पावसाची हुलकावणी | पुढारी

पावसाची हुलकावणी

एखाद्या निकालाची प्रचंड उत्कंठा लागून राहावी, प्रसारमाध्यमांनी त्याची जोरदार तयारी करून त्यावेळी तज्ज्ञांना चर्चेसाठी आणून बसवावे आणि न्यायालयाने पुढची तारीख द्यावी, असे अनेकदा घडत असते. उत्कंठा ताणलेलीच राहते. मान्सूनच्या अंदाजाबाबतीत हवामान खात्याचे नेमके तसेच झाले आहे! निसर्गावर कधीच कुणाला हुकूमत गाजवता येत नाही आणि तो कधीच कुणाच्या नियंत्रणात येत नाही. त्यामुळे पूर्वानुभव आणि काही शास्त्रीय परिमाणांच्या आधारे अंदाज बांधण्यापलीकडे काही करता येत नाही. हवामान खात्यालासुद्धा आपल्या या मर्यादांची जाणीव असतेच, किंबहुना या खात्याचे अंदाज बहुतांश चुकण्यासाठीच असल्याची धारणा सामान्य लोकांमध्ये बळकट होत चालली असली तरी दरवर्षी त्या अंदाजाची वाट पाहिली जाते. शेतकर्‍यांसाठी तो महत्त्वाचा असतोच, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तो तितकाच महत्त्वाचा असतो.

सरकारला नियोजनासाठी त्याची गरज असते. यंदाचा पावसाच्या अंदाजाचा अनुभव मागील पानावरून पुढे असाच आहे! पावसाने सगळ्या अंदाजांना चकवा दिला असून, लांबलेला पाऊस चिंता वाढवणारा ठरत आहे. आपल्याकडे साधारणपणे सात जूनला पावसाला सुरुवात होत असते; परंतु आठवडा उलटून गेला तरी पावसाने आपला अंदाज लागू दिला नसल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होणे साहजिक आहे. अनेक भागांमध्ये त्याचा कानोसा घेऊन पावसाच्या तोंडावर पेरण्या केल्या जातात. तो वेळेत झाला नाही तर पेरण्या वाया जाऊन दुबार पेरण्यांची वेळ येऊ शकते, यंदा हे वेळापत्रक कोलमडण्याची वेळ आल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मान्सूनचे आगमन हवामान खात्याच्या कागदोपत्री झाले असले तरी प्रत्यक्षात त्याचे येणे सार्वत्रिक, एकसमान आणि सातत्यपूर्ण नाही. कोकणसह राज्यात तो कुठे कोसळतो आहे, तर अनेक ठिकाणी कोरडा ठणठणीत! उत्तर महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून, अनेक भागांत आजही टँकर सुरू आहेत.

याचाच अर्थ मान्सूनचे शुभागमन झाले असले तरी तो सक्रिय झालेला नाही. त्यामुळे शेतकरीही संभ्रमावस्थेत आहे. पावसाने अधिक ओढ दिली तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे आधीच धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले आहे. जुलै-ऑगस्टमधील महापुराच्या धास्तीने धरणांतील पाणीसाठ्यांवरही नियंत्रण ठेवले जाते, त्यामुळे पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. सुरुवातीच्या काळात पाऊस झाला तर माळरानावर गवत उगवते आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सुलभ होऊ शकतो, त्यादृष्टीनेही लांबलेल्या पावसाने काळजीत भर टाकली आहे.

पावसाच्या अंदाजाचा खेळ एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून रंगला असून, तो अद्याप सुरू आहे. सरकारी हवामान खात्याला स्पर्धकाच्या रूपात स्कायमेट ही संस्था पुढे आली आणि या संस्थेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यंदा मान्सून सर्वसाधारण राहण्याची 65 टक्के शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला होता. तूट असण्याची शक्यता 25 टक्के आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस असण्याची शक्यता 10 टक्के असल्याचे म्हटले होते. 2022 हे वर्ष दुष्काळी असणार नाही, हा त्यांचा अंदाज दिलासा देणारा होता. महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. राजस्थान, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना संपूर्ण हंगामात पावसाची कमतरता जाणवेल. केरळ आणि उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत कमी पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेश येथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.

तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील कोरडवाहू भागांतही यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली होती. मान्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात उत्तरार्धाच्या तुलनेत चांगले पाऊसमान राहील, असे या अंदाजात नमूद करण्यात आले होते. पाठोपाठ आलेल्या भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानेही देशात यंदा जून ते सप्टेंबर या हंगामाच्या कालावधीत मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहील आणि सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्रात पावसाची स्थिती चांगली राहण्याबरोबरच मराठवाड्याच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.

या पहिल्या अंदाजानंतर दीडेक महिन्याने म्हणजे पावसाळ्याच्या अगदी तोंडावर मोसमी वारे दोन दिवसांत तळकोकणात दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला. मोसमी पावसाने 29 मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला. अनुकूल स्थितीमुळे त्याने अतिशय वेगाने प्रवास सुरू केला आहे. त्यामुळेच मोसमी पाऊस कोकण आणि गोव्यात वेळेआधीच पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मोसमी पावसाचे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात आगमन होईल. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी वार्‍याचा वेग कमी असल्याने जूनमध्ये पावसाचा खंड पडण्याचा अंदाज कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता.

अशा रितीने हवामानाचे अंदाज व्यक्त होत असताना पावसाने मात्र या सगळ्यांनाच हुलकावणी दिली असल्याचे चित्र दिसतेे. गेले काही दिवस ‘हवामान बदल’हा शब्द सातत्याने चर्चेत येतो. महापुरापासून दुष्काळापर्यंत आणि उष्णतेच्या लाटेपासून शीतलहरीपर्यंत कोणत्याही संकटासाठी हेच एक कारण दिले जाते. सध्या पावसाचा जो लपंडाव सुरू आहे, त्यामागेही हेच कारण असल्याचे स्पष्ट आहे. याच हवामान बदलामुळे यंदा महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेच्या तीव्र लाटेला सामोरे जावे लागलेे. त्यानंतर आलेला समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज दिलासादायक होता. परंतु पावसाळ्याच्या प्रारंभीची स्थिती दिलासादायक वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Back to top button