‘क्रिप्टो’चा गडगडाट | पुढारी

‘क्रिप्टो’चा गडगडाट

क्रिप्टो मार्केेटमध्ये घसरणीचे वारे वाहत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक आर्थिक परिस्थिती. ही घसरण क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणार्‍या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हानिकारक आहे. साहजिकच अनेक गुंतवणूकदार क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीची कायमस्वरूपी धास्ती घेतील. परंतु, ज्यांचे क्रिप्टोमधील गुंतवणुकीतील स्वारस्य अबाधित राहील, अशा गुंतवणूकदारांची संख्याही कमी नाही.

गेल्या आठ महिन्यांत क्रिप्टो करन्सीच्या बाजारात घसरणच सुरू आहे. बिटकॉईन या सर्वांत लोकप्रिय क्रिप्टो चलनाचे मूल्य नोव्हेंबर 2021 मध्ये 68 हजारांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले असताना 13 जूनपासून सुरू झालेल्या आठवड्यात मोठी घसरण होऊन ते 20 हजारांच्या खाली पोहोचले. नोव्हेंबर 2021 मध्ये क्रिप्टो करन्सीचे एकत्रित बाजार भांडवल 3 लाख कोटींपेक्षा जास्त झाले होते. जगातील बहुतेक देशांच्या जीडीपीपेक्षाही ते अधिक आहे. परंतु, क्रिप्टो करन्सी मार्केट गेल्या आठ महिन्यांत 2 लाख कोटींपेक्षा अधिक प्रमाणात घटले आहे. बिटकॉईन आणि तिची जवळची प्रतिस्पर्धी असलेली इथरियम या दोन्ही करन्सींचे बाजार भांडवल अनुक्रमे 400 अब्ज आणि 140 अब्ज एवढे घसरले आहे. त्यांच्या सर्वोत्तम मूल्याच्या 70 टक्क्यांनी खाली घसरलेले हे मूल्य आहे.

तज्ज्ञांच्या मते, क्रिप्टो करन्सीच्या किमतीतील घसरण महागाईच्या दबावामुळे होते. युक्रेन युद्ध, पुरवठा साखळीतील अडथळे, अन्‍नसुरक्षेचा प्रश्‍न, कोव्हिडची जागतिक महामारी आणि तिच्याशी झालेला संघर्ष, गेल्या चार दशकांमधील अमेरिकेतील सर्वाधिक महागाई, वाढती बेरोजगारी यासारख्या समस्यांशी बहुतांश देश झुंज देत आहेत. परिणामी, सर्व बाजूंनी आलेल्या अडथळ्यांनी जागतिक आर्थिक वाढ खुंटत आहे. फेडरल रिझर्व्हने जारी केलेल्या चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिकी वित्तीय बाजार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महागाईचा धोका वाढला आहे. त्याचा थेट परिणाम शेअर बाजार आणि क्रिप्टो करन्सीच्या मूल्यावर होत आहे. काही संस्थांनी बिटकॉईन हे चलन या आशेने विकत घेतले की, ते शेअर बाजार आणि बाँडस्मधील घसरणीची भरपाई करेल. परंतु, विश्‍वास तर दूरच, अलीकडील ट्रेंड असे सूचित करतात की, काही क्रिप्टो मालमत्ता व्यापक बाजाराच्या ट्रेंडशी अधिक संरेखित झाल्या आहेत. उदाहरणार्थ, आठ मे रोजी बिटकॉईन आणि इथरियम हे प्रसिद्ध क्रिप्टो चलन तसेच टेस्ला, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट आदी मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतही घसरण झाली.

साहजिकच जागतिक मंदीपासून क्रिप्टो चलन दूर राहील, हा विश्‍वास व्यर्थ ठरला आहे. मे महिन्यात यूएसटी हे टोपणनाव असलेले टेरायूएसडी हे चलन कोसळल्याने क्रिप्टो मार्केटला धक्‍का बसला आहे. टेरायूएसडी हे विकेंद्रित अल्गोरिदमवर आधारित स्टेबल कॉईन आहे. मिन्ट आणि बर्न पद्धत वापरून एक यूएसटीचे मूल्य एक डॉलरवर कायम राखणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यूएसटीचे मूल्य एक डॉलरवर राखण्यासाठी टेराचे मूळ चलन असलेल्या लुनाचा वापर केला जातो. बाजारातील अस्थिरता आणि एकूणच घसरणीमुळे स्टेबल कॉईन संतुलित ठेवण्यासाठीचे प्रयत्न व्यर्थ ठरले. या प्रक्रियेचे प्रतिबिंब म्हणजे जेव्हा यूएसटीची मागणी कमी होते, तेव्हा लुनावर विक्रीचा दबाव वाढतो. मे महिन्यात जेव्हा दबाव वाढला तेव्हा दोन्हीची किंमत शून्याच्या जवळपास पोहोचली. घसरण होण्यापूर्वी टेरायूएसटीला सुरक्षित क्रिप्टो चलन मानले जात असे. त्यामुळे गुंतवणूकदारांना 19.5 टक्के नफा मिळत असे. 13 जून रोजी क्रिप्टो कर्ज देणार्‍या सेल्सिअस या संस्थेने बाजारातील बिकट परिस्थितीचा हवाला देत ग्राहकांच्या क्रिप्टो मालमत्ता काढून घेण्यावर बंदी घातली आहे. तज्ज्ञांच्या मते, सेल्सिअस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. सेल्सिअसने एकदा 2 दशलक्ष गुंतवणूकदारांकडून 20 अब्ज मालमत्तेचे व्यवस्थापन केले होते. क्रिप्टो गुंतवणुकीवर 18 टक्के परतावा दिला होता. विकेंद्रित वित्तव्यवस्थेवर आधारित जगातील सर्वांत मोठा निर्देशांक असलेल्या बिनान्ससह इतर अनेक संस्थांनीही अनेक व्यवहारांवर बंदी घातली आहे.

क्रिप्टो चलन उद्योगातील मंदीचा थेट परिणाम रोजगार कपातीच्या रूपात समोर आला आहे. कॉईनबेसने नियुक्‍तीवर बंदी घातली आहे. नोकरीच्या ऑफर्स रद्द केल्या आहेत. ब्लॉकफीने त्यांच्या 20 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. क्रिप्टो डॉट कॉम, जेमिनी यासारख्या कंपन्याही टाळेबंदीच्या तयारीत आहेत. एकूणच हजारो नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत. क्रिप्टो मार्केटच्या अलीकडील घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक आर्थिक परिस्थिती. ही घसरण क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणार्‍या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हानिकारक आहे. साहजिकच अनेक गुंतवणूकदार क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीची कायमस्वरूपी धास्ती घेतील. परंतु, ज्यांचे क्रिप्टोमधील गुंतवणुकीतील स्वारस्य अबाधित राहील, अशा गुंतवणूकदारांची संख्याही कमी नाही. क्रिप्टोकरन्सी हे स्थापनेपासूनच एक तात्पुरते, अस्थिर आणि धोकादायक आर्थिक साधन आहे. त्याला प्रवेशयोग्य आणि पारदर्शक बनविणे आवश्यक आहे. प्रमुख देशांची सरकारे योग्य नियम तयार करण्यासाठी क्रिप्टो करन्सीच्या अस्थिरतेचा आणि मुख्य घटकांचा बारकाईने अभ्यास करत आहेत. सध्या क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीतून मोठा नफा कमावणारे बडे गुंतवणूकदारही गप्प आहेत. त्यांच्या मते, पडझडीत खरेदी करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नाही. त्यामुळे लहान गुंतवणूकदारांनी सध्या क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे टाळावे आणि योग्य वेळेची वाट पाहावी.

– प्रभात सिन्हा,
आयटी आणि उद्योग क्षेत्राचे अभ्यासक

Back to top button