आता तीव— होऊ लागला आहे. उन्हाळ्यात उष्णतेची लाट, पावसाळ्यात पूर आणि हिवाळ्यात थंडीची लाट हे आता अंगवळणी पडू लागले आहे. यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होत आहे. हवामानबदलाच्या समस्येकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

भारत-पाकिस्तान संबंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील पुराबद्दल आणि पूरग्रस्त लोकांबद्दल सहानुभूती व्यक्‍त करणारे ट्विट केले, त्यावर पाकिस्तानातून सकारात्मक प्रतिसाद आला. यापूर्वी आलेल्या पुरावेळी भारताने देऊ केलेली मदत पाकिस्तानने नाकारली होती. यावेळी काश्मीरसंबंधी 370 कलम रद्द केल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानने भारतातून होणार्‍या आयातीवर बंदी घातली होती. आता ती बंदी उठवण्याचा विचार पाकिस्तान सरकार करत आहे. भारतातून भाजीपाला आणि अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू पाकिस्तानात जलदगतीने पोहोचतील याची जाणीव त्या देशाला झाली आहे. भारताने मानवतेच्या द‍ृष्टिकोनातून मदत द्यायची तयारीही दर्शवली आहे. पठाणकोट नंतर कलम 370 आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान पुरता कोंडीत सापडला आहे. 2014 च्या पूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्तानचा असलेला प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्याचा चंग भारत सरकारने बांधलेला असताना आता काश्मीर मुद्द्यावरून आपण पाकिस्तानबरोबर कोणतीही तडजोड करण्याची सूतराम शक्यता नाही. सध्या अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला मानवतेच्या द‍ृष्टिकोनातून गरज असेल तर भारत मदत करायला तयार असू शकतो. पण ती मदत नाकारण्याचा उद्दामपणा पाकिस्तानने केला तर भारताबरोबर संबंध सुरळीत होण्याचे स्वप्नही त्या देशाला पाहता येणार नाही.

– रंगनाथ कोकणे,
पर्यावरण अभ्यासक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news