कशासाठी? स्मार्टनेसपणासाठी! | पुढारी

कशासाठी? स्मार्टनेसपणासाठी!

काय हे? एवढा उशीर ?
काय करणार हो? करता करता उशीर झालाच.
वेळेवर निघाला नव्हतात का?
निघालो होतो की.
मग? घोडं कुठे अडलं?
रस्त्यात फार मोकाट कुत्री होती. त्यांना चुकवून, जीव वाचवत मुख्य रस्त्यापर्यंत यायला वेळ लागला.
मग, दगड मारायचेत की कुत्र्यांना!
मारणार होतो; पण म्हटलं, त्यांना पण स्मार्ट सिटीत यायला आवडत असेल.
बरोबर. पुढे?
पुढे रिक्षावाले अडले. म्हणजे अडवायला लागले.
कशासाठी?
एवढ्या जवळच्या अंतरावर यायला एकजण तयार होईना. आता जवळच्याच सभागृहात कार्यक्रमासाठी जायचंय यात माझा काय दोष?
खरंय. सभागृह बांधणार्‍यांचा दोष! त्यांनी चंद्रावर बांधायचं होतं ना सभागृह!
तरी मी एका-दोघा रिक्षावाल्यांना सुचवलं. वाटल्यास मला जरा लांबच्या रस्त्याने जवळ न्या; पण नाहीच कोणाची तयारी. मग, टकुर्‍यात शिरलं. म्हटलं, स्मार्ट शहरात रिक्षावाले एवढे स्मार्ट असणारच. एकेक अद़ृश्य अडवाअडवी करायचं मीटर घेऊन फिरणारच.
शेवटी मिळाली की नाही रिक्षा?
मिळाली एकदाची; पण रस्त्यात खड्डे किती? प्रत्येक खड्ड्याजवळ रामाचा धावा करता करता सगळी रामरक्षा म्हणून संपली; पण खड्डे संपेनात.
त्यात आज रस्त्यावरचे सिग्नल बंद होते.
असं का? पण, सिग्नल चालू असले, तरी लोक जास्त ‘चालू’ असतात. सिग्नल ही अंधश्रद्धा मानतात.
तसंच झालं. मध्येच सिग्नलांनी थोडी उघडझाप केली. मग, सिग्नल स्मार्ट की वाहनचालक स्मार्ट, या स्पर्धेत थोडा वेळ गेला.
निकाल काय लागला या स्पर्धेचा?
स्मार्ट शहरात व्यवस्थाच जास्त स्मार्ट ठरतात शेवटाच्या एण्डला.
खड्डे, रिक्षा सगळं समजलं, तरी एवढा उशीर?
इथे जवळ आलो तेव्हा जाणवलं, आपण रिकाम्या हाताने जातोय, हे काही बरोबर नाही. काही तरी भेटीदाखल घ्यावं म्हणून समोरच्या मॉलमध्ये डोकावलो. हा पुष्पगुच्छ उचलला.
आता फुलांवर भुंगे होते, ते कानात गुणगुणायला लागले, म्हणून उशीर लागला असं सांगू नका राव.
तसं काही झालंच नाहीये तर सांगू कसं?
मग काय झालं?
मॉलमध्ये बिलाचा खोळंबा हो. दीडशे रुपयांची फुलं घेतली, तर बिल आलं पंधराशेचं.
मग कमी करून घ्यायचं की!
तसंच करायला गेलो, तर बिल आलं उणे दीड रुपया. आता उणे रुपये कसे देतात हे कळेना.
शक्य आहे. कुठेही, जराही पैसे द्यायची वेळ आली की, अनेकांना काहीही कळेनासं होतंच.
ते वेगळं. मला मात्र एक कळलंय. स्मार्ट सिटीत राहायचं म्हटलं की, सगळे आपापल्या परी स्मार्टनेसपणा दाखवणारच; पण काय हो? कार्यक्रमाची वेळ होऊन गेली तरी तुम्ही अजून बाहेर कसे?
वीज गेलीये दुपारपासून. इथे जातेच ती अधूनमधून. स्मार्ट लोक जमेल तिथून ती चोरतात, बेकायदा वेडीवाकडी वापरतात, मग ती मान टाकते. उगा जास्त भार वाहण्यापेक्षा गायब होण्याचा स्मार्टनेसपणा तिच्यातही आलाय ना? इतर सर्व सार्वजनिक सेवांसारखा!

Back to top button