केजरीवालांचा ‘धोका’? | पुढारी

केजरीवालांचा ‘धोका’?

आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे सातत्याने गुजरातचा दौरा करत आहेत. गुजरात हा भाजपचा सर्वात मोठा गड मानला जातो. तथापि, गुजरातच्या निवडणूक आखाड्यात ‘आप’ची एन्ट्री ही काँग्रेसच्या मुळावर येणारी आहे. भाजपचा बालेकिल्‍ला असलेल्या गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणार्‍या विधानसभेच्या मैदानात भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. या पार्श्‍वभूमीवर दिल्‍लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे सातत्याने गुजरातचा दौरा करत आहेत. गुजरात हा भाजपचा सर्वात मोठा गड मानला जातो आणि तब्बल तीन दशकांपासून या पक्षाने कच्छच्या रणमध्ये पाय घट्ट रोवले आहेत. म्हणूनच केजरीवालांकडून सर्वशक्‍तीनिशी भाजपला आव्हान दिले जात आहे.

अर्थात, गुजरातच्या निवडणूक आखाड्यात ‘आप’ पक्षाची जोरदार एन्ट्री ही काँग्रेसच्या मुळावर येणारी आहे. अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये अनेक सभा घेतल्या. या सभेतून ते काँग्रेसची मते आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक सभेत त्यांनी काँग्रेसला मत देऊन आपले मत वाया घालवू नका, असे जनतेला आवाहन केले आहे. काँग्रेसमध्ये आता भाजपला आव्हान देण्याची ताकद राहिलेली नाही, असा दावाही केजरीवाल करत आहेत. गुजरातमधील भाजपविरोधी लोकांनी, पक्षांनी काँग्रेसऐवजी ‘आप’ पक्षाच्या बॅनरखाली एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, ‘आप’ पक्ष मैदानात आल्याने काँग्रेसची मोठी हानी होऊ शकते.

दिल्ली-पंजाबनंतर आता गुजरात

दिल्लीनंतर पंजाबमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आप पक्षाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. म्हणूनच केजरीवाल यांना गुजरातमध्ये ‘आप’ला चांगले स्थान मिळेल, अशी आशा वाटत आहे. या आशेपोटी ते गुजरातकडे अधिक लक्ष देत आहेत. दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे त्यांनी 6,988 सदस्यांना एकनिष्ठतेची आणि प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करण्याची शपथ दिली. गुजरातमध्ये सत्ता परिवर्तन करण्यासाठी कठोर परिश्रम घ्या, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. एका अर्थाने केजरीवाल ‘आप’ला मजबूत करताना भाजपविरोधातील व्होटबँक एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला गुजरातच्या सत्तेतून हद्दपार करा, असे सांगत ‘आप’ला पाठिंबा देण्याचे आवाहन लोकांना केले आहे. काँग्रेसला मत देऊन आपले मत वाया घालवू नका, असेही केजरीवाल म्हणत आहेत. गुजरातमध्ये बरीच मंडळी भाजपच्या कारभारावर नाराज आहेत आणि ही नाराजी आपल्या तंबूत ओढण्यात केजरीवाल यशस्वी झाले, तर गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार स्थापन होऊ शकते.

काँग्रेसची मते वळविण्याचा प्रयत्न

विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने ‘आप’ने गुजरातमधील सक्रियता वाढविली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचा प्रचार हा थंडबस्त्यात गेल्याचे दिसून येत आहे. तरुण नेता हार्दिक पंड्या यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतरही काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारच्या राजकीय हालचालींना वेग आलेला नाही. केजरीवाल याच संधीचा लाभ घेऊ इच्छित आहेत. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकांचे समर्थन मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. भाजपवर नाराज असलेले पण काँग्रेसला मत देऊ न इच्छिणार्‍या जनतेला आपल्याकडे आणा, असे केजरीवाल कार्यकर्त्यांना सांगत आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला ‘अँटिइन्कम्बसी’चा सामना करावा लागू शकतो; पण गुजरातमध्ये भाजपची पाळेमुळे खूप घट्ट झालेली आहेेत. ही बाब केजरीवाल यांना चांगलीच ठाऊक आहे. म्हणूनच ते काँग्रेसची मते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसला मतदान करणार्‍या मतदारांवर ‘आप’चा डोळा आहे. परिणामी, ‘आप’ची आणि नेत्यांची सक्रियता ही सुस्त असलेल्या काँग्रेसला नुकसानकारक ठरू शकते.

भ्रष्टाचार संपविण्यावर भर

अरविंद केजरीवाल हे गुजरातच्या जनतेसमोर दिल्‍ली आणि पंजाबमधील पक्षाच्या आणि सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचत आहेत. त्यांच्या मते, दोन्ही राज्यांत ‘आप’ने प्रामाणिक सरकार दिले आहे. दोन्ही राज्यांंत भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्यात बर्‍यापैकी यश आले आहे. गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार स्थापन करून सरकारी यंत्रणेमार्फत राज्यातील कथित भ्रष्टाचार संपविण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली आहे. ‘आप’ सरकारने राबविलेल्या योजना आणि कामगिरी गुजरातच्या जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले जात आहे. या अभियानामुळे गुजरातमधील मतदार हे स्वत:हून ‘आप’ला पाठिंबा देण्यासाठी पुढे येतील, असा विश्‍वास केजरीवाल यांना आहे.

– मिलिंद सोलापूरकर

Back to top button