

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तानने टी २० वर्ल्डकपमध्ये पहिल्यांच भारताला मात दिली. तब्बल १२ वर्ल्डकप पराभवानंतर पाकिस्तानला विजय साजरा करण्याचा मौका मिळाला आहे. मात्र वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच पराभव झालेल्या भारतातील काही नेटकऱ्यांनी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असभ्य कमेंट येत आहे. यावर क्रिकेट जगतातील लोक आणि राजकारणीही व्यक्त होत असून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी मोहम्मद शमीला पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.
मोहम्मद शमीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही विकृत नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवरही काही काळ गद्दार हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. त्यानंतर लगेचच मोहम्मद शमीच्या समर्थनार्थ शमी आणि मोहम्मद शमी हे ट्रेंड सुरु झाले. सुरुवातीला क्रिकेटपटूंनी शमीच्या समर्थनार्थ मोर्चा खोलला. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने 'मोहम्मद शमीवर ऑनलाईन हल्ला होणे हे धक्कादायक आहे. तो चॅम्पियन आहे आणि जो कोणी भारताची कॅप घालतो त्याच्या मनात ऑनलाईन टोळक्यापेक्षा जास्त भारत बसतो. आम्ही शमीबरोबर आहोत. पुढच्या सामन्यात तुझा जलवा दाखवून दे.' असे ट्विट केले.
त्यानंतर यजुवेंद्र चहलनेही मोहम्मद शमीला पाठिंबा देणारे ट्विट केले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही शमीला पाठिंवा देणारी फेसबुक पोस्ट लिहीली. राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये लिहीतात, 'मोहम्मद शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. लोकांची मने घृणेने भरलेली असतात कारण त्यांना कोणी प्रेम दिलेलंच नसतं. त्यांना माफ करुन टाक.'