राजमाता जिजाऊ : स्वराज्याचा दीपस्तंभ | पुढारी

राजमाता जिजाऊ : स्वराज्याचा दीपस्तंभ

राजमाता जिजाऊ कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली. त्या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ आहेत. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

राजमाता जिजाऊ माँसाहेब या लढाऊ, बाणेदार, स्वाभिमानी होत्या. त्या उत्तम न्यायाधीश होत्या. त्या करारी आणि कनवाळू होत्या. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला त्याप्रसंगी आप्तस्वकीयांत जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले. पुत्र शिवाजीराजे यांना जीवे मारण्यासाठी अफजलखान आला. पन्हाळा वेढा, आग्रा कैद, पुरंदरचा तह, राज्याभिषेकाचे राजकारण असे अनेक प्रसंग जिजाऊ माँसाहेब यांनी अनुभवले; कठीण प्रसंगी त्या डगमगल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत. त्यांनी धीर सोडला नाही. याउलट संकटसमयी जिजाऊ लढणार्‍या होत्या. संकटाला संधी समजून त्यावर त्यांनी यशस्वी मात केली.

पती निधनानंतर सती न जाता जिजाऊ आपल्या पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्वराज्यनिर्मितीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. सती प्रथेसारख्या क्रूर, अमानूष प्रथेला लाथाडणार्‍या जिजाऊ क्रांतिकारक आहेत. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत भय निर्माण केले होते. त्याच पुण्यात बाल शिवबाला हाताशी धरून जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत अभय निर्माण केले. जिजाऊ बुद्धिप्रामाण्यवादी अर्थात प्रयत्नवादी होत्या. यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागेल, रणांगण गाजवावे लागेल, चातुर्य पणाला लावावे लागेल, जपमाळ ओढून आणि नामजप करून स्वराज्य स्थापन करता येणार नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्या देवभोळ्या-धर्मभोळ्या नव्हत्या. त्यांचा विश्‍वास कर्तृत्वावर होता.

जिजाऊ माँसाहेबांना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड होती. त्या गरिबांप्रती अत्यंत कारुण्यमूर्ती होत्या. महिलेवर अत्याचार करणार्‍या रांजे गावच्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा ठोठावली. आपल्या राज्यातील सर्व स्त्रिया आणि लहान मुले यांचे रक्षण झालेच पाहिजे, हा नियम जिजाऊंनी घालून दिला. त्या अत्यंत न्यायनिष्ठूर होत्या. त्यांनी शिरवळ परगण्यातील मुजेवी येथील लखो विठ्ठल आणि पुणे परगण्यातील बहेरखेड येथील गणोजी गुरव यांना जमिनीच्या खटल्यात योग्य न्याय दिला. जिजाऊंचा गुप्तहेर खात्यावर अंकुश होता. त्यांची स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा होती. गुप्तचर यंत्रणनेवर त्यांनी विशेष लक्ष दिले होते. शिवाजीराजे कोकण मोहिमेवर असताना खवासखान येत असल्याची बातमी जिजाऊंनी शिवरायांना पोहोच केली.

जिजाऊ युद्धकलेत निपुण होत्या. त्यांच्या धैर्याचे, शौर्याचे, पराक्रमाचे आणि लढाऊ वृत्तीचे वर्णन त्यांना प्रत्यक्ष पाहणार्‍या समकालीन कवींद्र परमानंदाने ‘शिवभारत’ या ग्रंथात पुढीलप्रमाणे केले आहे. ‘राजगडावर राहणारी शिवाजीची माता जिजाऊ आपल्या गडाच्या रक्षणाच्या कामी दक्ष झाली.’ (शिवभारत, अध्याय 26/5) प्रदीर्घकाळ शिवाजीराजे पन्हाळा वेढ्यात अडकले असताना त्या स्वतः शिवबाची सुटका करण्यासाठी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून निघतात, त्याप्रसंगी जिजाऊ काय म्हणतात त्याचे वर्णन परमानंद पुढीलप्रमाणे करतो, ‘त्या माझ्या पुत्रास (शिवाजीस) स्वतः सोडवण्याचा मी प्रयत्न करीन आणि जोहराचे मुंडके आज युद्धातून घेऊन येईन.’ (शिवभारत, अध्याय 26/14). त्या महान योद्धा, शूर, मुत्सद्दी, धैर्यशाली, राजनीतीज्ज्ञ होत्या. शिवाजीराजे आग्रा कैदेत असताना जिजाऊंनी स्वराज्याचे नेतृत्व केले. त्यांनी स्वराज्याची इंचभर भूमीदेखील शत्रूला जिंकू दिली नाही. जिजाऊंनी राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यामुळे शिवरायांना साथ देणारे सर्व जाती-धर्मांतील मावळे निस्वार्थ आणि निर्भीडपणे पुढे आले. जिजाऊंनी मावळ्यावर उदात्त विचारांचे संस्कार केले. त्यांच्यात ध्येयवाद आणि आत्मविश्‍वास निर्माण केला.

समकालीन डच दप्तरात जिजाऊंच्या योगदानाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे, ‘शिवाजी महाराजांच्या मातोश्री सुमारे 80 वर्षांच्या होत्या, तरी त्या राज्याभिषेक समारंभाला उपस्थित होत्या. त्यानंतर बारा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडून शिवाजीराजांना 25 लाख पॅगोडे मिळाले.’ त्यांनी सर्व काही रयतेच्या कल्याणासाठी समर्पित केले. महात्मा फुले म्हणतात, ‘ज्या शिवबाची मातोश्री युद्धकला, राजनीतीमध्ये निष्णात आहे, त्या शिवरायांना कोणत्याही बाह्य गुरूंची गरजच नव्हती.’ परमानंद म्हणतात, ‘शहाजीराजांची महाराणी जिजाऊ म्हणजे विजयलक्षणा, कमलनेत्रा, यशस्विनी, विजयवर्धिनी अशी जाधवराव यांची कन्या आहे.’ (शिवभारत, अध्याय 2/44, 5 /53) जिजाऊ माँसाहेब अत्यंत सुंदर होत्या. त्या विजयवर्धिनी म्हणजे विजय खेचून आणणार्‍या यशस्विनी होत्या, असे समकालीन परमानंद म्हणतो. शहाजीराजांच्या पदरी असणारा समकालीन जयराम पिंडे ‘राधामाधवविलासचंपू’ या ग्रंथात वर्णन करतो,

जशी चंपकेशी खुले फुल जाई।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ।
जिचे किर्तीचा चंबु जंबुद्वीपाला।
करी साऊली माऊली मुलाला।

राजमाता जिजाऊ या हिंमतवान, कर्तृत्ववान आणि पराक्रमी होत्या. त्या शिवाजीराजांच्या मार्गदर्शक दीपस्तंभ होत्या, असे वस्तुनिष्ठ इतिहासकार कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, वा. सी. बेंद्रे, डॉ. जयसिंगराव पवार सांगतात, तर डॉ. बाळकृष्ण सांगतात, Jijabai was a guide and philosopher of Chhatrapati Shivaji Maharaj throughout her life.

जिजाऊंनी शिवरायांना घडवले, तसेच नातू शंभूराजांनादेखील घडविले. स्त्रीदेखील हिंमतवान, बुद्धिमान, कर्तृत्ववान, पराक्रमी, दूरद‍ृष्टीची असते, हे जिजाऊंनी दाखवून दिले. जिजाऊ हे स्वराज्याचे विद्यापीठ आणि ज्ञानपीठ आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणापीठ आणि संस्कारपीठ म्हणजे जिजाऊ माँसाहेब आहेत. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Back to top button