MIDC Garbage Crisis: एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न बनला गंभीर

घातक कचरा रांजणगावला पोहचविण्याची नामुष्की
Pimpri News
एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न बनला गंभीर Pudhari
Published on
Updated on

Pimpri News: पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरात काही ठिकाणी ओला आणि सुका कचरा नियमित उचलला जात नसल्याने ही समस्या गंभीर होत चालली आहे. कचरा रस्त्यावर टाकला तर कारवाई आणि कंपनीत ठेवला तर रोगराई अशा परिस्थितीला सध्या उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे.

घातक कचर्‍यासाठी शहरात स्वतंत्र केंद्र नसल्याने रांजणगावला हा कचरा पोहचविण्याची नामुष्की उद्योजकांवर ओढवली आहे. शहरामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी एमआयडीसी परिसरात छोट्या-मोठ्या उद्योगांचे जाळे पसरले आहे. तळवडे आयटी पार्क परिसरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी बस्तान बसविले आहे.

शहराच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये छोटे-मोठे 10 हजार उद्योग आहेत. या परिसरात सध्या विविध ठिकाणी कचर्‍याचे ढीग पाहण्यास मिळत आहेत. कचरा साचून कामगारांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. चिखली-कुदळवाडी परिसरात भंगार मालाची गोदामे आहेत. कचर्‍यातून भंगार साहित्य गोळा करून व्यावसायिक अर्थार्जन करतात, मात्र त्यासाठी कचरा साचवून ठेवण्याकडे कल वाढत आहे. (Pimpri Marathi News)

नियमित कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष

एमआयडीसी परिसरामध्ये नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी काही उद्योजकांनी केल्या आहेत. आरोग्य, साफसफाई कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने प्रामुख्याने ही अडचण निर्माण होत आहे. चिखली, तळवडे या परिसरात ही समस्या जास्त गंभीर असल्याची माहिती देण्यात आली.

रांजणगावला जातो घातक कचरा

शहरामध्ये चिंचवड, भोसरी, पिंपरी एमआयडीसी आणि चिखली-कुदळवाडी, तळवडे या परिसरात सध्या कंपन्यांतील घातक कचर्‍याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. उद्योगधंद्यातून तयार होणारी मळी किंवा मिश्रण यात विषारी धातू, तेल, घातक रसायने असतात.

उद्योगांतील घातक कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबतची कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे सध्या अस्तित्वात नाही. रांजणगाव येथील खासगी कंपनीकडे सध्या उद्योजकांना हा कचरा पाठवावा लागत आहे. मात्र, त्यांचे दर अवाजवी आहेत. तसेच, त्याची क्षमतादेखील कमी असल्याचे उद्योजक सांगत आहेत.

एकूण कचर्‍याच्या तुलनेत 15 टक्के प्रमाण

शहरातील एमआयडीसी परिसरात एकूण कचऱ्याच्या तुलनेत 10 ते 15 टक्के इतका घातक कचरा निर्माण होतो. या कचर्‍याचे विघटन न करता तो उघड्यावर टाकण्यात येतो. त्यामुळे हा कचरा रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पडलेला आढळतो. विशेषतः कुदळवाडी परिसरात या कचर्‍याचे प्रमाण जास्त आहे.

घातक कचरा म्हणजे काय ?

घातक कचरा म्हणजे असा अवशेष आहे जो त्याच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या कोणत्याही सजीवाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. या कचर्‍यामध्ये प्रामुख्याने काच, बॅटरी, सेल्स, रंग, रसायने, तुटलेले बल्ब, ट्युबलाइट्स, कीटकनाशके, जंतुनाशके आदींचा समावेश होतो.

शहरातील एमआयडीसी परिसरात काही ठिकाणी नियमितपणे ओला आणि सुका कचरा उचलला जात नसल्याचे सध्या पाहण्यास मिळत आहे. मनुष्यबळाची कमतरता आहे. कचरा उचलण्यासाठी येणार्‍या वाहनांचा आवाजही येत नाही. त्यामुळे कचरा वाहतूक करणारी वाहने कधी आली, हेच उद्योजकांना समजत नाही. घातक कचरा रांजणगाव येथे प्रक्रिया करण्यासाठी पाठवावा लागतो. महापालिकेने त्यासाठी स्वतंत्र केंद्र उभारावे.

- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

शहरातील औद्योगिक परिसरात निर्माण होणारा कचरा महापालिका प्रशासनाने उचलून कचर्‍यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पात टाकायला हवा. त्याचप्रमाणे, सर्व परिसरामध्ये नियमितपणे कचरा उचलला जात नाही. घातक कचर्यासाठी एमआयडीसीने भूखंड द्यावा आणि महापालिका प्रशासनाने केंद्र उभारावे.

- प्रमोद राणे, उद्योजक.

उद्योगांचा घातक कचरा उचलण्याची व्यवस्था सध्या रांजणगाव येथे आहे. पिंपरी-चिंचवड शहरात त्याचे केंद्र उभारायचे असल्यास एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातुन त्याची उभारणी व्हायला हवी. महापालिकेकडून त्याबाबत सध्या नियोजन नाही.

- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता-2 (पर्यावरण), महापालिका

महापालिका प्रशासनाकडून सध्या एमआयडीसी परिसरात नियमित कचरा उचलला जात आहे. मनुष्यबळदेखील वाढविण्यात आले आहे. कचरा वाहतूक करणार्‍या वाहनांवर वाजणारे स्लोगन एमआयडीसी परिसरातही वाजविण्याबाबत सांगितले जाईल.

- गणेश देशपांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी, महापालिका..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news