गळफास्टॅग

गळफास्टॅग
गळफास्टॅग
Published on
Updated on

हुश्श. आलो बुवा एकदाचा घरी.
एवढा उशीर का झाला?
गळफास्टॅगमध्ये अडकलो होतो ना!
गळफास्टॅग? हे काय नवं लफडं हो?
फार नवं नाहीये हे; पण आलं तेव्हा साधं फास्टॅग होतं, त्याला आता आम्ही मंडळींनी गळफास टॅग असं नाव दिलंय.
कोणाला बसला गळफास? तुम्हाला? पण तुम्ही तर वेळोवेळी त्याच्या खात्यात रीतसर पैसे भरता की!
हो; पण तिकडून मध्येच 'टोल' वा 'टोल'वी चालते, त्याला काय करायचं? आपण ढीग पैसे भरू, त्यांचा कॅमेरा नीट नाहीये वाटतं.
अशी भानगड आहे होय?
म्हणतात खरं असं, तो नीट वाचत नाही म्हणे आपल्या गाडीची माहिती.
का? त्याची आपल्या गाडीशी काय एवढी दुश्मनी आहे?
आपल्याच नाही, इतरही कोणाकोणाच्या वाकड्यात शिरतो म्हणे हा फास्टॅग.
का म्हणे?
देव जाणे. मागच्या आठवड्यात ऑफिसमधल्या पातुरकरला दुप्पट पैसे मोजायला लावले वाटतं त्याने. त्याच्या खात्यात पैसे होते, तरी खातं इनअ‍ॅक्टिव्ह आहे असं म्हटलं. आणि जेवढा टोल तेवढाच जादा दंड वसूल केला.
शिवाय नाक्यावर त्यांच्यामुळे लांबच लांब रांगेत खोळंबलेल्या सर्वांचे शिव्याशाप आयते घेतले असतीलच ना, फ्री गिफ्ट म्हणून?
हो तर. मागून सर्वांचे घंटानाद, टोमणे, आरोपी नजरा, हे ओघाने आलंच.
कोणत्या पवित्र भूमीवर झाला हा तमाशा?
खेड शिवापूर नाक्यावर; पण त्यात काही विशेष नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर असो, पुणे-कोल्हापूर दरम्यानचे चार नाके असोत नाहीतर अगदी बेळगाव-गोवा मार्ग असो. खालापूर, वरसोली, कुसगाव, कुठेही जा फास्टॅगची अंदाधुंदी सर्वत्र सारखीच सुरू आहे.
कमाल आहे. चालकांचा वेळ वाचावा म्हणून राज्यात किंवा राष्ट्रीय महामार्गांवर मुद्दाम आणली ना ही प्रणाली?
आणली.
मग माशी कुठे शिंकली?
कार्यवाहीमध्ये!
एवढं काय कठीण होतं त्यात? आपण बँकेत टोल खात्यात पैसे भरायचे, त्यांच्या यंत्रणेने ते हिशेबाने कापून घ्यायचे. किती सोपं?
पण आपण कठीण करून दाखवलं की नाही ते सुद्धा? सीसीटीव्ही धड नसणार, एकेका गाडीवर फास्टॅगचे दोन-तीन स्टिकर्स, एखाद्या वेळेस बँकेशी संपर्क तुटणार, नाना भानगडी!
जगभरात खूप ठिकाणी आहे ना अशी व्यवस्था?
हो तर. माणसं नेमायला नकोत, प्रत्यक्ष पैशाची देवघेव नको, म्हणून जगभर असते फास्टॅगसारखी यंत्रणा. सिंगापूरमध्ये तर म्हणे, माणसं प्रत्येकी तीस सेकंदांमध्ये गाडी बाहेर काढतात नाक्यावरून.
फारच मागासलेलं दिसतंय तुमचं सिंगापूर.
शक्य आहे. आपण मात्र फार पुढारलेले आहोत प्रत्येक बाबतीत.
काय करायचं ह्याबाबत?
सध्या तरी फक्कडसा चहा करायचास तू.
आणि तुम्ही काय करणार?
उद्या पुन्हा गावाला जावं लागणार आहे. त्या रस्त्यावरच्या फास्टॅगला तोंड देण्याचं नैतिक धैर्य गोळा करायला लागतो. आज घरीच थांबणार आहे, तरीही कुठून एखादा टोलटॅक्स माझ्या खात्यावर पडू नये, म्हणजे मिळवली!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news