महेंद्र कांबळे पुढारी प्रतिनिधी पुणे :
दिल्ली येथून संदीप यादव याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने कुरीअरद्वारे लंडनला तब्बल २१८ किलो ड्रग्ज पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ज्या ठिकाणी हे ड्रग्ज पाठविण्यात आले त्या लंडनस्थित ठिकाणाचा पत्ता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे.
त्यामुळे पुणे येथील कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणात तब्बल ३ हजार ६७४ कोटींचे ड्रग्ज पकडल्यानंतर आता या गुन्ह्याची व्याप्ती विदेशात पोहचल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने तपासात एन्ट्री घेतली आहे.
त्यामुळे सीबीआय लंडनच्या त्या पत्त्यावर जाऊन तपास करणार असल्याचेच यामुळे स्पष्ट झाले आहे. पुणे पोलिस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) पाठोपाठ आता सीबीआयकडूनही या देशभर आणि देशाबाहेर विस्तारलेल्या ड्रग्जच्या जाळ्याचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात नुकताच पकडलेल्या निशांत मोदीच्या चौकशीत देवेंद्र यादव आणि संदीप यादव यांच्या सोबतचे लाखो रुपयांचे व्यवहार आढळून आले होते. त्यात पैसे हस्तांतरीत केले असल्याचे आढळून आले होते.
या दरम्यान निशांत मोदीला नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, तो एनसीबीसमोर हजर झाला नाही. त्याला १७ सप्टेंबर रोजी सीएएसएमआय विमानतळावरून पळून जाताना ताब्यात घेण्यात आले होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने संदीप यादव आणि देवेंद्र यादव यांना दिलेल्या बेकायदेशीर निधीची कबुली दिली होती.
पुणे पोलिसांकडे असलेला तपास जून महिन्यात एनसीबीने काढून घेतल्यानंतर नुकताच एनसीबीने याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल केला आहे. तसेच एनसीबीने याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. त्यांना न्यायालयाच्या आदेशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
तर मॅफेड्रॉनच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गाडीतून तब्बल २३६ किलो वजनाचे अंमलीपदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. ही गाडी पोलिसांनी नुकतीच मूळ मालकाला परत केली आहे. या खटल्याचा निकाल होईपर्यंत गाडीची विक्री करता येणार नाही व तपास कामात गरज लागेल तेव्हा पोलिस ठाण्यात गाडी हजर करावी, अशा अटी शर्तीवर गाडी मूळ मालकाला परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसारच पोलिसांनी ही गाडी परत केली आहे, अशी माहितीही पोलिस सूत्रांनी दिली.