

कामशेत : पुढारी वृत्तसेवा
मावळच्या डोंगरमाथा आणि रानमाळावर रानभाज्यांची उगवण यंदा जोमात झाली आहे. वनवासी कातकरी आणि आदिवासी ठाकर मंडळींनी विक्रीसाठी कामशेत, पवनानगर, लोणावळा आणि वडगाव मावळ बाजारात त्या आणण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या या भाज्यांच्या रोपांना कोणतेही रासायनिक खत किंवा औषधांची मात्रा दिली जात नसल्याने त्या अधिक चवदार आणि आरोग्यदायी असल्याचे जाणकारांनी सांगितले.
कामशेत बाजारात वाघाटी, कुळू, चायत, करटोली, चायता चा मोहोर, आळंबी, भारंगी, डेंगरी, गोमाटी, शेंडवाल, चिचारडी आदी रानभाज्यांची गावकऱ्यांकडून खरेदी मोठ्या आवडीने होत आहे. डोंगरदऱ्यांमधून रानभाज्यांची तोडणी कामशेतच्या मुख्य बाजारपेठेतील रस्ता आणि लोणावळा नगर परिषदेच्या मार्गावर, आदिवासी मंडळींनी हा रानमेवा विक्रीसाठी आणला आहे.
परिसरातील डोंगरदऱ्यांमधून त्याची तोडणी करून तो वाट्याने विकलाई जातो. धनधान्य, भाजीपाला, फळे दूध आदी वजनमापाने न विकता ऑजळीने भरून देण्याची आदिवासी प्रथा आहे. त्यामुळे ते आजही ती पाळतात. या भाज्यांचे वाटे करून ते सरासरी २० रुपये प्रतिवाटा असे विकले जातात.
विशेष म्हणजे दरासाठी घासाघीस करणाऱ्या शहरी ग्राहकांना हे आदिवासी लोक प्रतिसाद देत नाहीत. ते आपापसात त्यांच्या भिल्ल भाषेत अशा ग्राहकांविषयी सांगत असतात. भाजीचं मोल करू नये, तो रानदेवीचा अपमान करतोय, असा त्यांचा सूर असतो, असे अनिल वाघमारे आणि सुदाम पवार यांनी सांगितले.
रानभाज्यांचे या जमातीत मोठे महत्त्व आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यात ज्या भाज्या रानमाळावर उगवतात, त्या औषधी आणि आरोग्यास पोषक असल्याची त्यांची हजारो वर्षांची माहिती आहे. त्यामुळे चालू हंगामात कातकरी, ठाकर वाड्यावस्त्यांवरील घरात या रानभाज्यांचा बेत दररोज पाहायला मिळतो.
मावळात पूर्वीपासून रानभाज्या या उगवत असतात पूर्वीची लोक हे या रान भाज्यांवर अवलंबून होता पण अजूनही आदिवासी लोकांमध्ये या रानभाज्यांचा वापर जेवणामध्ये केला जातो, पण शहरी लोकांना या रान भाज्यांचे महत्त्वच माहीत नसल्याची खंत ठाकर जमातीचे समाज कार्यकर्ते गंगाराम खंडागळे यांनी व्यक्त केली.
सेंद्रिय भाज्यांकडे जाणत्या लोकांचा कल असल्याने ते ऋतूमानानुसार त्या मिळेल त्या किमतीला खरेदी करतात. रानभाज्या तोडण्यासाठी भल्या पहाटे ही मंडळी घरातून डोंगरकपारीकडे निघतात. त्यानंतर चारपाच तासांच्या मेहनतीने हाती लागेल आणि विक्री होईल तितकीच तोडणी करुन बाजारात नेतात. महिलांचा याकामी मोठा वाटा आहे.
पार्वताबाई पवार, विक्रेत्या
विक्रेत्या रानभाज्या ऋतूमानानुसार खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दिवाळीपर्यंत त्या माळरानी उपलब्ध असतात. चाईतचा फुटवा, कंद कॉल्शियम, प्रथिने आणि लोह क्षारांनी भरपूर आहे. भारंगी मूत्रपिंडातील व्याधींना दूर करण्यास उपयुक्त आहे. आदिवासी महिला घरगुती वाटण, तिखट मीठ टाकून कमीतकमी तेल वापरुन या भाज्या बनवतात. त्याची चव स्वादिष्ट आणि औषधी गुणधमनि भरपूर असल्याने त्या आरोग्यदायी असल्याचे संदर्भ आयुर्वेदात आहेत, असे आयुर्वेदाचार्य रवी आचार्य यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.