नसते उद्योग? | पुढारी

नसते उद्योग?

बाबा, मी निघतेय.
कुठे गं?
क्रिकेटच्या प्रॅक्टिसला.
सध्या हे खूळ आहे नाही का तुझ्या डोक्यात?
खूळ नाही बाबा. ध्येय म्हणा ध्येय.
कसलं ध्येय? उगाच बॉलमागे पळायचं आणि बॅटी फिरवायचं ध्येय? कार्टे, कढईत साधा झारा फिरवता येत नाही तुला.
त्याचा इथे काय संबंध बाबा?
इथेच कशाने? पुढच्या सगळ्या आयुष्याशी आहे की त्याचा संबंध.
आयुष्यभर मी फक्‍त झाराच फिरवायचाय का?
बाईच्या जातीला तेच तर कामी येतं ना शेवटी? झारे, उलथनी ही खरी आयुधं बायकांची.
मग क्रिकेटची बॅट हे काय?
नसता उद्योग. फुक्‍कटचा उपद्व्याप.
मी सेंचुर्‍या मारायला लागले की कळेल तुम्हाला!
एखाददा टोले बसले तर होईलही सेंचुरी, पण त्याचा पुढे काय उपयोग बये? काय पोट भरणार आहे की नोकरी मिळणार आहे त्यामुळे?
ह्यातलं काहीही किंवा सगळंच होऊ शकेल हं बाबा. आतापर्यंत फक्‍त इंटरकॉलेजिएट सामने खेळलेय मी. पुढे कदाचित आयपीएलला सुद्धा नंबर लागेल माझा!
त्यासाठी बायकांची आयपीएल तर व्हायला हवी?
होणार आहे! लवकरच. कदाचित येत्या मार्चमध्येच. महिलांची इंडियन प्रीमियर लीग टी-20! तिकडे दक्षिण आफ्रिकेतला वर्ल्ड कप संपला की लगेच!
दोन धडधाकट संघ तरी मिळतील का सामने खेळायला?
बाबा, पाच संघ नक्‍की असतील. सहावाही कदाचित तयार होईल म्हणतात. पंधरा दिवसांत एकोणीस सामने खेळवण्याचा प्लॅन आहे, आहात कुठे?
मी नेहमी असतोच पाय जमिनीवर रोवून. तुम्ही लोकच उगाच नसत्या उड्या मारताय. सारखी पुरुषांशी बरोबरी कसली करता गं?
ह्यात बरोबरीचा काय प्रश्‍न आहे? जर एखादा खेळ आहे, खेळाडू आहेत, तर स्पर्धा भरवायला नकोत?
भरवा ना छोट्या प्रमाणात. लगेच आयपीएलपर्यंत कशाला जायला हवंय? नाहक एक मोठं कामाचं, खर्चाचं, व्यापाचं चक्र फिरवत बसायचं!
त्याशिवाय बायकांना मोठ्या स्पर्धेचा, चुरशीचा अनुभव येणार नाही. नुसतं गल्लीत आणि आपपासांत बॅटबॉल खेळत बसलं तर त्यांची झेप उंच कशी जाईल?
कशाला जायला हवीये? एवढीच खेळाची हौस असेल, तर कबड्डी, खो-खो खेळावं. बॅडमिंटन, टेबल टेनिस खेळावं.
मग क्रिकेटनंच काय घोडं मारलंय बाबा? बुद्धिबळाचं कसं झालं पाहिलंत ना?
कसं झालं?
बायकांच्या बुद्धिबळाच्या उच्च मानांकित स्पर्धा फारशा कधी होऊच दिल्या नाहीत आजवर. परिणाम काय झाला? 75 व्या स्वातंत्र्य दिनापर्यंत भारतात 73 पुरुष ग्रँडमास्टर झाले, पण महिला ग्रँडमास्टर मात्र दोनच!
तू होतेस का आता तिसरी? बघ जाता जाता जमलं तर!
मी तो खेळ निवडलेला नाहीये बाबा. क्रिकेट निवडलंय. त्यात प्रगतीसाठी मनापासून प्रयत्न करतेय. मग निदान माझा उत्साह तरी घालवू नका. नसते उद्योग म्हणून हिणवू नका. कदाचित दोन-तीन वर्षांनी मी पण आयपीएलमध्ये येईन. मग तुमचीच कॉलर टाईट होईल की नाही?

– झटका

संबंधित बातम्या
Back to top button