

वर्षा कांबळे
पिंपरी : लोकल हे सर्वात स्वस्त व जलद प्रवासाचे साधन असल्यामुळे लोणावळ्यापासून इतर ठिकाणाहून पुण्याला जाणारे जवळपास नव्वद टक्के नागरिक हे लोकलवरती अवलंबून आहेत. दिवसेंदिवस लोकल प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामध्ये महिलांसाठी आरक्षित डब्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीत चेंगराचेंगरी होत आहे. लोकलचे डबे वाढविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींचा प्रवास बिकट झाला आहे.
लोणावळा-पुणे लोकलदरम्यान जवळपास दीड लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. यामध्ये नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिंनीची संख्या जास्त आहे. आधीच लोकलच्या फेर्या कमी असल्यामुळे आलेली लोकल सुटता कामा नये यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असते. मग, कोण चढत की उतरतयं हे न पाहता सर्वजण एकमेकांना ढकलून लोकलमध्ये शिरण्याचा किंवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि याच गोष्टी अपघाताला कारणीभूत ठरत असतात.
पुणे ते लोणावळादरम्यान प्रत्येक स्थानकावर लोकल फक्त 30 सेकंदासाठी थांबत असल्याने अशा वेळी ज्येष्ठ नागरिक किवा गरोदर महिला यांना जीव धोक्यात घालून चढावे लागते. अशा प्रवाशांना लवकर चढता येत नसल्यामुळे इतर प्रवाशांना अडचण निर्माण होते. काही प्रवासी स्टेशनवरच राहतात किंवा मग एक घरातील व्यक्ती असेल तर चढतो एक खाली राहतो. कधी कधी एखादा चढताना खाली पडतो अशा वेळी लोकलमधील प्रवासीच प्रसंगावधान राखून लोकलची साखळी ओढून लोकल थांबवितात, त्यामुळे दुर्घटना टळते. दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे; परंतु सुधारणेमध्ये काही वाढ होताना दिसत नाही. लोकल प्रवाशांची सहनशीलताच आहे की दररोज आपला जीव मुठीत धरून जातो आणि येतो.
रेल्वे प्रवासी संघाकडून पंधरा डब्यांची लोकल करावी अशी मागणी कित्येक वर्षांंपासून केली जात आहे. त्या वेळी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्मची लांबी वाढविल्यानंतर लोकलचे डबे वाढविण्यात येतील असे सांगितले. सध्या प्लॅटफार्मची लांबी वाढवून तीन ते चार वर्षे झाली तरीदेखील अद्याप डबे वाढविलेले नाहीत
महिलांना सुविधांच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाने ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रेल्वेचे चौपदरीकरणाचा प्रश्न गेली 47 वर्षे प्रलंबित आहे. महिलांच्या सुविधांबाबत प्रवासी संघातर्फे आंदोलन करणार आहोत.
गुलामअली भालदार, अध्यक्ष, चिंचवड रेल्वे प्रवासी संघ