Cybersecurity Researcher | निसर्ग अधिकारी

Cybersecurity Researcher |
Cybersecurity Researcher | निसर्ग अधिकारी
Published on: 
Updated on: 

युवराज इंगवले

उपजत बुद्धिमत्तेला अख्खे अवकाश खुले असते असे मानले जाते. मग, त्याला वयाचे कोणतेही बंधन नसते. जगभरात अनेक मुलांनी अगदी कमी वयात आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत लक्ष वेधून घेतले आहे. त्यातीलच एक म्हणजे भारताचा १९ वर्षीय सायबर सुरक्षा संशोधक निसर्ग अधिकारी होय. त्याने पुन्हा एकदा सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सीबीएसईच्या ऑनलाईन सबमिशन ऑफ मार्क्स (ओएसएम) पोर्टलमधील सुरक्षा त्रुटी शोधून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

आता अमेरिकेच्या न्याय विभागाने एका प्रणालीतील सुरक्षा त्रुटी निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्याचा गौरव केला आहे. आता निसर्गचे नाव अमेरिकेच्या न्याय विभागाच्या सायबर सुरक्षा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट झाले आहे. न्याय विभागाच्या मान्यताप्राप्त संशोधकांच्या यादीत अशा संशोधकांचा समावेश केला जातो, जे संस्थेच्या प्रणालींमधील वैध सुरक्षा त्रुटी जबाबदारीने उघड करतात. निसर्गने अमेरिकेच्या न्याय विभागाच्या एका महत्त्वाच्या कायदा अंमलबजावणी प्रणालीत ‘गंभीर सुरक्षा’ त्रुटी शोधली होती; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्याने त्या विशिष्ट प्रणालीचे नाव किंवा त्रुटीचे नेमके स्वरूप सार्वजनिक केलेले नाही. त्याच्या मते न्याय विभागाच्या संकेतस्थळावर माहिती पाहताना संभाव्य सुरक्षा त्रुटींचा शोध लागला. त्या शोधण्यासाठी त्याने स्वतः तयार केलेल्या कस्टम स्क्रिप्ट्सचा वापर केला.

कस्टम स्क्रिप्ट्स म्हणजे संशोधकांनी विशिष्ट कामांसाठी तयार केलेले संगणकीय प्रोग्राम, ज्याच्या मदतीने विद्यमान सायबर सुरक्षा साधनांशिवाय प्रणालीतील संभाव्य कमकुवतपणा शोधता येतो. निसर्गने आठवडाभरापूर्वी ही सुरक्षा त्रुटी अमेरिकन न्याय विभागाला कळवली होती. त्यानंतर विभागाने त्याच्या अहवालाची तपासणी केली, त्रुटीची पडताळणी केली आणि आठवड्याच्या आत ती दुरुस्त केली. त्यानंतर निसर्गच्या योगदानाची दखल घेत न्याय विभागाच्या हॉल ऑफ फेम संशोधकांच्या यादीत त्याचा समावेश केला. त्याच्या कामासाठी त्याला कोणत्याही प्रकारचे मानधन मिळाले नसल्याचे त्याने स्पष्ट केले. त्याच्या सायबर सुरक्षा संशोधनाचा विस्तार केवळ अमेरिकेच्या न्याय विभागापुरता मर्यादित नसून निसर्गने अमेरिकेच्या इतर सरकारी संस्थांनाही सुरक्षा त्रुटींबाबत अहवाल दिला आहे. यामध्ये अमेरिकेच्या लष्करी यंत्रणांचाही समावेश आहे.

यापूर्वी सीबीएसईच्या डिजिटल प्रणालींतील संभाव्य सुरक्षा त्रुटी दाखवल्याने निसर्ग प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने आयआयटी कानपूरमधील ओपन सोर्स इंटिलिजन्स आणि थ्रेट इंटिलिजन्समध्ये इंजिनिअर म्हणून काम सुरू केले. निसर्गने जून २०२३ मध्ये न्यू दिल्ली स्पेस सोसायटीमध्ये वेब डेव्हलपर म्हणून इंटर्नशिपद्वारे व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वतःचा हॅक क्लब सुरू केला आणि अनेक ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान दिले. सप्टेंबर २०२४ मध्ये तो स्कॅन या एआय प्लॅटफाॅमध्ये फाऊंडिंग इंजिनिअर म्हणून रुजू झाला. त्यानंतर सायफेरॉक आणि वेव्हलेंथमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून इंटर्नशिप केली. एकूणच निसर्गला अमेरिकेच्या न्याय विभागाकडून मिळालेला सन्मान हा त्याला सायबर सुरक्षा संशोधक म्हणून मिळालेली पोचपावतीच म्हणावी लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news