

राजस्थानमधील पुष्कर येथे दरवर्षी प्राण्यांचा फार मोठा बाजार भरतो आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल नेहमीच होते. येथील अनेक प्राणी अगदी खास असतात. त्यांचा रुबाब माणसांच्याही वरचा असतो. त्यांच्या किमती लाखांत आणि कोटींत असतात. त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्या प्राण्यांसमोर किस झाड की पत्ती, असे म्हणता येऊ शकते. चुकून त्या मेळ्यात, त्या प्राण्यांचे आपल्याकडे लक्ष गेलेच तर ते प्राणीच आपल्याला खिजवताहेत की काय, असे वाटू शकते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातूनही अनेकजण पुष्कर येथून घोडे खरेदी करून आणतात. हौसेला मोल नाही, असे म्हणतात तसाच काहीसा प्रकार.
पुष्कर येथे अडीच वर्षांचा ‘शहाबाज’ या नर घोड्याचे मोठेच आकर्षण आहे. खास प्रजननासाठी त्याचा वापर केला जातो आणि यासाठी दोन लाख रुपये शुल्क आकारले जाते. (इतर घोडे नक्कीच या घोड्यावर जळत असतील). या घोड्याची किंमत आहे 15 कोटी रुपये. म्हणजे आलिशान कारपेक्षाही महाग. 1,500 किलो वजनाची म्हैस आहे, तिची किंमत 23 कोटी रुपये ठरली आहे. मालकांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांनी या म्हशीचे राजेशाही पद्धतीने पालन केले आहे. म्हशीला दररोज दूध, गावरान तूप आणि सुकामेव्याचा खुराक देण्यात येतो. म्हणजे आपल्यासारख्या लोकांना जे पदार्थ सणावारांना खायला मिळतात, तो या म्हशीचा रोजचा खुराक आहे आणि त्यामुळे तिची किंमत 23 कोटींपर्यंत गेलेली आहे. एक ‘राणा’ नावाची म्हैस येथे आहे, तिची किंमत 25 लाख रुपये. तिला दररोज दीड हजार रुपयांचा खुराक लागतो. त्यात अंडी आणि काजू असतात. ‘बादल’ या अश्वाने आजपर्यंत 285 शिंगरांना जन्म दिला आहे, त्याची किंमत 11 कोटी लावली आहे.
येथे एक 16 इंचांची म्हणजे जेमतेम सव्वा फूट उंचीची गायही आहे. यावरून आपण एक निष्कर्ष काढू शकतो की, या प्राण्यांची परिस्थिती सध्या बरीच चांगली आहे. माणूस म्हणून जगण्यापेक्षा अशा मालकांचे प्राणी म्हणून का जगू नये, असे कुणाला वाटल्यास नवल नाही. एक आहे, हे खास प्राणी स्वतःच्या किमतीची कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असताना, माणसाची किंमत हरवून जाऊ नये. आपल्या वस्तूची किंवा प्राण्याची किंमत किती सांगायची, हे मालकाच्या हातात असते यात शंका नाही. विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांचे हे प्राणी खरेदी करणारे ग्राहकदेखील भारतामध्ये आहेत. देश झपाट्याने प्रगती करतोय हे ऐकून होतो. परंतु, असे काही बाजार पाहिले की, देश पूर्ण विकसित झाला आहे की काय, अशी शंका वाटायला लागते. मंडळी संगणक क्षेत्रामधील अभियंते मंडळींना कोट्यवधी रुपयांचे पॅकेज असतात हे ऐकले आहे. जगभरातील मोठ्या कंपनीचे सीईओंचे पगारही कित्येक कोटींत असतात. याची नेहमी चर्चा होत असते. पुष्कर येथील कोट्यवधीचे प्राणीही आता हेडलाईन्समध्ये येत आहेत. एकंदरीत, या प्राण्यांचे माणसांपेक्षा नक्कीच बरं चाललंय.