‘राम मंदिर हा घोटाळ्याचा विषय नाही’ | पुढारी

'राम मंदिर हा घोटाळ्याचा विषय नाही'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे खरेदी केलेल्या जमीन व्यवहारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी केला होता. याबाबत अयोध्येतील माजी आमदार आणि तत्कालीन सपा सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले तेज नारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मंदिर जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा दावा केला. त्यांनंतर आता हा विषय आस्थेचा असून तो गंभीर आहे. यावर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने लवकर खुलासा द्यावा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे. 

अधिक वाचा : कोरोना : रुग्‍ण संख्‍या घटली, मृत्‍यू भय कायम 

तसेच राऊत यांनी राम मंदिर हा घोटाळ्याचा विषय नाही. देशातील जनतेच्या भावना राम मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने लवकर खुलासा द्यावा. या ट्रस्टवर सर्व सदस्य भाजपनेच नियुक्त केले आहेत, असेही राऊत म्हणाले. याबरोबरच राऊत यांनी या कथित घोटाळ्याबाबत सरकार, सर संघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद यांनी देखील स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी राऊत यांनी केली आहे. 

अधिक वाचा : सुशांतच्या निधनाला वर्ष पूर्ण; अंकिता म्हणते, “अंतराने काही फरक पडत नाही…”

दरम्यान, या आरोपांवर आता राम मंदिर ट्रस्टकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ‘आम्ही अशा आरोपांकडे लक्ष देत नाही, अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी म्हटले आहे. तसेच, लोक गेल्या १०० वर्षांपासून आमच्यावर आरोप लावत आहेत. यापूर्वी महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोपही आमच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे आम्ही अशा आरोपांकडे लक्ष देत नाही. तर आरोपांचा आम्ही अभ्यास करतो आणि मगच त्यावर प्रतिक्रिया देतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

Back to top button