

पिंपरी : वाकड येथील 45 मीटर रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणार्या काळाखडक झोपडपट्टीतील 96 झोपड्या महापालिकेने पोलिस बंदोबस्तात कारवाई करीत बुधवारी (दि. 16) पाडल्या. कारवाईत अनधिकृत झोपड्या, टपर्या, दुकाने, वीट बांधकामे पाडण्यात आली.
काळाखडक झोपडपट्टीतील 250 मीटर लांबीच्या व 16 मीटर रुंदीच्या क्षेत्रावरील 96 झोपड्या पाडण्यात आल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, किशोर ननावरे, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे, सतीष कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र माळी आदी उपस्थित होते. कारवाई केल्यानंतर तातडीने महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रुंदीकरणाला अडथळा ठरणारे विद्युत खांब, जलवाहिन्या तसेच, इतर सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन महापालिकेने केले असून, हे काम देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. भूमकर चौक, हिंजवडकडे जाणार्या तसेच, हिंजवडीच्या दिशेने थेरगाव, पिंपरी या भागात येणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरामध्ये विकासाच्या दृष्टिने राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पाला अडथळा ठरणार्या अनधिकृत बांधकामाचे तात्काळ कारवाईचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
चिखली, तळवडे व रुपीनगर येथील 12 अनधिकृत बांधकामे व पत्राशेड पाडण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.