प्रिमॅच्युअर बेबी आणि स्तनपान

प्रिमॅच्युअर बेबी आणि स्तनपान
Published on
Updated on

आई आणि बाळासाठी स्तनपानाचे अनेक फायदे आहेत. मुदती आधी जन्मलेल्या अर्भकांसाठीही आईचे दूध तितकेच महत्त्वाचे आहे कारण ते त्यांना निरोगी आयुष्य बहाल करते. त्याचबरोबर प्रतिकार शक्ती वाढवून विविध आजार तसेच संसर्गांचा सामना आणि संक्रमणांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. नव मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्तनपान करणे आवश्यक आहे. 37 ते 42 आठवड्यांपूर्वी म्हणजेच अकाली जन्मला आलेल्या बाळाला प्रिमॅच्युअर बेबी असे म्हणतात. अकाली जन्मलेल्या बाळाचे अवयव अनेकदा पूर्णपणे विकसित होत नसल्यामुळे, त्यांना श्वासोच्छवासाच्या समस्या, संसर्ग, अशक्तपणा आणि रक्तातील साखर कमी होणे यासारख्या विविध आरोग्य समस्यांचा सामना देखील करावा लागतो. अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषणाकडे सुरुवातीला दुर्लक्ष झाले तर भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आईच्या दुधामुळे बाळाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

अकाली जन्माला येण्यामागील कारणे जुळी, तिळी मुलं किंवा इतर समस्या जसे की गर्भाशय किंवा नाळेची समस्या, धूम्रपान किंवा अवैध औषधांचा वापर, उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही देखील कारणे असू शकतात. गर्भधारणेपूर्वी कमी वजन किंवा जास्त वजन असणे, गरोदरपणात एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा घरगुती हिंसाचार आणि आघात यासारख्या तणावपूर्ण घटना अशी काही कारणे अकाली प्रसूतीस कारणीभूत ठरू शकतात. बाळे सुरुवातीला स्तनपान स्वीकारू शकत नाहीत कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. अकाली जन्मलेल्या बाळांच्या जठराचाही अनेकदा योग्य प्रकारे विकास होत नाही, त्यामुळे त्यांना तोंडातून किंवा नाकातून थेट पोटात टाकलेल्या नळीद्वारे अतिशय हळूहळू आहार द्यावा लागतो. परंतु, बाळाला आईचे दूध देणे अत्यावश्यक आहे कारण त्यात अँटीबॉडीज असतात, जे रोगाशी लढण्यास आणि संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करतात.

स्तनपान विशेषत: नेक्रोटाइझिंग एन्टरोकोलायटिस (एनईसी) टाळण्यास मदत करते, हा एक धोकादायक रोग ज्यामध्ये आतड्याचे काही भाग सूजतो आणि खराब होतो. आईचे दूध आतड्यांची काळजी घेण्यास मदत करते आणि मेंदूच्या विकासास सहाय्य करते. अकाली प्रसूती झालेल्या मातांच्या दुधामध्ये प्रथिने, सोडियम आणि क्लोराईडचे प्रमाण जास्त असते आणि लैक्टोजचे प्रमाण कमी असते. तसेच आईच्या दुधात असलेले फॅट्स बाळ सहजपणे पचवू शकते. आईच्या आरोग्यासाठीही स्तनपान महत्त्वाचे असते. हे आईला स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगापासून दूर ठेवण्यास मदत करते, बाळाशी तिचे संबंध आणखी मजबूत करते, तणाव कमी करते आणि प्रसूतीनंतरचे नैराश्य देखील कमी होते. आईचे दूध जन्मानंतर सुमारे दोन ते चार दिवसांनी तयार होते, परंतु जर वेळेआधी प्रसूती झाली तर दूध तयार होण्यास थोडा उशीर लागू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news