झेंडाबंधन!

झेंडाबंधन www.pudharinews.
झेंडाबंधन www.pudharinews.
Published on
Updated on

का हो आबुराव? आज अंगणातच फिरताय? बाहेर नाही येणार?
नको. अंगणातली बरीशी जागा बघून ठेवतोय. झेंडावंदनासाठी लागणार ना यंदा!
यंदाच का एवढी हौस आलीये?
यंदा काय म्हणे झेंड्याचं अभियान आलंय ना?
अभिमान म्हणायचंय का तुम्हाला?
नाही नाही. अभिमान नेहमीचा आहे. अभियान मात्र यंदाच येणार आहे.कसला मान? कोणतं यान? बैजवार सांगा बुवा एकदा.
यंदा अमृत महोत्सव नाही का देशाच्या स्वातंत्र्याचा? त्यासाठी हे अभियान आहे केंद्र सरकारचं. आलंय पेपरला. 11 ते 17 ऑगस्टमध्ये म्हणजे आठवडाभर प्रत्येक घरावर देशाचा झेंडा फडकवायचाय म्हणे.
अरे वा! दरसाल गावातल्या पोलीस चौकीवर, सरकारी हापिसांवर, सरकारी हॉस्पिटलांवर वगैरे झेंडा फडकतो, तोपण बघायला छान वाटतो. प्रत्येक घरावर लहरला तर कसलं भारी वाटेल ना?
भारी? मला तर आताच जडभारी वाटतेय ती आयडियाची कल्पना!
त्यात काय वाटायचंय? झेंडा आणायचा, लावायचा, फोटो काढायचे, फेसबुकात टाकायचे, लोकांनी लाईक करायचं, मला पाचशे लाईक्स आले, मला हजार लाईक्स आले असं ज्यानं त्यानं मिरवायचं! मज्जाच मज्जा!आणि यात कुठेही चुकलात तर सजाच सजा का?
या! चुकायचंय काय त्यात?
अहो, झेंड्याचे नियम असतात ना? तो सुती असावा, अमूक प्रमाणात त्याची लांबी-रुंदी असावी, तो सूर्यास्तापूर्वी उतरवावा वगैरे वगैरे…
हो, असं काहीतरी शिकवलंय खरं शाळेत.
झेंडा वेडावाकडा लावलात, त्याचा अनादर केलात म्हणून शिक्षापण होऊ शकते. पूर्वी 2006 पर्यंत व्यक्तिगत घरांवर, खासगी संघटनांवर राष्ट्रध्वज लावायची परवानगी नव्हती.
आता आहे ना परवानगी? मग लावेनात का सगळे लोक. मी पण माझ्या घरला गेलो की बघतो त्या अंगानं.
बघायला हरकत नाही. जमायला मात्र हवं.
तुम्ही सगळ्यात 'पण, परंतु' अशा खोड्या फार काढता बुवा!अहो, सरकार अचानक एकेक फर्मानं काढून मोकळं होतं. माझ्यासारख्याला त्यातल्या वेव्हाराची काळजी वाटते. विचार करा, 15 ऑगस्टपर्यंत एवढे कोटीच्या कोटी झेंडे मुळात बनायला नकोत का?
खरंच की. अंदाजे आपल्याकडे किती झेंडे लागतील हो?
सुमारे अकरा कोटी म्हणे. पेपरला आलंय…
बाबो! अकरा कोटी घरं, त्यावर अकरा कोटी झेंडे? केवढा व्याप हा.
तेच तर येतंय राहूनराहून मनात. आता बघा, मुळात एवढे झेंडे तयार होणं, ते वेळच्या वेळी वर चढणं, खाली उतरणं, जपून ठेवणं, केवढा कुटाणा होईल हा? दिवाळीसाठी लावलेला आकाशदिवा पुढे पार शिमग्यापर्यंत लोंबत ठेवणारे लोक आपण!
ती शिस्त लोकांना शिकवावी म्हणूनच काढलं असेल हे तुमचं अभियान.
आपल्या सर्वांचं, सर्वांसाठी आहे हे. देशप्रेम जागं व्हावं म्हणून बेतलेलं.
बघा. देशप्रेम नकोय का आपल्याला?
हवंय. बेशक हवंय; पण ते असं नाक दाबून, तोंड उघडून, नरड्यात औषध ओतावं तसं हवं का, हा प्रश्न आहे. 'झेंडावंदन' हे लोकांना 'झेंडाबंधन' वाटू नये म्हणजे मिळवली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news