

पिंपरी: पिंपरी महापालिकेची पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत सुरू असलेली हेल्थ कार्ड यंत्रणा गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. त्याऐवजी रुग्णांना कागदावर टोकन क्रमांक दिले जात आहेत. त्याच आधारे मेडिकल रेकॉर्ड डिपार्टमेंट क्रमांक (एमआरडी नंबर) तयार केले जात आहेत. त्यामुळे रुग्णांची प्राथमिक माहिती डिजिटल पद्धतीने साठविण्यात अडचणी येत आहेत. ही यंत्रणा पुन्हा सुरू होण्यासाठी सध्या मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. (Pimpari chinchwad News Update)
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 2010 या वर्षापासून ई-हेल्थ कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली. 2020 पासून पीव्हीसी स्मार्ट कार्ड स्वरुपातील हेल्थ कार्ड देणे बंद आहे. त्याऐवजी एका चिठ्ठीवर टोकन क्रमांक देऊन पुढील कार्यवाही होत आहे. या हेल्थकार्डवर रुग्णाचे नाव, पत्ता, रक्तगट, एमआरडी नंबर आदी नमूद केलेले होते. या प्रणालीमुळे रुग्णाची प्राथमिक माहिती समजणे सोपे होत होते. सुरुवातीला नवीन कार्ड काढताना 30 रुपये आणि नंतरच्या उपचारासाठी दरवेळी दहा रुपये केसपेपरसाठी घेतले जात होते. मात्र, कोरोना काळामध्ये 2020 पासून हेल्थ कार्ड देणे बंद करण्यात आले. आता चिठ्ठीवर टोकन क्रमांक लिहून पुढील कार्यवाही केली जात आहे.
वायसीएम रुग्णालयामध्ये ई-हेल्थ कार्ड प्रणाली राबविली जात असताना रुग्णालयात एकदा उपचारासाठी भेट देऊन गेलेल्या रुग्णाची माहिती शोधणे सोपे होत होते. हेल्थ कार्डच्या मदतीने रुग्णालयामध्ये रुग्णाविषयीची यापूर्वी नोंदविलेली माहिती मिळत होती. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्याचा उपयोग होत होता. त्यामुळे वेळेची बचत करण्याबरोबरच पेपरलेस कारभारासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरत होती.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) लागू केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य डेटाचे एकत्रिकरण होईल. तसेच त्याचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास ते ज्या रुग्णालयात भेट देतात, तेथे दिसणार आहे. रुग्णालये आणि दवाखाने यासाठी एक केंद्रीय डिजिटल प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यासाठी, रुग्णांना नवीन स्मार्ट आरोग्य कार्ड दिले जाणार आहेत.
वायसीएम रुग्णालयामध्ये गेल्या तीन वर्षांपासून हेल्थ कार्ड यंत्रणा बंद आहे. सध्या रुग्णालयामध्ये तपासण्यासाठी येणार्या रुग्णांना कागदावर टोकन क्रमांक दिले जात आहेत. तसेच, रुग्णांचा एमआरडी क्रमांक तयार केला जातो. त्यानुसार रुग्णावर पुढील उपचार सुरू केले जातात. रुग्णालयामध्ये डिजिटल आभा कार्ड (आयुष्मान भारत आरोग्य खाते) काढण्याचे नियोजन आहे. त्यामुळे निकषानुसार पात्र ठरणार्या रुग्णांना केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजनेचा फायदा मिळू शकेल.
डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पदव्युत्तर संस्था, संत तुकारामनगर.
हेल्थ कार्डवर रुग्णाचा युनिक नंबर असतो. त्याला एमआरडी नंबर म्हणतात. उपचारासाठी रुग्ण आल्यानंतर पहिल्यांदा केसपेपर काढावा लागतो. त्यावेळी रुग्णाला चिठ्ठीवर टोकन क्रमांक दिला जातो. रुग्ण उपचारासाठी रुग्णालयामध्ये आल्यानंतर एमआरडी क्रमांक सांगितला तरी त्यांना टोकन मिळते. ही चिठ्ठी हरविल्यास किंवा चिठ्ठीवरील शाई पुसल्यास रुग्णांना नवीन एमआरडी क्रमांक काढावा लागतो. त्यामुळे एकाच रुग्णाचे अनेक एमआरडी क्रमांक तयार होतात.