उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक घेऊन तोडगा काढणार: मुख्यमंत्री

शहरातील लघुउद्योग संघटनेने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Pimpri Politics
उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक घेऊन तोडगा काढणार: मुख्यमंत्रीFile Photo
Published on
Updated on

पिंपरी: शहरातील उद्योगांना जाणवणार्‍या विविध समस्यांचे गार्‍हाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने नुकतेच मांडण्यात आले. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आमदार महेश लांडगे यांच्या समवेत लघुउद्योग संघटनेच्या शिष्टमंडळाने पुणे येथे मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. त्या प्रसंगी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, संचालक संजय सातव, अतुल इनामदार, स्विकृत संचालक रामदास जैद आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका, पी.एम.आर.डी.ए., एम.आय.डी.सी., पोलिस विभाग, महावितरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी आस्थापनांचे संबंधित अधिकारी तसेच पिंपरी- चिंचवड लघुउद्योग संघटना यांची एक संयुक्त बैठक घेतली जाईल. त्या माध्यमातून उद्योजकांच्या समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी लवकरात लवकर कामे चालू केली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्ट्यात उद्योजकांना जाणवणार्‍या विविध समस्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. त्यामध्ये विविध मागण्या मांडण्यात आल्या. उद्योजकांना एलबीटीची बाकी नसलेली रक्कम व्याज व शास्ती दंडासह भरण्याच्या नोटीसा पाठविलेल्या आहेत. त्यामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेला उद्योजक हा आता पूर्णपणे नेस्तानाबूत होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

निवासी भागातील लघुउद्योगांचे औद्योगिक परिसरात पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने एम.आय.डी.सी.कडून 1992 मध्ये टी-201 हा भूखंड घेतला होता. त्यावर प्रकल्पाचे काम देखील सुरु केले. 25 वर्षानंतर हा प्रकल्प बर्‍यापैकी पूर्ण झाला आहे. या प्रकल्पातील गाळ्यांचा महापालिकेने ठरविलेला दर उद्योजकांना परवडणारा नाही.

हा दर कमी करुन गाळे वाटपाची प्रक्रिया लवकर सुरु करावी. महानगरपालिकेने 31 डिसेंबर 2020 पर्यंतचे आरक्षित भूखंड, पूररेषा या जागेवरची बांधकामे वगळून उर्वरित सर्व अवैध बांधकामे ही सरसकट नियमित करावीत. एम.आय.डी.सी.,पेठ क्रमांक 7 आणि 10, कुदळवाडी, चिखली, तळवडे येथील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झालेले आहे. अनेक ठिकाणी फक्त खडी टाकली आहे. त्यांचे तातडीने डांबरीकरण करावे.

तसेच शहरातील औद्योगिक पट्ट्यातून चाकण औद्योगिक परिसरात जातांना रस्ते अरुंद व खराब असल्यामुळे सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. पेठ क्रमांक 7 आणि 10 या औद्योगिक परिसरात महानगर पालिकेकडून केला जाणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. त्यामुळे कंपन्याना बाहेरून पाणी विकत घ्यावे लागते. या परिसरात दिवसातून किमान दोन वेळा सकाळी व सायंकाळी पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा.

तसेच उद्योजकांना व्यापारी दराने आकारले जाणारे पाण्याचे बिल औद्योगिक दराने आकारावे. तसेच पाणीपट्टीचा दर कमी करावा. ज्या औद्योगिक परिसरात कचरा उचलण्यासाठी वाहने जात नाहीत. त्या ठिकाणी महापालिकेने कचरा उचलण्यासाठी वाहने उपलब्ध करुन द्यावी. औद्योगिक घातक कचरा गोळा केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची सोय आणि जबाबदारी देखील महानगरपालिकेने उचलावी, अशा विविध समस्या उद्योजकांनी मांडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news