शोषितांच्या वेदनांचा शाहीर | पुढारी

शोषितांच्या वेदनांचा शाहीर

-श्रीराम ग. पचिंद्रे 

तुकाराम भाऊराव साठे हे नाव घेतले, तर अर्थबोध होणार नाही. होय. अण्णांचे नाव तुकाराम होते; पण पुढे ते अण्णा भाऊ साठे याच नावाने ओळखले जाऊ लागले. अण्णा भाऊ चमत्कार वगैरे न मानणार्‍या साम्यवादी विचारांचे असले, तरी ते स्वतः मात्र मराठी साहित्यातील एक चमत्कारच होते. आयुष्यातले केवळ दीड दिवस शाळेला गेलेले आणि स्पृश्यास्पृश्य भेदामुळे पुन्हा कधीही शाळेचे तोंडही न पाहिलेले अण्णा भाऊ जगाच्या उघड्या शाळेत असे काही शिकले की, जे चार भिंतींनी बंदिस्त असलेल्या शाळेत कधीही शिकता आले नसते. सामाजिक समतेचा विचार मांडणारा कम्युनिझम त्यांना आपलासा वाटला. अंगभूत प्रतिभेचे देणे लाभलेले अण्णा शाहीर दत्ता गव्हाणकर आणि शाहीर अमर शेख यांच्याकडे ओढले गेले. त्या तिघांनी ‘लाल बावटा कलापथक’ स्थापन केले. पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली आहे, असे पुराणे सांगतात; 1958 मध्ये मुंबईत पहिल्या दलित साहित्य संमेलनात भाषणात ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे..’ असे क्रांतिकारक उद्गार त्यांनी काढले. यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगारवर्गाचे महत्त्व विशद केले.

अण्णांचे कार्य आणि लेखनसुद्धा मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते; पण पुढे त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपलेसे वाटायला लागले. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांची बांधिलकी मानली. त्यातूनच-

संबंधित बातम्या

“जग बदल घालुनी घाव।
सांगून गेले मला भीमराव॥

अशी जोरकस कविता अण्णांच्या हातून जन्माला आली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात होती. अण्णा भाऊंनी अमर शेख आणि गवाणकर यांच्यासह महाराष्ट्र पिंजून काढला. शाहिरीतून दलित-शोषित समाजाच्या वेदनांना वाचा फोडली, तसेच चळवळीच्या गाण्यांतून लोकजागृती केली, सरकारवर टीकेची झोड उठवली.

‘माझी मैना गावावर राहिली। माझ्या जीवाची होतीया काहिली॥’ ही लावणी लिहून ती गाऊन गाजवली. आपल्या जिवलग सहचारिणीची झालेली ताटातूट अत्यंत समर्पक आणि समर्थ शब्दकळेतून मांडता मांडताच ती लावणी त्यांनी संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीशी अलगद नेऊन भिडवली, लावणीचे जोरकस कथन लोकांच्या हृदयाला भिडले. ‘मुंबईत उंचावरी। मलबार हिल इंद्रपुरी। कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती॥ परळात राहणारे। रात्रंदिन राबणारे। मिळेल ते खाऊनी। पोट भरती’ या लावणीत श्रीमंत-गरीब ही दरीची प्रभावी मांडणी अण्णा भाऊ करतात. पोवाडे आणि लावणी लिहिताना त्यांनी लोककथात्मक शैलीचा उपयोग केला. त्यामुळे त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली व शोषितांच्या वेदना त्यांंनी समाजासमोर, व्यापक समुदायासमोर प्रभावीपणे मांडल्या.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अण्णा भाऊंनी मुंबईत वीस हजार कामगार-दलितांचा मोर्चा काढला. ‘ये आजादी झूठी है। देश की जनता भूखी है’ ही त्या मोर्चाची प्रमुख घोषणा होती. हा देश स्वतंत्र भारतात उच्चवर्णीयांच्या हातात गेला आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ‘इंडियन पीपल्स थिएटर’ या सांस्कृतिक शाखेत अण्णांना महत्त्वाचे स्थान होते. बाबासाहेबांचे नेतृत्व स्वीकारून दलितांसाठी कार्य करताना अण्णांंनी कामगार-दलित वर्गाच्या अनुभवांचे प्रकटीकरण करण्यासाठी शाहिरीबरोबरच कथा-कादंबर्‍या लिहिल्या. भुकेकंगाल आणि पीडितांना न्याय देणार्‍या ‘फकिरा’च्या माध्यमातून त्यांनी आपल्याच मनातील विद्रोह प्रकट केला आहे. देशावर जुलमी सत्ता लादणार्‍या आणि वर्गीय व वर्णीय विषमता लादणार्‍या समाजातील अन्यायकारक घटकांशी लढणारा हा ‘फकिरा’ म्हणूनच तळागाळातील वाचकांच्या गळ्यातील कंठमणी बनला. सामाजिक विषमतेविरुद्ध ठाम भूमिका घेऊन लढणार्‍या नायकांना चित्रित करणार्‍या पस्तीस कादंबर्‍या, पंधरा कथासंग्रह, अनेक लोकनाट्ये, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णन असे बहुरंगी, वैविध्यपूर्ण साहित्य त्यांनी मराठी साहित्याला बहाल केले. त्यांच्या फकिरा, वारणेचा वाघ, वैजयंता, टिळा लाविते मी रक्ताचा इत्यादी सात कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले, ते चांगले चालले. अण्णा भाऊंना अनेक सन्मान प्राप्त झाले, त्यांचे टपाल तिकीटही निघाले. असा हा बहुजनांचा, शोषितांचा लेखक आपल्या रसरशीत साहित्याने आणि कार्याने अजरामर ठरलेला आहे.

Back to top button