पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात; फातोर्ड्यात जाहीर सभा, बंदोबस्तासाठी 2 हजार पोलिस तैनात

file photo
file photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी 6 रोजी गोवा दौर्‍यावर येत आहेत. मडगाव येथे होणार्‍या 'विकसित भारत, विकसित गोवा' रॅलीला संबोधित करण्यासोबत तीन प्रकल्पांचे उद्घाटन व दोन प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विराट सभेच्या माध्यमातून भाजप शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍याची सर्व तयारी पूर्ण झाली असून त्यांच्या स्वागतासाठी मडगावासीय सज्ज झाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यानिमित्त फातोर्ड्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मडगावसह परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करकण्यात आली आहे. सभेसाठी मडगावचा कदंब बसस्थानक परिसर निवडण्यात आला असून बसस्थानक दुसरीकडे स्थलांतरित करून 50 हजार लोक मावतील एवढा शामियानाही उभारण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बेतूल येथे 'इंडिया एनर्जी विक'चे उद्घाटन होणाऱ आहे. त्या व्यतिरिक्त राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, कुंकळ्ळी, दोनापावला येथील जलक्रीडा प्रकल्प, कुडचडे कचरा प्रक्रिया प्रकल्प यांचे उद्घाटन केले जाणार असून पणजी ते रेईश-मागूश किल्ला रोप-वे आणि शेळप येथे जलशुद्धीकरण प्रकल्प या कामांचा प्रारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला असून आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक, आमदार विजय सरदेसाई हे सभेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी दिल्लीतून जवान दाखल झाले आहेत. त्यासोबतच केंद्रीय निमलष्करी दल, केंद्रीय राखीव दल यांच्यासह तब्बल 2 हजार पोलिस तैनात करण्यात आली असून पंतप्रधानांचा मडगाव ते बेतूल हा प्रवास तब्बल 300 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या निगराणीखाली होणार आहे.

दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने पंतप्रधानांच्या सुरक्षेवर भर देताना 2 हजार पोलिस तैनात केले आहेत. यात सुमारे 450 महिला पोलिसांचा समावेश आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

सांगली आणि कोल्हापूर पोलिसांच्या श्वान पथकांसह गोवा पोलिसांचे श्वान पथक आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप मिळून 4 श्वान पथके मडगावात दाखल झाली आहेत. सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून एकूण दोनवेळा श्वानपथकांकडून सभेच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली आहे. एटीएसच्या शीघ्र कृती दलाची पाच पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय पिंक फोर्सची चार पथके, दोन राखीव दलाच्या तुकड्या, चार केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या नियुक्त केल्या आहेत.

इच्छुक उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन

पंतप्रधानांच्या सभेला लोकांना आणण्याची जबाबदारी दक्षिण गोव्यातील आमदारांवर देण्यात आली आहे. लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांनीही शक्ती प्रदर्शनासाठी जास्तीतजास्त लोक सभेला आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर यांनी बेतूल येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे.

3 प्रकल्पांचे उद्घाटन,

2 प्रकल्पांची पायाभरणी

मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा

मडगावातील शाळांना सुट्टी

50 हजार लोकांसाठी शामियाना
स्वागतासाठी मडगाववासीय सज्ज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news