

'रूट कॅनल ट्रीटमेंट' (Root canal treatment) म्हणजे दाताच्या मुळाची साफसफाई. त्या दातापुरतं भुलीचं इंजेक्शन देऊन दाताचा वरचा किडलेला भाग मशिनने साफ केला जातो. मग हळूहळू दाताच्या प्रत्येक मुळाची सफाई केली जाते; ज्यामध्ये अनेक तंत्रज्ञानाचा, औषधी द्रव्यांचा उपयोग केला जातो. दात मुळापर्यंत साफ करून आत कुजलेली नस काढली जाते. (Root canal treatment)
'रूट कॅनल ट्रीटमेंट' किंवा आरसीटी हा आजकाल सवार्र्ंच्याच परिचयाचा शब्द झालेला आहे. सामान्य लोकांमध्ये दाताच्या या उपचाराबद्दल अनेक गैरसमज आणि भीती दिसून येते. बर्याच लोकांचं असं म्हणणं असतं की , डेंटीस्टकडे दातदुखी घेऊन गेलात की, ते थेट रूट कॅनल ट्रीटमेंटच सांगतात आणि चांगलीच किंमत या उपचारासाठी मोजावी लागते. त्यामुळे अनेकजण मधला पर्याय म्हणून दातदुखी कमी करण्यासाठी अनेक घरगुती नुसके आजमावताना दिसतात. मग त्यात लवंग तेलाचा बोळा लावणं असेल, पेरूच्या पानाचा चोथा लावणं असेल, विशिष्ट प्रकारच्या दंतमंजन दाताला लावून ठेवणे असेल किंवा औषधाच्या दुकानात जाऊन दुकानदाराकडून अंदाजे गोळ्या घेऊन त्याचे सेवन करत राहणे असेल. अशा अनेक शॉर्टकट उपचारांमुळे फायदा कमी आणि दाताचे नुकसानच जास्त होते आणि शेवटी जेव्हा दातदुखी विकोपाला पोहोचते तेव्हा पर्याय उरतो तो दंतवैद्याकडे जाणे. आणि अर्थातच हा दात वाचविण्यासाठी बर्याचवेळा शेवटचा पर्याय असतो तो रूट कॅनल ट्रीटमेंटचा.
आपल्या तोंडात दिसणार्या दाताचा भाग हा तीन आवरणांनी बनलेला असतो. सर्वात वरचे आवरण असते ते 'इनॅमल'. याला दाताचा संरक्षक म्हणतात. या भागात कोणत्याही प्रकारच्या मज्जातंतू (पर्शीींश) नसतात. त्यामुळे जेव्हा दातांची कीड पहिल्या आवरणात चालू होते, तेव्हा पेशंटला कोणत्याही प्रकारची जाणीव नसते. फक्त काळ्या रंगाचे डाग दातावर दिसतात; पण मग काही त्रास नसल्यामुळे बर्याचवेळा दुर्लक्षच होते. दोन नंबरच्या आवरणाला 'डेंटीन' असे म्हणतात. यामध्ये काही प्रमाणात मज्जातंतू असल्याने जेव्हा दातांची कीड या आवरणापर्यंत पोहोचते तेव्हा बर्याच पेशंटना गरम, थंड, गोड खाल्ल्यास झिणझिण्या यायला लागतात. या टप्प्यावरची कीड बहुतांशी छोट्या-मोठ्या दाताच्या फिलिंग्स (सिमेंट्स) ने दंतवैद्याकरवी भरता येते; पण बरेचसे पेशंट अशावेळी घरगुती उपाय आजमावतात आणि तात्पुरते दुखणे बंद होते; पण किटाणूंची दात पोखरण्याची प्रक्रिया चालूच राहते.
जेव्हा ही कीड तिसर्या आवरणामध्ये येऊन पोहोचते, ज्याला 'पल्प' म्हणतात, तेव्हा मात्र पेशंटला त्या दातात जोरात कळा मारायला लागतात, सूज येते, पू भरतो, ताप येतो, दात तात्पुरता हलायला लागतो, चेहर्याची एक बाजू, कान ठणकायला लागतो, पेशंटला पाणी पिताना, जेवताना खूप त्रास होतो. 'पल्प' हा सजीव भाग असतो. ज्यामध्ये मज्जातंतूबरोबरच रक्तपुरवठाही खूप असतो. दातांची कीड हळूहळू जेव्हा 'पल्प'ला खराब करते, तेव्हा तो 'पल्प' कुजायला सुरुवात होते. तेव्हा होणार्या प्रचंड त्रासातून बरे व्हायचा मार्ग म्हणजे त्या दाताची 'रूट कॅनल ट्रीटमेंट' करणे.
बर्याच लोकांना असं वाटतं की, आरसीटी म्हणजे खूप त्रासदायक उपचार. प्रचंड दुखतं, यामध्ये दाताचे मूळ काढले जाते आणि शेवटी दातही पडून जातो. आणि अशा अनेक गैरसमजुतींमुळेच अनेक लोक आपले किडलेले, पण मजबूत दात हकनाक गमावून बसतात. 'रूट कॅनल ट्रीटमेंट' म्हणजे दाताच्या मुळाची साफसफाई. त्या दातापुरतं भुलीचं इंजेक्शन देऊन दाताचा वरचा किडलेला भाग मशिनने साफ केला जातो. मग हळूहळू दाताच्या प्रत्येक मुळाची सफाई केली जाते, ज्यामध्ये अनेक तंत्रज्ञानाचा, औषधी द्रव्यांचा उपयोग केला जातो. दात मुळापर्यंत साफ करून आत कुजलेली नस काढली जाते. आणि अर्थातच दाताच्या आतील सजीव; पण कुजलेला भाग निघून गेल्याने दात दुखायचाही बंद होतो. (Root canal treatment)
वेळोवेळी एक्स-रे घेऊन दंतवैद्य दाताच्या मुळांची, आजूबाजूच्या हाडातील जखमेची तपासणी करतात. आणि एकदाका इन्फेक्शन कमी झाले की, मग कायमचे सिमेंट दाताच्या मुळांमध्ये आणि नंतर वरील भागावर भरले जाते आणि दाताला सील केले जाते. एकदा दाताची 'रूट कॅनल ट्रीटमेंट' संपली की, पुढची पायरी असते, त्या दातावर कॅप घालणे. बरेचसे लोक दात दुखायचा थांबलाय, आता सिमेंटही भरले, मग कॅपची गरज काय? म्हणून दुर्लक्ष करतात आणि अत्यंत सक्रियतेने त्या दाताचा वापर करायला लागतात; पण लक्षात घ्या, रूट कॅनल म्हणजे आपण दाताला निर्जीव करतोय, त्या दाताला आता कोणत्याही प्रकारचा रक्तपुरवठा नसतो, त्यामुळे त्याला शक्तीही मर्यादितच असते. अशावेळी आपल्या चर्वणाचा जोर त्या दातावर सतत पडत राहिल्यास दात तुटण्याची शक्यता असते. आणि एकदाका दात तुटला की, मग तो काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
मग मात्र दातही जातो आणि त्याची केलेली 'रूट कॅनल ट्रीटमेंट'ही. हे सर्व टाळायचे झाल्यास आरसीटीनंतर एक-दोन आठवड्यांतच त्या दातावर कॅप बसवणे अत्यंत महत्त्वाचे असते; जेणेकरून खाण्या-पिण्याचा सगळा जोर त्या कॅपवर पडतो आणि आतील दात बर्यापैकी सुरक्षित राहतो. आज अनेक प्रकारच्या कॅप उपलब्ध आहेत. मुळातच जर आपण वर्षातून किमान एकदा आपल्या दंतवैद्यांकरवी दातांची तपासणी करून घेतली, सुरुवातीचे उपचार करून घेतल्यास दाताला रूट कॅनलपर्यंत जाण्याची वेळच येणार नाही.
डॉ. स्नेहल सुखटणकर