पारंपरिक औषध प्रणालीला समानतेची हमी

पारंपरिक औषध प्रणालीला समानतेची हमी
Published on
Updated on

आयुर्वेद आणि योगशास्त्राच्या परिणामकारकतेचे भारताने दर्शन घडवल्यामुळे संपूर्ण जग भारताला परवडण्याजोग्या आणि गुणकारीपणा सिद्ध झालेल्या औषधांच्या क्षेत्रातील पारंपरिक ज्ञानाच्या खजिन्याचे भांडार मानत आहे. भारताच्या जी-20 च्या अध्यक्षतेमुळे जागतिक नेते आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना बारकाईने ही परिणामकारकता दाखवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली. उत्तम आरोग्य आणि कल्याण याविषयीची शाश्वत विकास उद्दिष्ट्ये तीनवर लक्ष केंद्रित करून, मानवता आणि पर्यावरणविषयक सातत्याने वाढत जाणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतातील पारंपरिक आरोग्यनिगाशास्त्रे कशा प्रकारे कामगिरी बजावत आहेत, हे जागतिक समुदायाला पटवून देणार्‍या सर्व चर्चा आणि वाटाघाटींमध्ये आयुष मंत्रालयाचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

कोरोना महामारीनंतर जागतिक समुदायाच्या आरोग्यविषयक वर्तनामध्ये खूप प्रमाणात बदल झाला असल्याचे अगदी स्पष्टतेने दिसत आहे आणि आता त्याची दिशा समग्र आरोग्य आणि निरामयतेकडे वळली आहे. उच्च दर्जाची, परवडण्याजोगी आणि सर्वांच्या आवाक्यात असलेली आरोग्यनिगा सेवा समानतेने उपलब्ध होणे, हीच मानवतेची गरज आहे. गेल्या 9 वर्षांत आयुष मंत्रालयाच्या विविध उपक्रमांमुळे विविध पारंपरिक औषधे प्रणालींमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची साधने आणि आधुनिक पद्धतींचा समावेश झाला आहे आणि त्यामुळे गुणकारीपणाच्या दाखल्यांवर आधारित असलेल्या आयुष क्षेत्रात एकंदरच प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जपानमध्ये ओसाका येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या तिसर्‍या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेवांसदर्भात अ‍ॅक्सेसिबल, अ‍ॅफोर्डेबल, अ‍ॅप्रोप्रिएट, अकाऊंटेबल आणि अ‍ॅडाप्टेबल या पाच 'ए'चा उल्लेख केला होता. याच पैलूंच्या अनुषंगाने आयुष मंत्रालय सातत्याने काम करत आहे आणि भारताच्या जी-20 अध्यक्षतेअंतर्गत मंत्रालयाने विविध कार्यक्रम चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन पारंपरिक औषधांसाठी संशोधन आणि विकास आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांना प्रमाणित करण्यासाठी जागतिक सहकार्य आणि समन्वयाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याकडे सर्व प्रकारच्या आवश्यक यंत्रणा असल्याचे आणि या क्षेत्रातील ज्ञान, क्षमतावृद्धी आणि सर्वोत्तम पद्धतींची हितधारकांसोबत देवाणघेवाण करण्यासाठी संपर्कात राहण्याचे दर्शन घडवले आहे.

पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी प्रशंसा केली आणि पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात भारताचे योगदान असाधारण असल्याचा पुनरुच्चार या शिखर परिषदेत केला. या जागतिक शिखर परिषदेच्या फलनिष्पत्तीविषयीच्या दस्तऐवजांना जागतिक आरोग्य संघटना गुजरात जाहीरनामा म्हणून लवकरच जाहीर करणार असल्याची बाब विशेषत्वाने लक्षात घेण्याजोगी आहे. जी-20 शेर्पा अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच जुलै महिन्यात दिल्ली येथे यासंदर्भात एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. जी-20 च्या माध्यमातून जागतिक पातळीवर आयुष औषध प्रणालीचा पुरस्कार करण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून होणार्‍या प्रयत्नांवर या बैठकीत भर देण्यात आला.

जी-20 च्या विविध संपर्क आणि कार्यगटांच्या बैठकांमध्ये आयुष मंत्रालयाच्या प्रयत्नांचा निश्चित स्वरूपात परिणाम झालेला पाहायला मिळाला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल यांनी या संदर्भात केलेले वक्तव्य त्याचा दाखला देणारे होते. भारताच्या जी-20 अध्यक्षतेअंतर्गत आगामी आरोग्य जाहीरनाम्यामध्ये पारंपरिक औषधांचा समावेश करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आधुनिक आरोग्य सेवांच्या संदर्भात पारंपरिक औषध पद्धतींच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी तज्ज्ञ आणि हितधारकांना एक भक्कम मंच प्रदान करण्यासाठी पारंपरिक औषधांसाठी समर्पित मंच स्थापन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याच बैठकीत स्टार्टअप-20 चे भारताचे अध्यक्ष चिंतन वैष्णव यांनी भविष्याला आकार देणार्‍या स्टार्टअप-20 च्या जाहीरनाम्याच्या यादीत आयुष औषध प्रणाली समाविष्ट करण्यात आली असल्याची माहिती दिली.

अत्याधुनिक रुग्णालये आणि कुशल डॉक्टर्समुळे भारत वैद्यकीय पर्यटनासाठी सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण म्हणून उदयाला आला आहे. देशात वैद्यकीय पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी तिरुवनंतपुरममध्ये पहिल्या आरोग्य कार्यगटाने वैद्यकीय मूल्यप्रवास या सहकार्यक्रमाचे आयोजन केले. भारतामध्ये वैद्यकीय पर्यटन उद्योगाला असलेल्या संधी आणि त्यासमोर असलेली आव्हाने यावर चर्चा करण्यासाठी हा मंच अतिशय फलदायी आणि विचार प्रदान करणारा ठरला. अनेक हितधारकांनी असे निरीक्षण नोंदवले की, अतिशय भक्कम पद्धतीने पारंपरिक औषध प्रणालींचा समावेश असलेल्या एकात्मिक आरोग्य सेवांवर आधारित वैद्यकीय मूल्यप्रवासाच्या माध्यमातून जगाला जोडल्यामुळे सद्य:स्थितीमधील आरोग्य सेवा प्रणालीमधील असमानता दूर होऊ शकेल. अलीकडील काही वर्षांत आयुष उद्योगामध्ये महत्त्वाचे संक्रमण झाले आहे.

आयुष मंत्रालयाने नियामक अनुपालन आणि प्रस्थापित मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनाच्या महत्त्वावर भर दिला आहे. आयुष औषधांसाठी एका नियामक चौकटीची मंत्रालयाने अंमलबजावणी केली आहे. ज्यामध्ये उत्पादकांना, आयातदारांना आणि वितरकांना परवाना देणे आणि प्रमाणीकरण करण्याच्या प्रक्रियांचा समावेश आहे. त्याशिवाय आयुष मंत्रालयाने आयुषच्या क्षेत्रात निष्कर्ष आधारित संशोधन आणि वैद्यकीय उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. आयुष उपचारांची परिणामकारकता आणि सुरक्षा प्रमाणित करण्यासाठी काटेकोर पद्धतीचा शास्त्रीय अभ्यास आणि वैद्यकीय चाचण्यांना मंत्रालय प्रोत्साहन देत आहे. आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही नियामक प्राधिकरणांसोबत माहितीची, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी आणि आयुष औषधांच्या नियामक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आयुष मंत्रालयाने सहकार्य प्रस्थापित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news