

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिमकार्ड अॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने सदाशिव पेठेत राहणार्या एका 50 वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन तब्बल 4 लाख 90 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात मोबाईल धारकांच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित 50 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ही घटना 23 डिसेंबरला घडली. फिर्यादींना अज्ञात मोबाईलधारकाने फोन करून त्यांचे सिम अॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने दहा रुपयांचे रिचार्ज करण्यास सांगितले. त्यानंतर बँक खात्याची माहिती त्यांना शेअर करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातून 4 लाख 90 हजार रुपये परस्पर काढून घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.