घनवनांची निर्मिती | पुढारी

घनवनांची निर्मिती

जपानचे वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी हे स्थानिक भागातील व फळ देणार्‍या रोपांची कमी अंतरावर लागवड करतात. त्यामुळे 10 ते 12 वर्षांत घनदाट जंगल निर्माण होते. मियावाकी घनवन ही संकल्पना जपानचे वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी राबवली आहे. स्थानिक भागातील व फळ देणार्‍या रोपांची कमी अंतरावर लागवड करतात. त्यामुळे प्राणवायू मिळवण्यासाठी झाडांची वाढ वेगाने होते. दुर्मीळ झाडे, फळ झाडे यांची लागवड मातीचा पोत पाहून करणे अवश्य आहे. मृदा सर्वेक्षण, प्रजातींची निवड आणि वर्गीकरण, बायोमास सर्वेक्षण, वृक्षारोपण आणि देखभाल असे टप्पे घनवन (मियावाकी) पद्धतीने पार पडली जातात. अशा पद्धतीने 10 ते 12 वर्षांत घनदाट जंगल निर्माण होते. साधारण झाडांच्या उंची, आकारानुसार एका एकरात 12 हजार झाडे लावली जातात.

घनदाट लागवडीमुळे झाडांना साधारण तीन वर्षांपर्यंत लक्ष द्यावे लागते. त्यानंतर खर्च करावा लागत नाही. अशा घनवनमुळे पक्षांचे आश्रय स्थान पक्के होते. घनवन निर्मिती करताना केवळ दाट झाडी नको, तर पशुपक्षांचे खाद्य व ऑक्सिजन लंग्ज म्हणून ज्या झाडांचा उल्लेख केला जातो, ती झाडे लावण्याची गरज आहे. देशी झाडांचा प्रचार हा चार ते पाच वर्षांत सुरू झाला आहे; पण त्या आधी गाव, वस्ती, शाळा, सरकारी इमारतींमधील आवारात व रस्त्यालगत विदेशी झाडांनी आपली पाळे मुळे रोवली आहेत.

बहुपयोगी वड, पिंपळ, चिंच, फणस, आवळा, आंबा, बेल, कडुनिंब, मोह, कदंब, पळस, लाख, साल, कवठ याशिवाय साधी बाभूळ, करंज, चंदन, कुसुम, बिबवा, खैर, हिंगण, गोधन, रानभेंडी, अर्जुन अशी भारतीय देशी झाडे ऑक्सिजन लंग्ज निर्माण करतात. खाद्य म्हणूनही त्यांचा मोठा उपयोग होतो. अनेक काटेरी वनस्पती व फुलझडी यावर फुलपाखरे, भुंगे, मधमाश्या आपले अस्तित्व टिकून राहतात. त्यामुळे परागी भवन सुरळीत चालू राहते. विदेशी झाडांना फळे व फुले लगडत नाहीत. त्यामुळे पोपट, मैना, साळुंकी, सुतार पक्षी, धीवर, घार, ससाणा, बगळे असे अनेक पक्षी हळूहळू नाहीसे होत आहेत. हो धोक्याची घंटा आहे.

संबंधित बातम्या

देशी झाडांची मुळे खोलवर जाऊन जमिनीला घट्ट पकडून ठेवणारी आहेत. कमी पावसावर तग धरून जिवंत राहतात. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते. याशिवाय बीज मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होत असल्याने पुनर्निर्मिती होते. शास्त्रीय माहिती न घेता निसर्गाशी नाते जोडणे पर्यावरणासाठी व मानवी अस्तित्वासाठी धोक्याचे आहे. विदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरून सिद्ध झाल्याचे सांगितले जात आहे.

भारतात विकासाच्या प्रक्रियेत आपण पशुपक्षांची आश्रय स्थाने व अन्नसाखळी मोडून काढली. त्यामुळे असे प्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागले, तर काही पशुपक्षी नाहीसे झाले. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत गेला. समृद्ध पर्यावरणासाठी व अन्नसाखळीसाठी घनवन संकल्पना राबवणे आवश्यक आहे. प्रत्येक गाव पातळीवरील गायरानात घनवन निर्माण केले पाहिजे. नाही तर घनदाट जंगल ही संकल्पना केवळ गोष्टींच्या पुस्तकातच राहील.

– विठ्ठल वळसे-पाटील

Back to top button