तामिळनाडूतील राजकारण

तामिळनाडूतील राजकारण
Published on
Updated on

एकेकाळी जयललिता यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूची सत्ता मिळवलेल्या अण्णा द्रमुकने तूर्तास भाजपशी आघाडी करणार नसल्याची घोषणा केली. दक्षिणेच्या राजकारणातील ही महत्त्वाची घटना. आघाडीसंदर्भातील निर्णय निवडणुकीवेळी होईल, त्यासंदर्भात आताच चर्चा होणार नाही, अशी पक्षाची भूमिका अण्णा द्रमुकने घेतली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या विरोधात एनडीएच्या गोटाची मजबूतपणे बांधणी सुरू असतानाच पक्षाने हा निर्णय घेतला. भाजपसाठी तो अनपेक्षित आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएचीही गोची झाली आहे. भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई कुप्पुसामी यांनी अण्णा द्रमुक पक्षाचे नेते अण्णादुराई, जयललिता यांच्याबरोबरच पेरियार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पक्षाकडून तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आला.

भाजपला आमच्याशी युती नको असल्याचे अण्णामलाई यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट होते, निवडणुकीच्यावेळी जो काही घ्यायचा तो निर्णय घेतला जाईल, असे अण्णा द्रमुकने स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्ष तामिळनाडूशी जवळीक प्रस्थापित करण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न करत आहे. दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या विधानांमुळे राज्यातील राजकीय परिस्थिती बिघडली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये मतभेद असले तरी अद्याप कुठल्या पक्षाने आघाडीपासून फारकत घेतलेली नाही, त्यामुळे आघाडी अभेद्य असल्याचे चित्र निर्माण होते. त्याचवेळी भाजपकडून एनडीएची पुनर्बांधणी सुरू आहे. जुन्या सहकार्‍यांना सोबत घेण्याच्या पक्षाच्या हालचाली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रयत्न सुरू असतानाच अण्णा द्रमुकने हा निर्णय घेतल्याने त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. अर्थात, निवडणुकीच्यावेळी नवी समीकरणे समोर येऊन आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आघाडी ही जशी भाजपची आहे, तशीच ती अण्णा द्रमुकचीही गरज आहे. तामिळनाडूतील द्रमुक आणि काँग्रेसच्या भक्कम आघाडीचा सामना करण्यासाठी तशाच भक्कम युतीची गरज असल्याचे दोघांनाही माहीत आहे; परंतु अण्णा द्रमुकच्या आदर्शांवर टीका होत असेल आणि पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल, याची जाणीव अण्णा द्रमुकच्या नेत्यांना आहे, त्याचमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमधून एनडीएला 25 खासदारांचे पाठबळ मिळायला हवे, अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच जाहीरपणे व्यक्त केली होती. लोकसभेत राजदंड बसवण्याबरोबरच संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी तामिळनाडूतील वीस साधूंना निमंत्रित करण्यात आले होते. नवीन लोकसभेत ऐतिहासिक राजदंड (सेंगॉल) बसविल्याबद्दल तमिळ जनतेने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानावेत, असेही आवाहन शहा यांनी केले होते.

तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांचे निमित्त अण्णा द्रमुक पक्षाला मिळाले. मतांचे ध्रुवीकरण होऊ शकते, ही बाब अण्णा द्रमुकच्या नेत्यांच्या निदर्शनास आली आहे. त्या अनुषंगानेही भाजपसोबतच्या युतीबाबत अण्णा द्रमुकमध्ये विविध मतप्रवाह होते. द्रमुक नेते आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याशी भाजपचे फारसे जमत नाही. त्यामुळे द्रमुक सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न केंद्रातील भाजपकडून सातत्याने केले जातात. अलीकडेच 'ईडी'ने द्रमुक सरकारमधील मंत्र्याला अटक केल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले. स्वाभाविकपणे द्रमुकचा विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकशी भाजपने जवळीक वाढवत नेली. केंद्रातील राजकारणाचा विचार करून नियोजनबद्ध रितीने हे प्रयत्न करण्यात आले; परंतु केंद्रीय पातळीवरून सुरू असलेले प्रयत्न आणि स्थानिक पातळीवरील राजकारण यांच्यात अंतर दिसून आले. स्थानिक नेत्यांनी अण्णा द्रमुकच्या श्रद्धास्थानांवर टीका केल्यामुळे परिस्थिती चिघळली. तामिळनाडूतील द्रमुक किंवा अण्णा द्रमुकचे राजकारण प्रादेशिक अस्मितेशी निगडित मुद्द्यांवर आधारित असते. भाजपकडून केला जाणारा हिंदी भाषेचा आग्रह तमिळ जनतेला मान्य होणारा नाही, त्यामुळे आपली अडचण होत असल्याची अण्णा द्रमुकच्या नेत्यांची भावना झाली आहे. केंद्राने हिंदी सक्तीचा प्रयत्न केला तरी तामिळनाडूतील सर्व राजकीय पक्ष मतभेद विसरून एकत्र येतात. अण्णा द्रमुकला भारतीय जनता पक्ष आणि केंद्रातील त्यांचे सरकार हवे आहे, पण ते केवळ सोयीच्या राजकारणासाठी, हे अनेकदा दिसून आले आहे. दुसरीकडे भाजपला दक्षिणेत पाय रोवायचे आहेत, त्यासाठी पक्ष स्थानिक पक्षांसोबत आघाडी करून हातपाय पसरण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याद़ृष्टीनेही भाजपसाठी अण्णा द्रमुकचे महत्त्व आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकबरोबर युती करून भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. तामिळनाडूमध्ये वर्षानुवर्षे द्रमुक किंवा अण्णा द्रमुक हे दोन प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत. 1967 पासून कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला इथली सत्ता मिळू शकलेली नाही. देशात काँग्रेस मजबूत असताना तामिळनाडूमध्ये मात्र या पक्षाला नेहमीच द्रमुक किंवा अण्णा द्रमुकची मदत घ्यावी लागत असे. भाजपनेही तेच धोरण पुढे चालवत अण्णा द्रमुकला जवळ केले आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर आणि शशिकला तुरुंगात गेल्यानंतर कमकुवत झालेल्या अण्णा द्रमुक पक्षाची जागा घेता येईल, असा भाजपच्या नेतृत्वाचा होरा होता; परंतु त्यांना ते शक्य झालेले नाही. कारण, भाजपच्या उत्तरेच्या पट्ट्यात यशस्वी ठरणार्‍या राजकारण दक्षिणेत चालत नाही. भाजपसाठी एकेक जागा महत्त्वाची आहे, त्यासाठी येईल त्या छोट्या-मोठ्या पक्षाला सोबत घेतले जात आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व बेरजेच्या राजकारणासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाच्या तामिळनाडू प्रदेशाध्यक्षांनी अण्णा द्रमुकला दुखावत भाजपसमोर अडचण निर्माण केली आहे. आता पक्ष या परिस्थितीतून कसा मार्ग काढतो, अण्णा द्रमुकला सोबत घेण्यातील हे पेचाचे मुद्दे कसे बाजूला ठेवतो हे पाहावे लागेल. भाजपला युती करायची असेल तर दक्षिणेतील जनतेच्या भावनांचा आदर करीतच पुढे जावे लागणार आहे, हे स्पष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news