हिरोशिमा पुन्हा नाही! | पुढारी

हिरोशिमा पुन्हा नाही!

6 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगात ‘हिरोशिमा दिन’ म्हणून पाळण्यात येतो. दरवर्षी 6 ते 9 ऑगस्ट या काळात जपानच्या पीस मेमोरियल येथे देश-विदेशांतून नागरिक जमतात आणि युद्धखोर मानसिकतेला साकडे घालतात की ‘हिरोशिमा पुन्हा नाही.’

6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर हा अणुबॉम्ब टाकला. यानंतर तीनच दिवसांनी 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर दुसरा अणुबॉॅम्ब टाकला. खरेतर जपान शरण येण्याच्या मार्गावर होता. पण, अमेरिकेने हा आततायीपणा केला व सामान्य नागरिकांचा जीव घेतला. हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बचे नाव होते ‘लिटल बॉय’ आणि तो 14 किलो टन शक्‍तीचा होता आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बचे नाव होते ‘फॅटमॅन’ तो 21 किलो टन शक्‍तीचा होता.

दुसर्‍या महायुद्धात जपानच्या युद्धखोर नीतीमुळे अमेरिकेने जपानवर काही निर्बंध लादले, त्यामुळे जपानने अमेरिकेला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानून 7 डिसेंबर 1941 रोजी थेट अमेरिकेच्या पर्ल हार्बर या मुख्य नाविक तळावर हल्‍ला चढवला. यात अमेरिकेच्या 10 युद्धनौका बुडाल्या व 21 युद्धनौका उद्ध्वस्त झाल्या. अमेरिकेचे 2350 लोक मृत्युमुखी पडले ज्यामध्येे 68 सामान्य नागरिक होते. या हल्ल्यानंतर खर्‍या अर्थाने अमेरिका दुसर्‍या महायुद्धात सक्रिय झाली व त्यांनी जपानविरुद्ध दंड थोपटले. त्यावेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष एफ. डी. रुझवेल्ट यांनी या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या जगप्रसिद्ध ‘मॅनहटन प्रोजेक्टला’ म्हणजेच अणुबॉम्ब तयार करण्याच्या प्रोजेक्टला 13 ऑगस्ट 1942 रोजी सुरुवात केली. डॉ. रॉबर्ट ओपेनहायमर हे या प्रोजेक्टचे प्रमुख होते. अ‍ॅडॉल्फ हिटलरने अणुबॉम्ब तयार करण्याअगोदर आपण अणुबॉम्ब तयार करावा म्हणून शास्त्रज्ञांची धडपड होती. 1945 सालच्या उन्हाळ्यात अणुबॉम्बच्या यशस्वी चाचणीनंतर त्याची संहारकता व त्यामुळे झालेला विध्वंस बघून सर्व शास्त्रज्ञ आवाक् झाले व त्या सगळ्यांनी मिळून या अणुबॉम्बचा मानवावर उपयोग करू नये म्हणून प्रयत्न सुरू केले, पण तोपर्यंत सर्व सूत्रे राजकारण्यांच्या हाती गेली होती.

दरम्यान, 12 एप्रिल 1945 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांचे निधन झाले व सर्व सूत्रे नवीन अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्याकडे गेली. दरम्यान, जर्मनीचा पुरता पाडाव झाला होता. 30 एप्रिल 1945 रोजी हिटलरने आत्महत्या केली. हिटलरच्या आत्महत्येनंतर दुसर्‍या महायुद्धाचा केंद्रबिंदू जपानकडे सरकला व सोव्हिएत संघाने जपानवर हल्‍ला करण्यासाठी 8 ऑगस्ट 1945 ची तारीख ठरवली होती, पण याची कुणकुण अमेरिकेला लागली व अमेरिकेने त्याअगोदर 2 दिवस म्हणजेच 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानवर अणुबॉम्ब हल्‍ला करण्याचे निश्‍चित केले.

अणुबॉम्ब टाकण्यासाठी हिरोशिमा या त्यावेळी अत्यंत दाट वस्ती असलेल्या शहराची निवड केली. सकाळी बरोबर 8.15 वाजता ‘ईनोला गे’ नावाच्या विमानाने ‘लिटील बॉय’ हा अणुबॉम्ब टाकला. या विमानाचे सारथ्य पॉल टिबेटस् हा प्रमुख पायलट करत होता. हिरोशिमा शहराच्या 2000 फूट उंचीवर या अणुबॉम्बचा स्फोट झाला. जास्तीत जास्त विध्वंस होण्यासाठी बॉम्ब हवेत फुटावा असेच नियोजन होते. एका क्षणात एक मैल परिघात जे होते ते सर्व जळून नष्ट झाले. या अणुबॉम्ब स्फोटात 1 लाख 45 हजार नागरिक एकाच दिवसात मरण पावले. किरणोत्सर्गामुळे गरोदर महिलांची बालके शारीरिक व्यंगे घेऊन जन्माला आली. नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे हिरोशिमा सारखीच वाताहत झाली.

‘ईनोला गे’ विमानाचे सहपायलट रॉबर्ट लुईस यांनी आपल्या फ्लाईट लॉगमध्ये ‘हे देवा आम्ही हे काय केले’ असे लिहिले होते. मानव जातीवर दोनदा केलेला हा अमानुष हल्‍ला म्हणजे माणुसकीला लागलेला एक कलंक आहे. अशी मानसिकता म्हणजे क्रूरपणाच लक्षणच आहे. मानवाने मानवावर केलेले हे अत्याचार मनुष्य किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचेे उत्कृष्ट उदाहरण आहे. दरवर्षी 6 ते 9 ऑगस्टदरम्यान जपानच्या पीस मेमोरियल येथे देश-विदेशांतून नागरिक जमतात व आठवणी जागवतात आणि मानवी अहंकाराला वा युद्धखोर मानसिकतेला साकडे घालतात की ‘हिरोशिमा पुन्हा नाही.’

– प्रा. डॉ. राजन पडवळ

Back to top button