

वर्षा कांबळे
पिंपरी : शिक्षण घेणे जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच दृष्टिहीन व्यक्तींच्या जीवनात हा टप्पा गाठणे म्हणजे अंधारातील प्रवास असतो. शैक्षणिक सुविधा असल्या तरी, स्वप्नांची उंचभरारी घेण्यासाठी त्यांना अनेक अडथळे पार करत अथक परिश्रम घ्यावे लागतात. अशाच कठीण परिश्रमातून उत्तुंग भरारी घेत तेजस्विनी भोळे या तरुणीने करिअरमधील अंध:कारावर मात करत तेजस्वी कामगिरी केली आहे. पती धनंजय भोळे यांच्या खांद्याला खांदा देत तिने सॉफ्टवेअर अॅप डेव्हलपमेंटमध्ये कौशल्यप्राप्ती केली आहे. कलेची आवड असलेल्या तेजस्विनी हार्मोनियम वादनातही विशारद आहे.
पिंपळे गुरव येथे वास्तव्यास असलेल्या तेजस्विनीला लहानपणापासून डोळ्यातील नेत्रपटलाची (रॅटिना) समस्या होती. दृष्टिदोष असला तरी दिसत असल्याने तिचा शालेय शिक्षणाचा प्रवास सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच झाला. वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण तिने स्वत: पेपर लिहून दिले. तोपर्यंत ती स्वत: सायकल, दुचाकी चालवित होती.
मात्र, पदवी परीक्षेनंतर दोन महिन्यांनी तिची दृष्टि गेली. आणि तिचे आयुष्य अंध:कारमय झाले. अचानक दृष्टी गेल्यानंतर साहजिकच
आई - वडिलांसाठी ही धक्कादायक बाब होती. पण तेजस्विनी यांनी आपणच खचलो तर आई-वडिलांचे काय होईल, या विचाराने सत्य स्वीकारून त्या खंबीर उभ्या राहिल्या. परावलंबी न होता त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. दृष्टी गेल्यानंतर घराबाहेर पडणे त्यांच्यासाठी जन्मांध व्यक्तीसारखी सोपी गोष्ट नव्हती. पण हळूहळू त्यांनी हे सर्व शिकून घेतले. यामध्ये त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना खूप मदत केली. त्यांना पुणे विद्यापीठापर्यंत जाण्या - येण्यात मदत करीत होत्या. पुणे विद्यापीठात जाऊन त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये अॅप तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी स्वत: पांढरी काठीचे प्रशिक्षण घेऊन एकट्या बाहेर पडू लागल्या.
लहानपणापासून त्यांना हार्मोनियम वादनाची आवड होती. त्यांची आई भजनी मंडळामध्ये हार्मोनियम वादन करत असायच्या. त्यामुळे त्यांच्यात ही आवड निर्माण झाली. त्यांनी कामासोबत हार्मोनियमची आवड जपण्यासाठी निगडीतील संगीत अकादमीमध्ये प्रवेश घेतला. याठिकाणी दहा वर्षांपासून सातत्याने हार्मोनियमच्या वर्गात हजर राहून विशारद पदवी पूर्ण केली. आज पतीसोबत त्यांच्या कंपनीमध्ये दृष्टिहीनांसाठी अॅप बनवितात.