सध्या महाराष्ट्रात भाषणबाजी फारच बोकाळली ऊर्फ माजली आहे. त्यातीलच हे एक 'पट्टीचे वक्ते' होते. हे स्वतःला राजकीय विश्लेषक असं म्हणवून घेत आणि समकालीन राजकारणावर सडकून टीका करत. एकूण यांच्या गटाच्या हातात सत्ता आल्याशिवाय महाराष्ट्राचं काही खरं नाही, असं सांगत महाराष्ट्रभर फिरत. यांचं कोणतंच सांगणं फारसं खरं नाही असं लोक मानत असल्याने कोणी त्यांना फार सीरियसली घेत नसे. तरीही हल्ली एवढ्यातल्या एवढ्यात चारपाचदा त्यांना जाहीर निषेधाला तोंड द्यावं लागलं त्याचा हा वृत्तांत आहे.
एका सभेत हे शिरा ताणताणून सांगत होते, काय चाललंय काय महाराष्ट्रात? लोक फक्त एकमेकांवर बोलताहेत. कोणाचं वजन किती? कोणाचं तोंड कसं वाकडं आहे? कोण बोबडं कसं बोलतं? कोण पहाटेपहाटे काय करतं? हेच मुद्दे असतात जाहीर भाषणांमध्ये. अरे, हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाहीये. पोरखेळ चाललाय सगळा.
हे एवढं बोलणार तेवढ्यात पलीकडच्या पटांगणावर टेनिसबॉलने क्रिकेट खेळणारी पोरं ओरडत आली, ओ काका, आमच्यावर घसरू नका. पोरखेळ असा फालतू असतो, असं कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही कोणी कोणाला व्यंगावरून बोलत नसतो. रागावलो तर सरळ उठतो, मारतो, चावतो, ढकलून देतो. 'पोरखेळ' हा शब्द मागे घ्या, त्याशिवाय भाषण पुढे जाऊ देणार नाही आयशपथ..!
पोरांचा घोळका आणि एकेकाच्या हातातल्या बॅटी पाहून ह्यांनी 'पोरखेळ' हा शब्द भाषणातून कमी केला.
पुढच्या एका भाषणात अशीच महाराष्ट्राविषयी काळजी, शंका व्यक्त करताना हे म्हणाले, अरे चाललंय काय महाराष्ट्रात माझ्या? पाहावं तिथे एकमेकांची उणीदुणी काढणं. फक्त व्यक्तिगत आरोप. आणि कोणाला जवळ, कोणाला दूर करत फक्त घोडेबाजाराची गणितं जमवणं.. माणसं आहोत ना आपण?
हे पुढे बोलणार तोवर पलीकडच्या मैदानात खरारा करायला आणलेले काही घोडे तगडक, तगडक करत यांच्यावर चालून आले. म्हणाले, अहो विद्वान, उगा अक्कल घोड्यापुढे धावू नका. घोडेबाजार काय घोडेबाजार? घोड्याएवढे वाढलात तरी आमची किंमत तुम्हाला कळंना झालीये? आधी 'घोडेबाजार' हा शब्द मागे घ्या. नाहीतर सभेवर स्वार होऊन ती उधळवून लावू.
हे मूळचेच भित्रट! सभेला घोडा लागेल म्हटल्यावर घाबरलेच. लगेच 'घोडेबाजार' हा शब्द गाळून बोलायला लागले,
पुढल्या सभेत यांनी माकडांना वेठीस धरले. सध्याचं राजकारण म्हणजे नुसत्या माकडचेष्टा चालल्यात, असं म्हणाले. त्याबरोबर सभेला आलेल्या काही माकडांनी दंगाच घातला.
अहो, माकडं काय असं वागतात का? राजकारणातल्या माणसांपेक्षा आम्ही खूप सेन्सिबल असतो बरं का! आधी 'माकडचेष्टा' हा शब्द मागे घ्या नाहीतर दाखवतोच तुम्हाला..!
असं करता करता कुत्र्यांशी, डुकरांशी अशी कोणाशीही तुलना केली की यांच्या सभेवर मोर्चे, संकटं यायला लागली. आता यांनी धडा घेतला आहे. सावधपणे म्हणतात, सध्या आपल्या राजकारणाने इतकी खालची पातळी गाठली आहे की, त्याची कोणाशीही तुलना करता येत नाही. पुढेमागे लोक त्याचाच दंडक मानून म्हणतील, अतुलनीय नीचतम पातळी कोणती? तर 2021-22 मधल्या महाराष्ट्रातल्या राजकारणासारखी.