

Pimpri News: पिंपरी-चिंचवड शहरात लोकवस्ती भागात विनापरवाना फटका स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच, काही भागात गोदामे आहेत. आगीसारख्या दुर्घटना घडू नये, म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धोका निर्माण झाला आहे.
दसरा आणि दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये तसेच, लग्न, कार्यक्रम व धार्मिक उत्सवाच्या वेळी आतषबाजी केली जाते. शहरातील फटका दुकानदार व विक्रेते फटाक्यांची विक्री करतात. दुकाने व स्टॉल हे उघड्या जागेत मैदानात उभारण्याचा नियम आहे.
एखादी दुर्घटना घडल्यास कमीत कमी नुकसान व्हावे, या त्यामागील हेतून आहे. मात्र, हे फटाके स्टॉल व दुकाने भर लोकवस्तीमध्ये आहेत. तर, काही इमारती तसेच, बाजारपेठेत आहेत. त्यामुळे आगीसारख्या दुर्घटनेतून मोठी वित्त व जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही.
फटाक्यांची विक्री करताना विस्फोटक अधिनियम व नियमांतर्गत असलेल्या सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. वास्तविक फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेमध्ये किंवा पटांगणामध्ये विक्रीसाठी असणे आवश्यक आहे.
त्यामुळे एखादी घटना घडल्यास कमीत कमी नुकसान होईल. तसेच फटाक्यांचा साठा आणि विक्री यांचे नियमन व सनियंत्रण करणे शक्य होईल. मात्र, शहरातील विनापरवाना आणि अवैधपणे फटाका विक्री व साठवणूक करणार्याविरुद्ध कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.
फटाका विक्रेत्यांसाठी असे आहेत नियम :
प्रत्येक फटाके विक्री दुकानातील अंतर हे कमीत कमी 3 मीटरचे असावे. दुकाने मोकळ्या जागी व्यवस्थित कोणत्याही प्रतिबंधित इमारतीपासून 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर नसावीत. प्रत्येक फटाके विक्री दुकानातील स्टॉक मर्यादा जास्तीत जास्त 100 किलो राहील. ज्या जागेत फटाका स्टॉक उभारायचा आहे.
त्या ठिकाणचा नकाशा त्यावर संबंधित पोलीस निरीक्षकांनी जागा सुरक्षिततेबाबत स्वाक्षरी करून ना हरकत दाखला सादर करावा. संबंधित पिंपरी-चिंचवड महापालिकेने फटाका स्टॉल बाबत शिफारस करावी. नियोजित जागेबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी. पोलिस आयुक्तांनी कायदा व सुव्यवस्था, अर्जदाराची वर्तणूक आणि दुकानाच्या बाबतीत अर्जदाराने सवे नियमांचे काटेकोरपणे पालन केले किंवा कसे, याबाबत सर्वंकष अहवाल द्यावा.
महाराष्ट्र नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 281 नुसार संबधित महापालिकेचा परवाना आवश्यक आहे. संबंधित तहसीलदार यांचे फटाक्याचे दुकानासाठी अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेले रहिवाशीबाबत पुराव्याची खातरजमा करून अर्जदार नमूद पत्त्यावर राहतात किंवा कसे? याबाबत आणि अर्जदार यांचेकडून कसल्याही प्रकारची शासकीय थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र तसेच दुकानाच्या जागेच्या नकाशाची प्रमाणित प्रत असावी.
व्यवसाय कर अधिकारी, व्यवसाय कर कार्यालय, पिंपरी- चिंचवड महापालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र हवे. परवानाधारकास नमूद केलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक राहील. विक्रेत्याने फटाक्यांची विक्री करताना त्याची आवाजाची तीव्रता 125 डेसिबलपेक्षा जास्त नसावी. तसेच बेरियम साल्टयुक्त व त्या प्रकारचे फटाके साठवणूक किंवा विक्री करण्यात येऊ नये.
लोकवस्तीतील फटाका स्टॉलला परवानगी देऊ नये
सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री व साठवणूक करण्यास महापालिका व पोलिसांनी परवानगी देऊ नये. नियमांकडे दुर्लक्ष करणार्या विक्रेत्यांचे दुकान परवानारद्द करावा. विस्फोटक अधिनियम 2008 व नगरविकास विभाग शासन निर्णय 5 नोव्हेंबर 2016 ची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी. लोकवस्तीतील विनापरवाना फटाका स्टॉलमुळे दुर्घटना घडू नये यासाठी वेळेची खबरदारी घ्यावी, असे कॉप्स संस्थेचे अध्यक्ष आदम बेग यांनी सांगितले.
परवाने तपासून फटाके स्टॉलला परवानगी
पोलिस, महावितरण, महापालिका आदींचे आवश्यक परवाने तपासून घेतल्यानंतर शहरात फटाके स्टॉलला परवानगी दिली जात आहे. त्यात अग्निप्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. जागेची पाहणी केल्यानंतर तात्पुरती परवानगी दिली जाते, असे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.