दिव्यांगबांधवांना केवळ मदतीचा हात देऊन भागणार नाही. प्रशिक्षण देऊन योग्य संधी देणे महत्त्वाचे आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य सरकारकडून निधीची कमतरता भासू दिले जाणार नाही. जिल्हानिहाय ठराविक रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करण्याची सक्ती केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजित दिव्यांगांच्या पर्पल महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय सचिव राजेश आगरवाल, कलाकार दर्शिल सफारी, आमदार अण्णा बनसोडे, अमित गोरखे, उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, दिव्यांग भवन फउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, परेश गांधी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की राज्यातील 13 कोटी लोकसंख्येपैकी 65 लाख दिव्यांगबांधव आहेत. सर्व 36 जिल्ह्यांत दिव्यांगांची आकडेवारी काढून त्यानुसार योजनांचा लाभ त्यांना दिला जाईल. त्यांचा निधी इतर कामांसाठी वापरला जाणार नाही. सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाकडे मनुष्यबळ नसल्यास आवश्यक त्या निधीची तरतूद तातडीने केली जाईल. ससून तसेच, उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. विविध सेवा व सुविधांचा लाभ उपलब्ध करून देऊन दिव्यांगांच्या पंख्यांना बळ देण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी अधिकार्यांना केले.
भारतातील पहिला दृष्टिहीन चार्टर्ड अकाउंटंट भूषण तोष्णीवाल पिंपरी-चिंचवडचा आहे. सामाजिक चळवळीतील मानव कांबळे यांच्यासारखे अनेक दिव्यांग व्यक्तींची नावे घेता येतील. दुसरीकडे, दिव्यांग फेरीवाल्यांवर कारवाई करताना सबुरीने घेण्याचा सल्ला त्यांनी अधिकार्यांना दिला. कारवाईच्या वेळेस दिव्यांग विक्रेत्यांना विशेष बाब म्हणून सूट द्या. मात्र, उठसूठ कोठेही टपर्या टाकून शहर विद्रुप करू नका, असा सल्ला त्यांनी दिव्यांगांना दिला. भूगाव येथे दिव्यांगांसाठी घरांची योजना केली जात आहे. त्याला सरकारतर्फे सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, की महापालिकेकडून शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यांना दिव्यांग फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपचार दिले जात आहेत. तसेच, कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. केंद्रीय सचिव राजेश आगारवाल म्हणाले, की दिव्यांगांच्या व्यंगावर लक्ष न देता त्यांच्यावर व्यक्ती म्हणून फोकस करा. त्यांना प्रोत्साहन द्या. सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले, की घरातून बाहेर पडू शकणार्या व्यक्तींच्या घरी जाऊन महापालिकेने सर्वेक्षण करून त्यांना लाभ द्यावा. शहरातील पाच आमदारांनी दिव्यांगांच्या कल्याणासाठी अधिकाधिक निधी पालिकेस उपलब्ध करून द्यावा. सूत्रसंचालन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आभार मानले
येत्या मार्च महिन्यात होणार्या राज्याच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी स्वतंत्रपणे पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद करणार येईल. दिव्यांग कल्याण विभागास मनुष्यबळ उपलब्ध करू देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्यानंतर त्याचे स्वीय सहाय्यक चौबे यांना ते मुद्दे लिहून घेऊन मंत्रालयात आठवून करून देण्यास त्यांनी जाहीरपणे सूचित केले. केवळ घोषणा नको, कृती व्हायला हवी, असे त्यांनी चौबे यांना ठणकावून सांगितले. त्यावर टाळ्या वाजवित उपस्थितांनी पवार यांना दाद दिली.