एक कुटुंब, एक तिकीट, आम्हालाही? | पुढारी

एक कुटुंब, एक तिकीट, आम्हालाही?

का हो आबुराव, एवढ्या गडबडीत कुठे निघालाय?
तिकीट काढायला.
कसलं?
रेल्वेचं. जरा काशी, गया, प्रयाग वारी करून येतो.
अरे वा! एकटेच?
एकटा कशाने? सगळ्या फॅमिलीला घेऊन जातोय, ते बरे सोडतील मला एकट्याला?
खरंय. त्यांनाही पुण्य हवंच.
पुण्यासाठी नव्हे, स्वस्तात होतंय म्हणून जातोय. ‘एक कुटुंब, एक तिकीट’ योजना आहे तोवर फायदा घ्यावा म्हटलं. एक तिकीट परवडेल, सगळ्यांची तिकिटं काढायची म्हटली तर गावी पोहोचेपर्यंत पैसे संपतात एकेकदा.
कशाचा फायदा म्हणताय?
एका कुटुंबाने प्रवासासाठी फक्त एक तिकीट काढायचं. कसली भारी आहे ना सध्याची ही आयडियाची कल्पना?
भारी आहे; पण तुम्ही समजताय तशी नाही.
अच्छा, म्हणजे ठराविक मार्गांवरच लागू असणार आहे का?
तसंही नाही; पण देशाचं राजकारण रुळावर, मार्गावर येण्यासाठी गरजेचीच आहे ही!
भले, आमचं कुटुंब तीर्थस्थळी यात्रेला जाणार, त्यात राजकारण कसलं?
आबुराव! मी म्हणतोय हे तिकीट प्रवासाचं नव्हे, निवडणुकीचं असणार आहे. नवसंकल्प आहे हा उदयपूरचा.
बाबुराव, वाटल्यास जोड्याने हाणा; पण आमच्या डोक्याची अशी मंडई करू नका बुवा! कोणत्या खास कुटुंबासाठी आहे हे लफडं?
असंय आबुराव, चोवीस सालाला लोकसभा निवडणुका असणार. बराबर?
हो. लगीनघाई दिसतेच आहे आतापासून.
तर त्यासाठी उदयपूरच्या चिंतन शिबिरात काँग्रेसने हे धोरण जाहीर केलंय. एका कुटुंबातल्या जास्त लोकांना एका निवडणुकीचं तिकीट देऊ नये, त्यांना मोनॉपली म्हणजे एकाधिकार, अवास्तव सत्ता गाजवू देऊ नये ही कल्पना त्यामागे आहे.
बरोबर. नाहीतर बापामागे मुलगा, काकामागे पुतण्या अशा लायनीच लागतात आपल्या राजकारणात!
लागतात नाही, पूर्वी लागत होत्या. यापुढे नेत्यांच्या मुलांनासुद्धा तिकिटं मिळणार नाहीत, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितलंय अलीकडेच, मग भाचे-पुतणे तर दूरच राहिले. देशप्रेम आहे ना? पक्षात राहा, काम करा, खालपासून वर या; पण आयत्या खुर्चीचा मोह नको.
अरे वा! हेतू छान; पण व्यवहारात जमणार आहे का इतका निर्मोहीपणा?
जमवावा लागेल. आता काँग्रेसने काही तरी पळवाट काढलीये म्हणे की, दुसरा सभासद निदान पाच वर्षं पार्टीत काम केलेला असेल; तर त्याचा उमेदवारीसाठी विचार करता येईल वगैरे! पण भाजप तसंही करणार नाही.
नाही तरी घराणेशाही वाईटच असते, नाही का बाबुराव?
हो. दोन्ही बाजूंनी घातक. अजिबात काम केलं नाही किंवा गैरकाम केलं तरी यांना काढता येणार नाही. उगाच जागा अडवून असल्याने पुढच्या गुणी माणसांना संधी देता येणार नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मारच एक प्रकारचा.
आता ही आबदा टळणार म्हणा की. है शाबाश! तुला खुर्चीवर बशिवलंय, तर काम करून दाखीव, उगा बाबा-दादांच्या नावाआड दडू देणार नाही.
अरे वा! तुम्ही खुशीनं पाठिंबा देताय की. मला वाटलं होतं, यात्रा घडत नाही म्हटल्यावर नाराज व्हाल.
तुमची आमची नाराजी काय? येणार, जाणार! देशाचं भलं झालं तर अख्खा देश पुढे जाणार; मग अशा कल्पनांचं स्वागतच करायला हवं.

Back to top button