तब्बल 15 वर्षांनंतर, स्पाईन रस्त्यावरील तळवडे परिसरातील त्रिवेणीनगर चौकाजवळची 550 मीटर जागा ताब्यात आल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून तेथील रस्ता तयार करण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे. रखडलेले काम सुरू झाले आहे; मात्र अद्यापि तेथील 250 मीटरचा रस्ता ताब्यात न आल्याने पूर्ण क्षमतेने वाहतूक रहदारी सुरू होणार नसल्याचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाईन रस्ता विकसित केलेल्या कामास 15 वर्षे झाली आहेत. मात्र, त्रिवेणीनगर चौकातील जागा ताब्यात न आल्याने वाहतुकीच्या प्रचंड कोंडीचा सामना वाहनचालकांना दररोज करावा लागत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडले आहेत. या कोंडीमुळे वाहनचालकांसह तेथे वावर करणारे नागरिकही वैतागले आहेत.
स्पाईन रस्ता 75 मीटर रूंद आहे. या रस्ता बाधित कुटुंबांना मोशी, प्राधिकरणाची जागा विकत घेऊन प्रत्येकी एक गुंठा जागा देण्याचा विशेष ठराव महापालिकेने मंजूर केला आहे. त्यासाठी महापालिकेने सेक्टर क्रमांक 11 येथे 14 हजार 754 चौरस मीटर जागा, 16 कोटी 52 लाख 11 हजार 200 रूपये देऊन खरेदी केली. सन 2012 पासून अद्याप 132 बाधितांना त्या जागेचे वाटप झाले नसल्याने, त्रिवेणीनगर चौकाजवळील जागा महापालिकेच्या ताब्यात अद्यापि आलेली नाही.
जागा ताब्यात घेण्यासाठी नगर रचना विभागाकडून धीम्यागतीने कामकाज सुरू आहे. आतापर्यंत दस्त तसेच, नोंदणी न झाल्याने ही जागा ताब्यात येण्याची प्रक्रिया रखडली आहे. काही बाधितांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दस्त नोंद झालेले नाहीत. रस्ता तब्बल 15 वर्षांपासून रखडला असून, अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे त्या चौकात वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. कोंडीमुळे वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
अखेर, एकूण बाधित क्षेत्रापैकी 550 मीटर जागा तीन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या ताब्यात आली. त्या ठिकाणी स्थापत्य विभागाकडून रस्ता बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. मंजूर विकास आराखडयानुसार हा रस्ता 75 मीटर रुंदीचा आहे. संपूर्ण जागा ताब्यात न आल्याने सध्या 37 मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येत आहे. त्यामध्ये 12 मीटर रुंदीच्या दोन लेन, मध्यभागी 9 मीटर रुंदीचा एचसीएमटीआर (रिंग रोड) आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस 2 मीटर रुंदीचे पेव्ह शोल्डर असे या रस्त्याचे नियोजन आहे. सध्या दुहेरी मार्गाचे 270 मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
निगडी येथील भक्ती शक्ती समुह शिल्प चौकातून पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई जुन्या महामार्गाला जोडणार्या त्रिवेनीनगरमधील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहनांची संख्या कमी होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. हा रस्ता तळवडे संगणकीय औद्योगिक केंद्र मार्गे चाकण एमआयडीसीला जोडण्यात महत्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे. तसेच, या भागातील ड्रेनेज सुविधा, पावसाळी पाण्याचा निचरा याबाबत निर्माण होणार्या समस्या मार्गी लागणार आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले.
महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या कासव गती कारभारामुळे त्रिवेणीनगर चौकातील अद्याप 250 मीटरची जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे 550 मीटरचे काम होऊनही पूर्ण क्षमतेने रस्त्यावरून वाहतूक रहदारी सुरू करता येणार नाही. जागा ताब्यात घेण्यास विलंब होत असल्याने स्थापत्य आणि नगर रचना विभागाच्या अधिकार्यांमध्ये एका बैठकीत खडाजंगी झाल्याचे सुत्रांनी सांगितले. तातडीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी नगर रचना विभागास दिले आहेत.