

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरीपासून थेट स्वारगेट मेट्रो धावत असून, लाखो नागरिक त्याचा लाभ घेत आहेत; मात्र या मार्गावरील खडकी तसेच, रेंजहिल्स मेट्रो स्टेशन अद्याप नागरिकांसाठी खुले झालेले नाही. प्रवाशांना नाईलाजास्तव शिवाजीनगरपासून थेट बोपोडी असा प्रवास करावा लागत आहे. नोव्हेंबर 2024 ची मुदत संपूनही स्टेशनचे काम कासव गतीने सुरू आहे. कामाच्या ठिकाणी मजुरांची संख्या कमी असल्यामुळे स्टेशनचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याची बाब समोर आली आहे.
पिंपरी ते जिल्हा न्यायालय अशी मेट्रो 1 ऑगस्ट 2023 पासून धावत आहे. दोन वर्षे होत आली तरी, अद्याप खडकी आणि रेंजहिल्स स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. तेथे मेट्रो त्या दोन स्टेशनवर थांबत नाही. खडकी, खडकी बाजार, औंध, रेंजहिल्स, रेंजहिल्स कॉर्नर, खडकी पोलिस वसाहत, मुळा रोड, राजा बंगला आदी भागांतील हजारो नागरिकांना खडकी व रेंजहिल्सऐवजी बोपोडी स्टेशनवरून ये-जा करावी लागत आहे. खडकी भागांत मोठी बाजारपेठ आहे.
तसेच, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी तेथे शिकत आहेत. अॅम्युनिशन फॅक्टरी, एच. ई. फॅक्टरी, 512 आर्मी बेस वर्कशॉप, सीक्यूएई, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पॅरॉप्लाजिक रिहॅबिलेटेशन सेंटर तसेच, लष्करांच्या वेगवेगळ्या अनेक आस्थापना तसेच, रेल्वे पोलिस मुख्यालय, रेल्वे स्टेशन, पुणे विद्यापीठाचे मागील प्रवेशद्वार आणि बराच परिसर या भागात आहे. त्या भागांतील हजारो नागरिक, कामगार, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी खडकी तसेच, रेंजहिल्स स्टेशन जवळचे आहे. तेथून प्रवास करणे सुलभ आहे.
प्रवाशांना थेट शिवाजीनगर किंवा बोपोडी येथून ये-जा करावी लागत आहे. त्यात अधिक अंतर कापावे लागत आहे. तेथून पुन्हा बस किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, अधिक वेळ जात आहे. मेट्रो सुरू होऊन दोन वर्ष झाले तरी, अद्याप हे स्टेशन सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
अपुर्या संख्येने मजूर नेमल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काम संथ गतीने सुरू आहे. परिणामी, काम संपण्यास विलंब होत आहे. हे स्टेशन नोव्हेंबर 2024 ला खुले करण्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली होती. मात्र, त्याला पाच महिने होत आले तरी, अद्याप काम सुरूच आहे. सुशोभीकरण, यांत्रिक जोडणी, रंगरंगोटी, प्रकाश व्यवस्था, जिना आणि इतर कामे अद्याप अपूर्ण आहेत. मुदत संपूनही काम पूर्ण होत नसल्याने संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
महिन्याभरात खडकी स्टेशन खुले न केल्यास आंदोलन
खडकी बाजारात खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करतात. तसेच, फॅक्टरी, डेपो आणि इतर लष्करी व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनामध्ये हजारो कर्मचारी काम करतात. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना ये-जा करण्यासाठी खडकी मेट्रो स्टेशन उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. लवकरात लवकर हे स्टेशन खुले न केल्यास वंदे मातरम संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असे राजेश शर्मा यांनी सांगितले.