स्मार्ट सिटीचे थकविलेले वीजबिल पालिका भरणार

ठेकेदारावर कोणतीही कारवाई नाही
PCMC
स्मार्ट सिटीचे थकविलेले वीजबिल पालिका भरणारFile Photo
Published on
Updated on

पिंपरी: शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने निगडी येथे सिटी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर सुरू केले आहे. शहरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे या सेंटरला जोडले आहेत. सेंटर व कॅमेर्‍यासाठी स्वतंत्रपणे वीजजोड घेण्यात आले आहेत. वीजबिल न भरल्याने कॅमेर्‍यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने तोडण्यास सुरुवात केली आहे.

थकबाकी भरल्याशिवाय महापालिकेस नवीन वीज मीटर दिला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा महावितरणने घेतला आहे. ते थकीत बिल महापालिका स्वत: भरणार आहे. असे असतानाही मुजोर दोषी ठेकेदारांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच, कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने शहरभरात 5 हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे उभे केले आहेत. कॅमेर्‍यासाठी वीजजोड घेण्यात आले आहेत. त्याला स्वतंत्रपणे महावितरणचे मीटर लावण्यात आले आहेत. ती वीजजोडणी स्मार्ट सिटी कंपनीचे ठेकेदार क्रिस्टल तसेच, स्मार्ट सिटीने घेतले होते. या वीजपुरवठ्याचे बिल संबंधित ठेकेदार क्रिस्टलने भरणे बंधनकारक आहे.

मात्र, क्रिस्टल किंवा स्मार्ट सिटी कंपनीने बिल न भरल्याने महावितरणने सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची वीजजोड तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, थकबाकी भरल्याशिवाय महापालिकेस नवीन वीज मीटर देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे महापालिकेने स्वत: थकीत वीजबिल भरावे, असा प्रस्ताव अणुविद्युत व दुरसंचार विभागाने ठेवला होता.

त्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. थकीत बिल भरून ते ठेकेदार क्रिस्टल किंवा स्मार्ट सिटी कंपनीच्या बिलातून वसूल करण्यात येणार आहे. वीजबिल भरणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदारांनी ते भरले नाही. महावितरणने वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे महापालिकेची नाहक बदनामी झाली आहे. असे असताना मुजोर ठेकेदारांवर कोणताही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरची वीज तोडली

निगडी येथील टिळक चौकातील अस्तिव मॉलच्या इमारतीत स्मार्ट सिटीअंतर्गत सिटी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर सुरू आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही हा स्मार्ट सिटीतील सर्वाधिक रेंगाळलेला प्रकल्प आहे. अद्याप हे सेंटर 100 टक्के क्षमतेने सुरू झालेले नाही. स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभारातून या सेंटरचे सप्टेंबर 2024 महिन्याचे विजेचे बिल मुदतीमध्ये न भरल्याने महावितरणने वीजपुरवठा 25 नोव्हेंबर 2024 ला खंडित केला.

सेंटरचे काम करणारे ठेकेदार टेक महिंद्रा कंपनीने बिल भरले नाही. अखेर, तातडीची बाब म्हणून अ क्षेत्रीय कार्यालयाने 92 लाख 45 हजार 620 रुपयांची वीजबिलाची थकबाकी भरली. त्यामुळे सेंटरचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी 24 डिसेंबर 2024 च्या स्थायी समिती सभेत कार्योत्तर मान्यता दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news