Pimpari Chinchwad | खाऊ गल्लीचा मुहूर्त लांबणीवर

आकुर्डीतील गाळे भाड्याने देण्यास महापालिकेची चालढकल ?
खाऊ गल्लीचा मुहूर्त लांबणीवर
खाऊ गल्लीचा मुहूर्त लांबणीवरFile Photo
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंदूर शहराच्या धर्तीवर आकुर्डी रेल्वे स्टेशनसमोरील मोकळ्या जागेत प्रशस्त अशी खाऊ गल्ली (फुड मॉल) सुरू केली आहे. ही खाऊ गल्ली बांधून तयार झाली आहे.

मात्र तेथील टपऱ्या भाडेतत्त्वावर देण्यास महापालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे खाऊ गल्लीस मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इंदूर शहराच्या धर्तीवर तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी खाऊ गल्लीची संकल्पना आणली.

आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत महापालिकेने पहिली खाऊ गल्ली बांधली आहे. त्यासाठी ३ कोटी ७० लाख २३ हजार ६०३ रुपये खर्च करण्यात आला आहे. तेथे एकूण ४९ गाळे आहेत. त्याचा आकार १९० चौरस फूट आहे.

खाऊगल्लीची निविदा डिसेंबर २०२२ मध्ये काढण्यात आली. त्याचे काम दीड वर्षानंतर पूर्ण झाले आहे. बांधकाम तसेच विद्युत विभागाने काम पूर्ण झाल्याचे भूमि आणि जिंदगी विभागास मार्च २०२४ मध्ये कळविले आहे. हे गाळे भाडे तत्त्वावर द्यावयाचे आहेत.

त्याचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवण्यात आला आहे. त्यांची मान्यता मिळालानंतर ते गाळे भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत; मात्र त्या कामकाजासाठी चालढकल केली जात असल्याने तयार झालेले गाळे धूळखात पडून आहेत.

गाळे भाड्याने देणार?

महापालिकेने बांधलेल्या गाळ्यांची सोडत कधी काढली जाणार आहे. सोडत लॉटरी पद्धतीने होणार की गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार, अशी विचारणा नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवकांकडून केली जात आहे. त्याबाबत भूमि आणि जिंदगी विभागाकडे विचारण केली जात आहे.

लवकरच गाळ्यांचे वाटप केले जाणार

आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेतील खाऊ गल्लीचे काम पूर्ण झाले आहे. तेथील ४९ गाळे लवकरच वितरीत केले जाणार आहेत, असे महापालिकेच्या भूमि आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news