Crime News: पतीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणीला चोप
Pimpri Crime News: पतीचे शेजारी राहणार्या तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून पत्नी आणि तिच्या माहेरच्यांनी तरुणीला चांगलाच चोप दिला. तसेच तरुणीसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीलाही बेल्टने मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील खराबवाडी येथे 6 डिसेंबर रोजी घडली.
याप्रकरणी संबंधित तरुणीच्या मैत्रिणीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश तायडे (30), त्याची आई, एक महिला आणि तिच्या सोबतच्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबत प्रेमप्रकरण असलेली तरुणी आणि तिची फिर्यादी मैत्रीण या आरोपींच्या शेजारी राहतात. फिर्यादी आणि आरोपी कुटुंब भाडेकरू असून कंपनीत मजुरी करतात. आरोपी महिलेला आपल्या पतीचे शेजारी राहणार्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. 6 डिसेंबर रोजी तरुणी आणि तिची फिर्यादी मैत्रीण आपल्या घरी चालल्या होत्या. त्या वेळी आरोपींनी जमाव करून त्यांना घेरले.
ती मुलगी तुझ्याकडे कशाला आली आहे, तिच्यामुळे आमच्या मुलीचा संसार तुटायला लागला आहे, असे म्हणून फिर्यादी आणि तिच्या मैत्रिणीला शिवीगाळ केली. त्या वेळी ती तिचे साहित्य घ्यायला आली आहे, असे फिर्यादीने सांगितले, मात्र आरोपींनी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीला कमरेच्या बेल्टने मारहाण करत जखमी केले. परत ही मुलगी येथे दिसली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आरोपींनी फिर्यादी हिला दिली.

